जगात एक महत्वाची घटना घडली आहे, आपल्याकडे याविषयी फारशी चर्चा नसली तरी जगभरातील पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनांनी मात्र लक्ष वेधले आहे. भारतापासून हजारो कि.मी दूर आफ्रिका खंड आणि अटलांटिक महासागराच्या पलीकडे दक्षिण अमेरिकी प्रदेशात ॲमेझॉन उष्णकटीबंधीय वर्षावन आहे. त्याचे क्षेत्रफळ 5,500,000 कि.मी. इतके आहे. ॲमेझॉनचा सर्वात मोठा भाग ब्राझीलमध्ये असून एकूण वनक्षेत्र 60% आहे, त्यानंतर पेरू 13%, कोलंबिया 10% तसेच इक्वाडोर, वेनेझुएला, बोलेविया, गयाना, फ्रेंच गयाना, सूरीनाम आदी भाग जंगलांनी व्यापलेला आहे. ब्राझील येथील जंगलं सतत तीन आठोडयापासून जळत आहे. जागतिक पर्यावरण संतुलन राखण्याच्या दृष्टीने ती वनसंपदा महत्वाची आहे.
सातत्याने जळणाऱ्या जंगलामुळे मोठया प्रमाणात कार्बनचे उत्सर्जन होऊन पर्यावरणावर त्याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता पर्यावरणवादी संघटनांनी व्यक्त केली. छोट्या पातळीवर आग नेहमीच लागते मात्र यंदाची आग मोठी आहे. सलग तीन हप्ते आगीचे डोंब पसरलेले दिसले, त्यामुळे ब्राझिलच्या आकाशात काळे ढंग व धुराचे लोळ दिसत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी 85% इतके आगीचे जास्त प्रमाण असल्याचे पर्यावरण अभ्यासकांचे मत आहे. हे जंगल इकोलॉजिकली महत्वाचे यासाठी आहे की त्यातून 25 ते 28 % ऑक्सीजन उत्सर्जित होते. सजीव सृष्टीसाठी आणि पर्यावरण संतुलन राखण्यासाठी त्याचे असाधारण महत्व आहे. अन्यथा ऑक्सीजन उत्सर्जनाचे प्रमाण कमी होऊन कार्बनचे उत्सर्जन वाढेल आणि सजीव तसेच दुर्मिळ जैवविविधतेला मोठा धोका निर्माण होण्याची शंका पर्यावरण अभ्यासकांना आहे.
Photo credit: wikipedia.org
ब्राझील राष्ट्रपतींच्या चुकीच्या धोरणामुळे संकट: पर्यावरण अभ्यासकांचा आरोप
ब्राझिलचे राष्ट्रपदी जैर बोलसोनारो नुकतेच सत्तेवर आले. त्यात ब्राझिल मध्यम अर्थव्यवस्थेत रुतला होता. आर्थिक गर्तेत सापडलेल्या ब्राझीलचा विकास अमेझॉनच्या माध्यमातून करता येईल असा आत्मविश्वास बाळगून तेथील कायदे, नियम शिथिल केल्याचा पर्यावरणवाद्यानी बोलासानारो यांच्यावर आरोप केलाय. येथील नॅशनल इंस्टिट्यूट स्पेस रिसर्च संस्थेच्या माजी संचालकांनी जंगलांच्या होणाऱ्या हानी बाबत सरकारला एक अहवाल पाठवून अवगत करण्याचा प्रयत्न केला मात्र अहवाल देणाऱ्या संचालकांनाच सरकारने हटवले. तेथे कंपन्यांनी बेसुमार वृक्षतोड केली आणि शेतकऱ्यांनी लावलेल्या आगीमुळे परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे माध्यमात व पर्यावरणवाद्यांमध्ये चर्चा आहे. वेगवेगळ्या ठिकाणी हे आगीचे प्रमाण असले तरी वातावरण बदलाचे परिणाम त्याभागात जाणवत आहेत, तेथील स्थानिक अदिवासींचे वास्तव्य देखील धोक्यात आलेय. त्यांच्यावर विस्थापित होण्याची वेळ आली. त्यामुळे सर्वानी ब्राझिललाच या घटनेसाठी जबाबदार धरले, मात्र राष्ट्रपती बोलसोनारो यांनी आगीच्या घटनेमागे पर्यावरणवादी संघटनांचा हात असल्याचा उलट आरोप केलाय.
Photo credit: copro de bomberos de mato grass via AP /buzzfeednews.com)
जैवविविधतेला धोका
या प्रदेशातील जैवविविधता ही जगाच्या कुतुहूलाचा विषय आहे. सजीव वनस्पती आणि प्राण्यांच्या दुर्मिळ प्रजाती फक्त याच वनक्षेत्रात असल्याचे प्राणीमित्र सांगतात. झाडाच्या 16,000 प्रजाती याठिकाणी आहेत, किटकांच्या 2 दशलक्ष, 40,000 वनस्पती, 1294 पक्षी 427 उभयचर तसेच 378 सरपटणाऱ्या प्राण्यांच्या प्रजाती आढळतात. ॲनाकोंडा, जग्वार, बेडूक तसेच इतर शेकडो प्राणी आणि दुर्मिळ वनस्पती याच ठिकाणी पहायला मिळतात. जगलांच्या आगीने या जैवविविधतेला मोठा धोका निर्माण झाला आहे. पर्यावरण संतुलन राखण्यासाठी त्याचं असणं गरजेचे आहे. त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्नं आहे. आग अशीच वाढत राहिली तर सजीवांचा नाश अटळ आहे. जगलांच्या नाशामुळे कार्बनचे उत्सर्जन वाढल्यास ते ग्लोबल वार्मिगला हातभार लावणारे आहे आणि मानवासाठी ही ती धोक्याची घंटा आहे. त्यामुळे जीवसृष्टीसाठी यूएनसह सर्वच देशांनी हा मुद्दा गांभिर्याने हाताळायला हवा.!
दिगंबर मराठे
सोर्स:-विकिपीडिया आणि आंतरराष्ट्रीय माध्यमे