- TheAnchor

Breaking

March 20, 2025

March 20, 2025

धैर्यवान, विक्रमवीर सुनीता विल्यम्स!

धैर्यवान, विक्रमवीर सुनीता विल्यम्स 

अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर ९ महिने अंतराळात राहिल्यावर पृथ्वीवर परतले. १७ तासांचा परतीचा प्रवास हा नासा आणि स्पेसएक्ससाठी जितका आव्हानात्मक होता, इतकाच तो क्रू -९ अंतराळवीरांची परीक्षा बघणारा ठरला. ८ दिवसासाठी अंतराळात गेलेले विल्यम्स आणि विल्मोर स्टारलाईंनर यानातील निर्माण झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे ९ महिने अंतराळात अडकून राहिले. अखेर स्पेसएक्स आणि नासाच्या एकत्रित प्रयत्नाने विल्यम्स आणि विल्मोर यांना बुधवारी पृथ्वीवर सुरक्षित आणले आणि नासासह संपूर्ण जगाने सुटकेचा निःश्वास सोडला.

नासाचे अंतराळवीर सुनीता विल्यम्स, बुच विल्मोर, निक हेग आणि रशियन अंतराळवीर अलेक्झांडर गोर्बुनोव्ह हे चौघे पृथ्वीवर सुरक्षित पोहचले. स्पेसएक्स ड्रॅगन अंतराळयानाच्या मदतीने बुधवारी  दि. १९ मार्च रोजी भारतीय वेळेनुसार पहाटे ३: ३० वाजता फ्लोरिडातील टलाहासीच्या किनाऱ्याजवळील पाण्यात यान यशस्वीपणे उतरले. या बहुप्रतिक्षित, यशस्वी पुनरागमनाची वाट नासा आणि जगभरातील लोक उत्सुकतेने पाहत होते. १७ तासांच्या प्रवासानंतर ते पृथ्वीवर दाखल झाले. प्रवास वाटतो इतका सोपा नव्हता. तेवढाच आव्हानात्मक, धोकादायक होता. नासाने सूक्ष्म नियोजन केल्याने अंतराळवीर सुरक्षित पृथ्वीवर उतरले. क्रू-९ चे सदस्य विल्यम्स व विल्मोर यांना परत आणण्याचे अमेरिकन राष्ट्रपतींनी देशाला दिलेले आश्वासन ही पूर्ण केले.


विल्मोर आणि विल्यम्स गेल्या वर्षी ५ जून २०२४ ला बोईंगच्या स्टारलाइनर अंतराळयानमध्ये बसून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात गेले होते. हे दोघे अंतराळवीर आयएसएसवर (ISS) पोहचल्यानंतर त्यांना सुमारे एक आठवडा तिथे राहायचे होते. मात्र बोईंगच्या स्टारलाइनर अंतराळयानात आलेल्या तांत्रिक अडचणीमुळे त्यांना पृथ्वीवर परत आणणे जोखमीचे झाले होते. म्हणून त्यांना आयएसएसवर नऊ महिन्यांचे प्रदीर्घ वास्तव्य करावे लागले. अखेर १६ मार्चला क्रू- १० स्पेस स्टेशनवर डॉक झाल्यावर विल्यम्स व विल्मोरे यांचा परतीचा प्रवास सुरू झाला. त्यांचे स्पेसएक्स ड्रॅगन अंतराळयान बुधवारी यशस्वीरित्या अनडॉक झाले, १७ तासांचा आव्हानात्मक प्रवास करून अंतराळवीरांचा क्रू निक हेग आणि रोसकॉसमॉस अंतराळवीर अलेक्झांडर गोर्बुनोव्ह हे स्पेसएक्स क्रू ड्रॅगन अंतराळयानासह पृथ्वीवर परत आले. पृथ्वीवर येतांना ड्रॅगन यानाचा वेग नियंत्रित करणे आणि पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश केल्यावर प्रखर उष्णतेचा सामना करणे ही दोन प्रमुख आव्हाने 'नासा'समोर होती. ड्रॅगन यानातील उच्च गुणवत्तेचे हिटशिल्ड आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरामुळे या आव्हानावर मात करणे शक्य झाले. अपवाद ७ मिनिटांचा ब्लॅकआऊट होता, परंतु त्यानंतर जमिनीवरील कंट्रोल स्टेशन आणि ड्रॅगन यान यांचा संपर्क पुन्हा प्रस्थापित झाला. पुढीलप्रवास नियोजनानुसार झाला. अंतराळ मोहिमा अनेक वेळा अयशस्वी ही झाल्या आहेत,  २००३ साली कोलंबिया अंतराळ शटलचा अपघात झाला होता. अमेरिकेचे अंतराळ शटल कोलंबिया प्रक्षेपणानंतर १६ दिवसांनी पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताना कोसळले, त्यात सर्व ७ अंतराळवीरांचा मृत्यू झाला. त्यात भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर कल्पना चावला यांना ही प्राण गमावावे लागले होते. या अपयशांनंतरही, अंतराळ मोहिमांमध्ये अनेक यश मिळाले आहेत आणि मानवतेने अंतराळ संशोधनात मोठी प्रगती केली आहे.


क्रू-९ मोहिमेने केलेले विक्रम

नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (नासा) ने स्पेसएक्स क्रू-९ मोहिमेबद्दल काही आकडेवारी शेअर केली आहे. सुनीता विल्यम्स यांनी अमेरिकन अंतराळवीर म्हणून अंतराळात दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक वेळ घालवला  सुनीता विल्यम्स यांनी त्यांच्या तीन उड्डाणांमध्ये ६०८ दिवस अंतराळात घालवले, बुच विल्मोर यांनी ४६४ दिवस अवकाशात घालवले. विल्मोर आणि विल्यम्स यांचा २८६ दिवसांचा मुक्काम सामान्य सहा महिन्यांच्या आयएसएस रोटेशनपेक्षा जास्त असला तरी, एकल-मिशन कालावधीसाठी अमेरिकेच्या रेकॉर्डमध्ये ते फक्त सहाव्या क्रमांकावर आहे.  विल्यम्स आणि विल्मोर यांनी त्यांच्या मोहिमेदरम्यान १२१,३४७,४९१ मैलांचा प्रवास केला, २८६ दिवस अंतराळात घालवले आणि पृथ्वीभोवती ४,५७६ प्रदक्षिणा पूर्ण केल्या. दरम्यान, हेग आणि गोर्बुनोव्ह यांनी त्यांच्या मोहिमेदरम्यान ७२,५५३,९२० मैलांचा प्रवास केला, १७१ दिवस अंतराळात घालवले आणि पृथ्वीभोवती २,७३६ प्रदक्षिणा पूर्ण केल्या. विल्यम्सने महिला अंतराळवीर म्हणून एकूण ६२ तास ६ मिनिटे अंतराळ स्थानकाबाहेर अंतराळात फिरण्याचा विक्रम केला आहे आणि अवकाशात चालणाऱ्या अवकाशयानांच्या यादीत हा चौथा क्रमांकाचा आहे. सुनीता सार्वाधिक ६०८ दिवस अंतराळात राहणारी नासाची दुसरी अंतराळवीर ठरली आहे. याआधी पेगी व्हिटसन हिनेे चार मोहिमांमध्ये ६७५ दिवसांचा अमेरिकन विक्रम नोंदविला आहे.


विल्यम्स आणि विल्मोर यांची कामगिरी

आपल्या मोहिमेदरम्यान सुनीताने विज्ञान आणि देखभाल उपक्रम आणि तंत्रज्ञान प्रात्यक्षिकांमध्ये योगदान दिले.  तिच्या संशोधनात वनस्पतींची वाढ आणि गुणवत्ता तसेच रक्त रोग, स्वयंप्रतिकार विकार आणि कर्करोगाच्या उपचारांमध्ये स्टेम सेल तंत्रज्ञानाच्या क्षमतेचा समावेश होता. तसेच स्पेस स्टेशनची रेडिओ फ्रिक्वेन्सी ग्रुप अँटेना असेंब्ली काढून टाकणे, विश्लेषणासाठी स्टेशनच्या बाह्य पृष्ठभागावरून नमुने गोळा करणे, एक्स-रे टेलिस्कोपवरील लाईट फिल्टरच्या खराब झालेल्या भागांना झाकण्यासाठी पॅचेस लावणे आदी कामे केली. अमेरिकन क्रू सदस्यांनी ९०० तासांहून अधिक संशोधनासह १५० हून अधिक अद्वितीय वैज्ञानिक प्रयोग आणि तंत्रज्ञान प्रात्यक्षिके या मोहिमेत केली. 


सुनीता विल्यम्सच्या अंतराळ मोहिमा

२००६ मध्ये स्पेस शटल डिस्कव्हरीमधून उड्डाण केले. २००६ ते २००७ पर्यंत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (ISS) १९५ दिवस मुक्काम होता. २०१२ च्या मोहिमेत आयएसएसवर (ISS) १२७ दिवस घालवले. महिला अंतराळवीरांनी सर्वाधिक स्पेसवॉक (चार) करण्याचा विक्रम तिच्याकडे आहे. महिला अंतराळवीरांनी सर्वाधिक स्पेसवॉक (२९ तास आणि १७ मिनिटे) करण्याचा विक्रम ही तिच्या नावावर आहे. तसेच २०२४-२५ च्या क्रू-९ मोहिमेत विल्यम्सने महिला अंतराळवीर म्हणून एकूण ६२ तास ६ मिनिटे अंतराळ स्थानकाबाहेर अंतराळात फिरण्याचा विक्रम केला आहे. तिने केलेल्या अतुलनीय कामगिरीचा नासाने विशिष्ट सेवा पदक, नासा अपवादात्मक सेवा पदक, अंतराळ संशोधनासाठी रशियन मेडल ऑफ मेरिट असे पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. अंतराळवीरांना कठोर प्रशिक्षण दिलेले असते, असे असले तरी स्पेसमध्ये अनेक आव्हाने येत असतात. त्यांना रेडियशनचा धोका अधिक असतो, आरोग्याच्या समस्यांना सामोरे जात असतांना आपले मानवी संशोधनाचे कर्तव्य यशस्वी पार पाडले. वैद्यकिय उपचारानंतर अंतराळवीर सुनीताला कुटुंबाला भेटण्याची मुभा दिली जाईल. म्हणून सुनीता विल्यम्स ही अनेकांसाठी प्रेरणा आहे, तिने असाधारण धैर्य, दृढनिश्चय आणि अंतराळ संशोधनासाठी समर्पण दाखवले याचा नासासह भारताला ही अभिमान आहे.


दिगंबर मराठे




 

March 11, 2025

March 11, 2025

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारताने एकदिवसीय स्पर्धेत भारताला तोड नसल्याचे दाखवून देत आपला दबदबा कायम राखला आहे. वर्ल्डकप क्रिकेट २०२३ मधील एकदिवसीय अंतीम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून ६ विकेट्सने पराभव पत्करावा लागला म्हणून रोहित शर्मा आणि संघाला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले. त्यानंतर झालेल्या आयसीसीेच्या जागतिक कसोटी सामन्याच्या स्पर्धेत ही ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला. एका ऑस्ट्रेलियन खेळाडूने एकदिवसीय चषकावर पाय ठेवल्याचा फोटो ही सोशल मीडियात व्हायरल झाला होता. तो प्रकार क्रिकेटवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक चाहत्याला खटकला. भारताला डिवचल्याची चर्चा रंगली. संपूर्ण सीरीजमध्ये दमदार कामगिरी करणाऱया भारताला त्याची सल होतीच. त्या पराभवाने संघातील दिग्गज खेळाडूंवर प्रश्न उपस्थित झाले परंतु भारतीय क्रिकेट बोर्डने खेळाडूंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत रोहित शर्माला चॅम्पियन ट्रॉफीपर्यंत कर्णधार ही करून टाकले. कर्णधार रोहितने हा विश्वास सार्थ ठरवला स्वतः पुढाकार घेत संघ सहकाऱ्यांसमोर एक उदाहरण ठेवले. सलामीला येऊन निडरपणे फटकेबाजी करून संघाला सुस्थितीत नेऊन ठेवण्याची त्यांची योजना वाखण्याजोगी होती. मंगळवारी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियावर भारताने केलेल्या ऐतिहासिक विजयामुळे भारत पाचव्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला संघ बनला आहे, तसेच ऑस्ट्रेलियाचा अहंकार तोडून घरचा रस्ता दाखवत कसोटी आणि एकदिवसीय चषक स्पर्धेचा वचपा देखिल भारताने काढला. रोहितने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात देखिल त्याच पद्धतीने खेळ करत ७६ धावा फटकावल्या व २५ वर्षानंतर न्युझीलंडचा पराभव केला. ऑस्ट्रेलिया विरुद्ध सेमी फायनमधील विराट कोहलीची ८४ धावांची खेळी आणि रोहितच्या अंतिम सामन्यातील ७६ धावा करून या दोन्ही खेळाडूंनी टीकाकारांना आपल्या खेळीने चोख उत्तर दिले. बुमराच्या अनुपस्थितीमध्ये शमी, पांडया, वरुण चक्रवर्ती, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव यांनी अप्रतिम गोलंदाजी केली. सिरीजमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या तीन गोलंदाजांमध्ये वरुण आणि शमीचा सामावेश आहे. त्यांनी प्रत्येकी ९ विकेट घेतल्या. तर फलंदाजीत शुभमन गिल, श्रेयस, रोहित, विराट, के एल राहुल, अक्षर यांनी संघाला साजीशी कामगिरी केली. सीरिजमध्ये रचीन रवींद्र याने सर्वाधिक २६३ धावा धावा काढल्या. त्यांनतर श्रेयस  २४३ धावा करणारा दुसरा खेळाडू ठरला व विराटने २१८ धावा केल्या. पांड्या, जडेजा व अक्षर पटेल यांची अष्टपैलू कामगिरी ही नजरेत भरणारी आहे. भारताच्या खेळाडूंनी दाखवलेल्या सांघिक कामगिरीचा करिष्मा भारतीय चाहत्यांना आनंद आणि समाधान देणारा ठरला. ऑस्ट्रेलियाने २००६ आणि २००९  अशी अनुक्रमे दोनदा चॅम्पियन ट्रॉफीवर आपले नाव कोरले. त्यानंतर भारतच असा संघ आहे ज्याने ही स्पर्धा तीनदा खिशात घातली. सध्या हा एक रेकॉर्ड बनलाय अन् तो भारताच्या नावावर असल्याने भारताचे एकदिवसीय क्रिकेटवरील वर्चस्व अबाधित आहे. रोहित शर्माने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून पुन्हा एकदा इतिहास रचला. हिटमॅन रोहित हा चारही आयसीसी स्पर्धांच्या अंतिम फेरीत पोहोचणारा क्रिकेटच्या इतिहासातील पहिला कर्णधार बनला असून तसा विक्रम त्याच्या नावावर नोंदवला गेला. भारताचा माजी कर्णधार एम एस धोनीने २००७, २०११ आणि २०१३ मध्ये अनुक्रमे आयसीसी टी-२० विश्वचषक, एकदिवसीय विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी या तीन स्पर्धांमध्ये भारताला ट्रॉफी मिळवून दिली. परंतु, धोनीने खेळाच्या सर्वात लांब स्वरूप असलेल्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्यापूर्वी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सुरू झाली नव्हती. त्याला ती संधी मिळाली नाही. धोनी प्रत्यक्षात जे करू शकला नाही ते रोहितने केले. भारत पाचव्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला संघ बनला आहे, इतर कोणताही संघ तीनपेक्षा जास्त वेळा पोहोचू शकला नाही. रोहितने फेब्रुवारी २०२२ मध्ये पूर्णवेळ कर्णधारपद स्वीकारल्यावर भारताने अनेक विक्रम मोडले आहेत. तीन वर्षांच्या कालावधीत भारताने प्रत्येक आयसीसी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे, असा पराक्रम करणारा पहिला कर्णधार बनला आहे. एक अविस्मरणीय नायक व सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक बनला आहे. यशस्वी कर्णधारांमध्ये महेंद्रसिंह धोनी सोबत रोहितचे नाव घेतले जात आहे. रोहितला जो सन्मान मिळाला नव्हता तो आता मिळतोय याचेही चाहत्यांना समाधान आहे.





 

February 28, 2025

February 28, 2025

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल


तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे.


इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Research on Addictive Behaviours (CAR-AB) स्थापन करण्याच्या निर्णय घेतला आहे. त्यासाठी १४ कोटींच्या प्रस्तावाला सरकारने मंजुरी दिली आहे. उशीरा का होईना सरकारने एक महत्वपूर्ण पाऊल पुढे टाकले. दिल्ली स्थित अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS), येथे  देशातील हे पहिले डिजिटल व्यसनमुक्ती संशोधन केंद्र असेल. मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या व्यसनाशी लढण्यासाठी मुलांना आणि तरुणांना मदत करून त्यातून बाहेर काढण्यासाठी हे केंद्र महत्त्वाचं ठरणार आहे.


तसे बघितले तर मुलांमध्ये इंटरनेटचा वाढता वापर व ऑनलाइन गेमचे वाढते व्यसन लक्षात घेता एम्सने २०१७ मध्यचे वर्तणूक व्यसन क्लिनिक सुरू केले. तेव्हापासून इंटरनेट, मोबाइल, ऑनलाइन-ऑफलाइन गेम आदींच्या व्यसनाने त्रस्त असलेल्या रुग्णांवर या क्लिनिकमध्ये उपचार केले जातात. प्रा. डॉ. यतन पाल सिंग बलहारा हे दिल्ली येथील वर्तणूक व्यसन चिकित्सालयाचे नेतृत्व करत असून त्यांनी याकडे लक्ष वेधले.  भारतीय आर्थिक सर्वेक्षण २०२४- २५ चा अहवालातही मुले आणि किशोरवयीन मुलांमधील मानसिक आरोग्याच्या गंभीर समस्या या अतिरेकी इंटरनेट वापराशी संबंधीत असल्याचे चिन्हीत करून त्यावर चिंता व्यक्त करण्यात आली. त्यामुळे मुलांना त्यांचे मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी व इंटरनेटपासून दूर ठेवण्यासाठी शालेय आणि कौटुंबिक पातळीवरील हस्तक्षेपांची तातडीची गरज या अहवालात अधोरेखित केली आहे. त्यामुळेच स्क्रीन टाइम मर्यादित करून त्यावर नियंत्रण मिळवणे किती महत्त्वाचे आहे,असे डॉ. बलहारा यांनी सांगितले. त्यामुळे आता पालक, शाळा आणि एकूणच सामाजिक व्यवस्थेला समजवण्याची गरज निर्माण झाली असल्याचे मानसोपचार तज्ज्ञांना वाटू लागले आहे. त्याने व्यापक स्वरूपात यावर काम होईल अशी आशा निर्माण झाली. उशिरा का होईना अखेर याची दखल घेतली गेली हे ही नसे थोडके.


जागतिक आरोग्य संघटनेचेे (WHO) मुलांच्या स्क्रीन टाइमबाबत स्पष्ट मार्गदर्शक तत्वे आहेत, परंतु लोकांना त्याबाबत माहिती नाही. २ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना स्क्रीन टाईमपासून दूर ठेवा. तसेच २ ते ५ वर्षांच्या मुलांसाठी स्क्रीन वेळ एक तासापेक्षा जास्त नसावा आणि इतर शारीरिक आणि मानसिक क्रियाकलापांमध्ये संतुलन राखले पाहिजे असे, डब्लूएचओने सांगितले आहे.  पण आपण लहान बाळ रडलं ही त्याला गप्प करण्यासाठी हातात मोबाईल देतो. तो जेवण करत नसेल, अभ्यास करत नसेल तर मोबाईलचे आमिष देतो. घरातील मोठी माणसेच मोबाईलच्या आहारी गेलेली आहेत. त्यामुळे मुलांमध्ये मोबाईल व्यसन वाढीला आपणच कारणीभूत आहोत हे समजण्यास उशीर होतो. त्याचे गंभीर परिणाम ही पहायला मिळतात. पालकांनी मुलांना मोबाइल खेळण्यास मना केले म्हणून आत्महत्या केल्याच्या बातम्या आपण वाचल्या आहेत. मुले पालकांवर हल्ला करत असल्याच्या घटना घडत आहेत. अशा घटनांबाबत दिल्ली, भोपाळ एम्स आणि जागतिक आरोग्य संघटनेला ही मोठी चिंता आहे. यात मोठा वाटा कोविड काळाचा आहे. प्रौढांना वर्कफ्रॉम होम आणि शाळांनी मुलांना ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू केला. कोविड काळानंतर ही हा पॅटर्न चालू आहे. ऑनलाईन अभ्यासाच्या नावाखाली तासनतास मोबाईल गेम खेळण्याचे व्यसन मुलांना आणि प्रौढांमध्ये वाढून वॉच टाईम वाढला त्याचे दुष्परिणाम आता दिसून येत आहे. शाळेतील ऑनलाईन अभ्यासक्रमावर ही विचार करण्याची वेळ आली आहे. शाळा आणि सरकार यांचा विचार करणार का? मोबाईल, इंटरनेट पासून मुलांना परावृत्त करण्यासाठी दक्षिण कोरिया, चीन, अमेरिका या देशात आधीच असे केंद्र सुरू आहे. भारताने ही मोबाईल व्यसनमुक्ती संशोधन केंद्राच्या माध्यमातून चांगले पाऊल उचलले आहे.


AIIMS चे हे केंद्र, IIT दिल्लीच्या सहकार्याने आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) टूल्स विकसित करेल जे शाळा आणि महाविद्यालयीन मुलांना आणि तरुणांना मोबाईलच्या व्यसनापासून मुक्त करण्यात मदत करेल, यासाठी सात वर्षांच्या शालेय मुलांपासून ते २६ वर्षांच्या महाविद्यालयीन तरुणांपर्यंतच्या लोकांवर संशोधन केले जाईल, इंटरनेट व्यसनमुक्तीबद्दल जनजागृती करण्यासाठी डॉक्टरांची एक विशेष टीम शाळा आणि महाविद्यालयांना भेट देणार आहे.  देशातील वैद्यकीय महाविद्यालयेही या केंद्राशी जोडली जातील. तसेच या क्षेत्रात काम करणाऱ्या खाजगी संस्थांचा देखील समावेश केल्यास आणखी हातभार लावण्यास मदत होईल. व्यसनमुक्ती क्षेत्रात पूर्नरवसनाचे काम करणाऱ्या, ध्यान साधना व  यासारख्या क्षेत्रात काम करणाऱ्या इतर संस्थांचा सहभाग महत्वाचा ठरू शकतो. म्हणूनच एम्सने डिजिटल व्यसनमुक्ती संशोधन केंद्र सुरू करण्याचे उचलेलं पाऊल निश्चितच महत्वपूर्ण आहे.


दिगंबर मराठे

February 16, 2025

February 16, 2025

शिवजन्मोत्सव समिती शहराध्यक्षपदी पुरुषोत्तम कडलग

त्र्यंबकश्वर|प्रतिनिधी| दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य दिव्य शिवजयंती साजरी करण्याच्या उद्देशाने त्र्यंबकेश्वर शिवजन्मोत्सव समितीच्या कार्यकारणीची बैठक नुकतीच झाली. याबैठकीत समितीच्या शहराध्यक्षपदी पुरुषोत्तम कडलग यांची तर तालुकाध्यक्षपदी मनोहर महाले यांची एकमताने निवड घोषीत करण्यात आली. 

येथील सुखसागर हॉटेल येथे शनिवारी समितीची बैठक पार पडली. २०२५ छत्रपती शिवराय जन्मोत्सव समितीची बैठक पुरुषोत्तम कडलग यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थिती झाली. यामध्ये शिवजयंती साजरी करण्याबाबत उहापोह करण्यात आला. त्यात विविध सामाजिक, प्रबोधनात्मक उपक्रमाविषयी चर्चा झाली. शिवजयंती दरम्यान शिवरायांचे विचार घराघरात पोहोचविण्यासाठी शोभायात्रा काढून यादरम्यान ध्वज पथक, युवा जल्लोष ढोल पथक, भजनी मंडळासह विविध प्रात्यक्षिक पथके, शिवकालीन देखावे तथा सजावटी आदी रूपरेषा मान्यवरांच्या उपस्थितीत ठरवण्यात आली. 

तसेच नवीन कार्यकारिणी घोषित केली यामध्ये तालुकाध्यक्ष मनोहर महाले, कार्याध्यक्ष विजय वायकंडे, उपाध्यक्ष राजाभाऊ चव्हाण, खजिनदार रवी अण्णा वारुंसे, शहराध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, कार्याध्यक्ष परशुराम पवार, उपाध्यक्ष प्रशांत तुंगार, खजिनदार भूषण भोई, सरचिटणीस ग्रामीण गणेश चव्हाण, सरचिटणीस शहर राजू माळी, नवनाथ भाऊ कोठुळे, पुरुषोत्तम लोहगावकर, सुनील काका आडसरे, किरण काका आडसरे, पिंटू तुंगार, दीपक लोखंडे, भूषण आडसरे, कैलास मोरे, अजय निकम शिवाजी कसबे रावसाहेब कोठुळे, युवराज कोठुळे, दिलीप काळे यांसह मोठ्या संख्येने राजकीय सामाजिक व गावातील नागरिक पदाधिकारी उपस्थित होते.

February 5, 2025

February 05, 2025

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले.


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुरू झाले आहे. या टेरिफ युद्धाचा धसका गुंतवणुकरांमध्ये दिसून येत असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून गुंतवणूकदार सोन्याकडे बघत आहे. त्यामुळे सोन्यामध्ये गुंतवणूक वाढत असून शुद्ध सोने ८४ हजारांवर पोहचले असून ३ टक्के जीएसटीसह हा भाव ८७२५० इतका झाला आहे.

----------------------------------------------

दरात ३ हजारांची वाढ


सध्या सोन्याचे दर २४ कॅरेटला ८७,२५० रु. तर २२ कॅरेटला ८०२७० रु. आहे. त्यामुळे सोने दरात ३ हजार रुपयांची एकदम उसळी घेतली आहे. ही भाववाढ आगामी काळात सुरूच राहण्याची शक्यता आहे.

गिरीष नवसे,
अध्यक्ष, नाशिक सराफ असो.

----------------------------------------------

टेरिफ वॉरचा परीणाम आहे


रात्री स्पॉट गोल्ड ०.८ टक्के वाढून  २८१८. ९९ डॉलर प्रति औंस झाले. (१८४६ जीएमटी) या सत्रापूर्वी २८३० डॉलरचा विक्रम गाठल्यानंतर यूएस सोन्याचे फ्युचर्स ०. ८ टक्के वाढून २८५७.१० डॉलरवर स्थिरावले. ट्रम्प यांच्या टेरिफ दरांच्या अनिश्चिततेमुळे सुरक्षित आश्रयस्थान म्हणून गुंतवणुकदार सोन्याकडे बघत आहेत. त्यामुळे व्यापार युद्धाच्या परिणाम स्वरूप आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याने उसळी घेतली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात आणखी सोने दर वाढण्याची शक्यता आहे.

मेहुल थोरात,
उपाध्यक्ष, नाशिक सराफ असो.

-------------------------------------------

ट्रॅप यांची पुढील पॉलिसी कशी राहील यावरच मार्केटची दिशा ठरेल

आंतरराष्ट्रीय बाजार सोन्याने नवा उच्चांक गाठला हा टेरिफ वॉरचा परीणाम असून पुढील काळात ट्रप सरकारची पुढील पॉलिसी कशी असेल यावर आता सर्व काही अंवलंबून आहे. असे असेल तरी ग्राहक आपली गरज व बाजाराची परिस्थिती लक्षात घेऊन केव्हाही सोने खरेदीला प्राधान्य देऊ शकता.

राजेंद्र दिंडोरकर
माजी अध्यक्ष, नाशिक सराफ असो.



February 2, 2025

February 02, 2025

डीपसीक'एआयचे आव्हान!

'डीपसीक'एआयचे आव्हान!

चीनची एआय स्टार्टअप डीपसीकने आरवन (R1) मॉडेल तयार करून टेक कंपन्यांची झोप उडविली आहे. चीनी अभियंते लिआंग वेनफेंग यांनी फक्त ६ मिलियन डॉलरमध्ये ॲप बनविले आहे. कमी खर्चात तयार केलेल्या या चाटबॉटने टेक मार्केट क्षेत्रात खळबळ उडवून दिली. या एआय बॉटने थेट पाश्चिमात्य टेक जायंट कंपन्यांना आव्हान दिले. त्यामुळे २७ जानेवारी रोजी अमेरिकन शेअर बाजार घसरला.  एनविडीया (Nvidia) या एआय कंपनीचे मार्केट व्हॅल्यू ६०० मिलियन डॉलरने घसरले. अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढे मार्केट पडले. अमेरिकन राष्ट्रपती ट्रम्प यांनीही दखल घेत अमेरिकन टेक कंपन्यांसाठी हा वेकअप कॉल असल्याचे सांगितले. त्यामुळे या कंपन्या खडबडून जाग्या झाल्या आहेत. एनविडियाचे मार्केट व्हॅल्यू ३.५ ट्रिलियन वरुन ते २.९ ट्रिलियन डॉलर इतके घसरले. मायक्रोसॉफ्ट, गूगल यांनाही आर्थिक फटका बसला. त्यामुळे चीन आणि अमेरिकेत टेक स्पर्धा आणखी वाढणार यात शंका नाही.

२०२२ पासून आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्नॉलॉजीचे वारे जगात पसरले. त्यामुळे डेटाचे विश्लेषण आणि मशीन लर्निगद्वारे हव्या त्या माहितीचे दालन वापरकर्त्यांना खुले झाले. फायनान्समध्ये शेअरमार्केचा ट्रेण्ड जाणून घेणे, रिटेल क्षेत्रात ग्राहकाची रुची, हेल्थकेअर क्षेत्रातील अपडेट मिळवता येणे शक्य झाले. यापूर्वी गुगल हे काम करत होते मात्र त्यापेक्षा ओपन एआय सोर्सचा आवाका मोठा आहे. सध्या ओपन एआय चाटजीपीटी (OpenAI ChatGpt) गुगल जेमिनी (Google Gemini) या एआय टूलचा दबदबा दिसून येतो. मेटा एआय (Meta AI) लामा एनविडिया (llama Nvidia) यांचे ही या क्षेत्रात वर्चस्व आहे. त्याला डीपसीकने आव्हान दिले, हे अवघे ६.५ एमबीचे फ्री ॲप असून त्याला अँड्रॉइडवर चक्क ४.७ रेटिंग आहे. ८ जानेवारी २०२५ ला ते अँड्रॉइडवर उपलब्ध झाल्यावर २८ जानेवारीनंतर प्ले स्टोअर वरुन १ कोटीच्यावर लोकांनी ॲप डाउनलोड केले. चाटजीपीटी १० करोड डाउनलोड आहे. डीपसीक ॲपल ओएसवर देखील मोठ्या प्रमाणात डाउनलोड केले जात आहे. 

तसेच प्रतिस्पर्धी ओपन एआय चाटजीपीटीला अँड्रॉइडवर ४.६ रेटिंग असून ते २५ एमबीचे पेड ॲप आहे. इतर टूलच्या तुलनेत डीपसीक अत्यंत कमी खर्चात उपलब्ध असल्याने पाश्चिमात्य महागड्या 'एआय'पेक्षा डीपसीकला वापरकर्ते जास्त पसंती देत आहेत. एनविडीयाची एच-८०० चीपसह इतर कमी खर्चाच्या चीपचा वापर करून बनविलेले हे टूल एका क्लिकवर नेमकी माहिती उपलब्ध करुन देत असल्याचे वापरकर्त्यांनी सांगितले. कोडींग टास्क, कंटेंट बनविणे, तांत्रिक अडचण सोडविणे यात हे चाटजीपीटीला वरचढ असल्याचे वापरकर्त्यांचे म्हणणे आहे. डीपसीकला इमेज स्कॅनिंगमध्ये अधिक काम करण्याची गरज असल्याचे मत वापरकर्त्यांनी व्यक्त केले आहे. फाईल रीडिंग, वेब सर्चींग, इंटेलिजन्स क्यू अँड ए, डीप थिंक आदींसह गणितासाठी ते उपयुक्त असल्याचा दावा कंपनी करते. मात्र डेटूडे टास्कमध्ये ते कमी पडत असल्याचे टेक क्षेत्रातील तज्ञांचे मत आहे. तसेच चाटजीपीटीची क्षमता  जास्त असल्याचे सांगतात.


१९५० ते १९९०० रुपये खर्च असून चाटजीपीटी पर आयटम नुसार चार्ज आकारते. त्यातुलनेत डीपसीक एआय बॉट खूपच कमी खर्चात उपलब्ध आहे. त्यामुळे अल्पवधीत यशस्वी झालेले आणि कमी खर्चात बनविलेल्या या ॲपचे गुपित शोधण्यात अमेरिकन टेक कंपन्यांचे अभियंते कामाला लागले. चांगली चीप आणि जास्त खर्च न करता ही चांगले एआय मॉडेल विकसित करता येते हे सिद्ध झाल्याने मेटाच्या अभियंत्यांची टीम ही कामाला लागली आहे. त्यामुळेच अमेरिकन कंपन्यांनी एआय संशोधन आणि विकासावर येत्या चार वर्षात मोठी गुंतवणूक करण्याची घोषणा अलीकडेच केली आहे. असे असले तरी टेक क्षेत्रात चीनचे वाढते वर्चस्व रोखण्यासाठी पाश्चिमात्य देशांनी उपाय योजना करण्यास सुरुवात केली आहे. चीनवर विश्वास ठेवणे कठीण असल्याचे या क्षेत्रातील तज्ञांना वाटते. चीनी ॲप डेटा चोरी करत असल्याचा आरोप पूर्वी पासून केला जातो. टिकटॉक व हुवाये या टेक कपंन्यांवर अमेरिका आणि भारताने यापूर्वीच डेटा चोरीचा ठपका ठेवून सुरक्षिततेच्या कारणास्तव त्यांना बॅन केले आहे. चीनी टेक कंपन्यावर सरकारचा अंकुश असतो. अभिव्यक्ती स्वातंत्र्य नसल्याने तो मुद्दा या कंपन्यांच्या विरोधात जातो. डीपसीकवर शी जिनपिंग व १९८९ मधील तियानमेन स्कवायर येथील घटनेबाबत माहिती टाकली असता ती संवेदनशील माहिती देण्यास असमर्थ असल्याचे दिसून आले. त्यावर ही सरकारचा प्रभाव असल्याची टीका केली जात आहे. त्यातुलनेत चाटजीपीटी सर्व माहिती उपलब्ध करुन देत असल्याचे टेक तज्ञांना दिसले. डेटा पॉलिसीे वाचली तर या अंतर्गत डीपसीक तुमचे नाव, ईमेल, मोबाईल डिव्हाईस, युजर आयडी, फोन नंबर, फोटो, व्हिडिओ, ॲक्टिव्हिटी हिस्ट्री, ट्रांझेशन हिस्ट्री आदी त्याच्याकडे घेत असल्याचे जाहीर सांगते त्यासाठी ते फ्रॉड रोखणे, आणि माहितीच्या सुरक्षिततेचा हवाला देतात. मात्र एकदा माहिती गेली की तुमचा त्यावर नियंत्रण नाही. ती माहिती त्यांच्या सरकारकडे ही जाण्याची भीती अनेक देशांना आहे अन् अनेक टेक तज्ज्ञ ही याबाबत चिंता व्यक्त करतांना दिसतात. मात्र असे असतांनाही डीपसीक डाऊनलोड करण्याचे प्रमाण वाढत आहे. म्हणून या एआय मॉडेलने पाश्चिमात्य टेक कंपन्यासमोर आव्हान उभे केले आहे.

दिगंबर मराठे
9370020141