- आपत्तीचा महापूर - TheAnchor

Breaking

August 12, 2019

आपत्तीचा महापूर


नाशिकमध्ये गोदावरीला महापूर आला. त्यापाठोपाठ कृष्णाखोऱ्यात सांगली, कोल्हापूर आणी सातारा या जिल्ह्यांना पूराने वेढा दिला. सन 2005 च्या महापुरानंतर हा सर्वात मोठा महापूर ठरला. सुरुवातीला कर्नाटकातील अलमट्टी धरणातून पाणी सोडल्याने हा महापूर आल्याची अफवा पसरली होती, मात्र त्यानंतर जाणकारांच्या वस्तुस्थिती लक्षात आली. अचानक झालेल्या अतिवृष्टीचा तो फटका होता. आता हळूहळू पुराचे पानी ओसरत आहे, शासकीय आणी सामाजिक संस्थानी स्वतःला मदत कार्यात झोकून दिले आहे.मात्र वित्त व जीवितहानी मोठी आहे. त्यातून सावरणे आपत्तीग्रस्त जिल्ह्यांना कठीण आहे.10 जिल्ह्यात ओला दुष्काळ आहे तर 27 जिल्ह्यात कोरडा दुष्काळाचा सामना करावा लागत आहे असे विचित्र चित्र महाराष्ट्रात आहे.

 फोटो :उदय रांजणगावकर

नाशिक, इगतपुरी अतिवृष्टीमुळे महापूर

नाशिकला जुन्या जाणत्या लोकांच्या माहितीप्रमाणे सन 1972 ला सर्वात मोठा महापूर आल्याचे सांगण्यात येतं. 2008, 2016  नंतर आताचा ऑगस्ट 2019 चा महापूर हा त्यापेक्षा मोठा आहे. ऑगस्ट महिन्याच्या 9 दिवसातच विक्रमी पावसाची नोंद झाली. नाशिक 277 %, त्र्यंबक 243% आणी पेठ 157 % तर इगतपुरीत 237% इतका पाऊस झाला. अतिवृष्टीमुळेच गंगापूर आणी दारणा धरणातून हजारो क्यूसेक पाणी सोडल्याने गोदावरीला महापूर आला.1972 नंतर 2019 चा महापुरात गोदाकाठी असलेला पुरमापक दूतोंडया मारुती बुडाला आणी महापूर मापक नारोशंकर घंटेला पानी लागले. या महापुरामुळे सायखेडा, चांदोरी गावातील लोकांना वेळीच सुरक्षित स्थळी हलविले. जिल्हा प्रशासन, पोलीस, आपत्ती व्यावथापन विभाग सतर्क असल्याने जीवित हानी होणार नाही याची दक्षता घेण्यात आली. तरीही गोदातिरी असलेल्या बाजारपेठेत पानी शिरले. गंगापूर धरणात मोठया प्रमाणात गाळ असल्याने गोदाकाठीही गाळ साचला होता. गोदावरीतील वाळू उपसा झाल्याने सर्वत्र गाळाच साम्राज्य होतं. पूररेषेतील बांधकामांमुळे नदीचे पात्र अरुंद झाले आहे. त्याचा परिणाम दिसून येत आहे. नैसर्गीक आपत्तीसोबतच मानवी चुकाही महापुराला हातभार लावत आहे.

सांगली, कोल्हापुरातील महाप्रलय

कृष्णाकाठावर असलेल्या सांगली, कोल्हापूर आणी साताऱ्यात अतिवृष्टीमुळे आलेल्या  महापुरात जीवित आणी वित्तहानी झाली आहे.कृष्णानदीला आलेला पूर त्यातच वारणा आणी राधानगरी धरणातून पानी सोडल्याने हा परिसर जलमय झाला. 9 दिवासात सांगलीत 758 % तर कोल्हापुरात 480 टक्के पाऊस झाला. नैसर्गीक आपत्तीने ना प्रशासनाला व नागरिकांना सावरण्याची संधी दिली नाही. क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले लाखो लोकांचे संसार उघड्यावर आले पुराची पातळी वाढल्याने अन्न पाण्यावाचून हाल झाले मात्र त्यांना मदत पोहचवणे पुरामुळे अवघड झाले. आपत्ती व्यवस्थापन विभाग आणी प्रशासनाने हरिपूर गावातील लोकांना काढण्यासाठी प्रयत्न केलेत पण लोक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते,त्यातच ब्रम्हनाळ येथे बचावकार्य सुरू असतांना दुर्घटना घडली त्यात 17 जणांना आपले प्राण गमवावे लागले. 2005 मध्ये ही या ठिकाणी महापूर आला होता. त्यादृष्टीने आपत्तीपूर्वी व्यवस्थापन होणे गरजेचे होते पण त्यात आपण कमी पडल्याचे दिसले. आता आपत्तीग्रस्ताना उभे करण्यासाठी मदतीचे हात सरसावले आहे. अहोरात्र बचावकार्य करणारे भारतीय सैन्य आणी एनडीआरएफचे जवान यांच्या मदतीला सामाजिक संस्था पुढे होत खांद्याला खांदा लावून कामाला लागल्या आहे.वेळ राजकारण व त्रुटी काढण्याची नाही आपत्तीच्या महापुरात सर्वस्व गमावलेल्या आधार देण्याची आहे. ईद साद्या पद्धतीने साजरी करत मुस्लिम बांधवानी पूरग्रस्त नागरिकांना मदतीचा दिलेला हात संवेदनशीलतेची जाणीव करुन देणारा आहे.

दिगंबर मराठे, नाशिक