- भारतातील पहिले हॅप्पी व्हिलेज 'कावलगाव' - TheAnchor

Breaking

October 14, 2019

भारतातील पहिले हॅप्पी व्हिलेज 'कावलगाव'

भारत हा कृषी प्रधान देश आहे. ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे. खेडी समृद्ध करण्यासाठी महात्मा गांधी नेहमी खेडयांकडे चला असे सांगत. 2000 वर्षापूर्वी भारत देश हा अध्यात्माचा  विश्वगुरू होता. संपन्न आणि आनंदी देश म्हणून ओळखला जायचा, सद्या आनंदी देशाच्या यादीत भारताचे नाव घसरले आहे. आनंदी गाव म्हटले की लोकांना नवल वाटतं, ते साहजिक आहे कारण 2000 वर्षापूर्वी विपश्यना विद्या सर्वत्र पसरलेली होती, गावाची चावडी असो का पाणवठा सर्वत्र विपश्यनेची एकच चर्चा होत असे, विपश्यना साधनेद्वारे सर्वत्र शांती, एकता, अखंडता, बंधूता जोपासून गावागावात सुख, समृद्धी आनंद नांदत होतं. आता तसे चित्र दिसत नाही. 


Kavalgaon-India's-first-Happy-Village

           आनंदी गाव प्रकल्प कशासाठी?

लोक अंधारातून प्रकाशाकडे जाण्याऐवजी अंधाराकडून अंधाराकडे चाललीत असे निराशादायी चित्र आहे, ते बदलायचे असेल तर पुन्हा विपश्यनेत सांगितलेल्या सजगता आणि समता यामार्गाचा अवलंब करुन सकारात्मक प्रयत्न करायला हवेत,  त्यासाठी 'आनंदी गाव आनंदी भारत' प्रकल्प सुरू झाला आहे. आनंदी गाव आनंदी भारत हा प्रकल्प विपश्यना विशोधन विन्यास  केंद्र इगतपुरी (नाशिक) यांच्यामार्फत राबविला जात असून महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाचे ही सहकार्य लाभले आहे. गावात अनेक प्रकारच्या समस्या आहेत. व्यसनाधीनता वाढत आहे, त्यामुळे अनेक संसार उद्ध्वस्त होत आहेत. युवक-युवतींमध्ये ताणतणाव दिसत आहे, आत्महत्या, जातीयतेढ, अंधश्रद्धा, बालशोषण, महिलांप्रतिची हिंसा, अशिक्षितपणा अशा अनेक समस्यांचे निराकरण करण्याचा संकल्प विपश्यना विशोधन विन्यासाच्या वतीने करण्यात आला आहे. भारतात ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांची संख्या  67% आहे. खरा भारत येथेच बघायला मिळतो, म्हणून या प्रकल्पाशी गावांना जोडण्यासाठी कार्यशाळा सुरू आहे. त्यात स्वयंसेवकांना प्रशिक्षित करण्याचे काम केले जात आहे. आतापर्यंत 12 कार्यशाळा झाल्यात.


Kavalgaon-indias-first-happy-villege
श्री पूज्य सत्यनारायण गोयंका गुरुजी, विश्व विपश्यनाचार्य
 इगतपुरी (नाशिक)

Kavalgaon-indias-frist-happy-villege
स्वयंसेवकांची कार्यशाळा

आनंदी देशांच्या यादीत भारत 140 क्रमांकावर 

आनंदी देशाच्या यादीत भारताचा 140 वा क्रमांक आहे. यूएनच्या वतीने दर वर्षाला आनंदी देशांची सूची जाहिर केली जाते, यामध्ये यंदा 2018 च्या तुलनेत 7 अंकाची घसरण झाली आहे. 133 व्या क्रमांकावर असलेला भारत 2019 ला 140 व्या स्थानी घसरला आहे. 2017 ला 118 व्या स्थानी होता. त्यात प्रत्येक वर्षी घसरण सुरुच आहे.



त्यामुळे भारतात आत्महत्याचे प्रमाण अधिक असल्यानेे आपली प्रतिमा आत्महत्याग्रस्त देश अशी बनू पहात आहे.भारतातील हॅप्पीनेस एक्सपर्ट सांगतात की, भारतीय माणूस समाधानी नाही, तो नेहमी दुसऱ्यांना दोषी ठरवतो.  यामुळे सुद्धा भारताचा आनंदाचा स्तर घसरत आहे.

  

   भारतातील धक्कादायक समस्या     

प्रत्येक 10 मधून 9 व्यक्ती तणावग्रस्त, प्रत्येकी 5 व्यक्तीपैकी 1 निराशाग्रस्त, 4 व्यक्तीपैकी 1 चिंताग्रस्त एका तासात  16 व्यक्ती आत्महत्या करतात. प्रतिदिन 847 भारतीय महिलांवर अन्याय-अत्याचार  करुन त्यांना ठार मारले जाते. हुंडयासाठी रोज 20  महिलांचा बळी दिला  जातो. तंबाखू सेवनाने होणाऱ्या कॅन्सरमुळे प्रत्येक वर्षी 60 लाख लोक मरतात असे भीषण वास्तव आहे. 

प्रत्येक गाव सुखी होण्यासाठी प्रत्येक व्यक्ती आधी सुखी होणे गरजेचे आहे. प्रत्येक व्यक्ती सुखी होण्यासाठी त्याचं मन सुखी असणे महत्वाचे आहे. त्यामुळे  मनाला सुखी बनवण्यासाठी मनातील विकार नष्ट करुन मनाचा स्वभाव बदलावा लागेल हे आज शक्य आहे का?  तर हो, आनापाना तथा विपश्यना ध्यानसाधनेद्वारे सहज शक्य आहे.  

Kavalgaon-India's-first-Happy-Village
हॅप्पी व्हिलेज प्रकल्पाला मिळालेला प्रतिसाद

पूज्य श्री सत्यनारायण गोयंकाजी म्हणतात, विपश्यनेचा डंका सर्वत्र वाजलाय 125  देशात 199 विपश्यना केंद्र सुरू आहेत. भारताच्या शहरी भागातील लोक विपश्यना ध्यानसाधने विषयी अवगत आहेत. लाखो लोक जगण्याच्या या कलेद्वारे दुःखातून मुक्त होत आहे. मात्र ग्रामीण भागात याविषयी फारशी कल्पना नाही. 
विश्व विपश्यनाचार्य श्री सत्यनारायण गोयंका गुरुजी यांचे स्वप्न होते. प्रत्येक गाव हे आनंदी आणि सुखी झाले पाहिजे, विपश्यनेद्वारे दुःख मुक्ती  संभव  आहे.  त्याचे शास्त्रोक्त  प्रशिक्षण देवून सर्वत्र शांती, सद्भावना स्नेह वाढण्यास मदत होईल असा ठाम विश्वास त्यांना होता. श्री गोयंका गुरुजींचे हेच स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न विपश्यना विशोधन विन्यास करत असून त्यांनी दाखविलेल्या मार्गावर सकारात्मक मार्गक्रमण सुरू आहे.


Kavalgaon-India's-first-Happy-Village
आनापाना ध्यानसाधनेसाठी उपस्थित विद्यार्थी, विद्यार्थिनी


विपश्यना विशोधन विन्यासाची हॅप्पी व्हिलेजसाठीची तळमळ

सुख म्हणजे काय ते अनुभवायचे असेल तर परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील कावलगावाला भेट द्यायला हवी, 5,273 लोकसंख्या असलेल्या गावात काही लोकांच्या हाताला काम नाही, तणावग्रस्त चेहरे,दारू आणि तंबाखू सेवनाच्या आहारी गेलेली युवापिढी अशिक्षित, अंधश्रध्देचा पगडा, तंटे, उदासी, चिंता निराशा असे चित्र होते, हे चित्र बदलण्यासाठी विपश्यना विशोधन विन्यास इगतपुरी केंद्राने सर्व जबाबदारी डॉ. संग्राम जोंधळे वरिष्ठ सहा. आचार्य यांच्यावर सोपवली. त्यांनी स्थानिक लोकांशी चर्चा केली. डॉ. अशोक बनसोड आणि आरोग्य परिचारिका उषाताई गायकवाड यांना कल्पना सांगितली, काम सोपे नव्हते त्याला मुहूर्तरूप देण्याचे सर्वानी ठरविले. मग हाती घेतलेला वसा सोडायचा नाही असा चंग बांधून उषाताई कामाला लागल्या. 


Kavalgaon-India's-first-Happy-Village
हॅप्पी व्हिलेजचे महत्व पटवून देतांना डॉ.संग्राम जोंधळे, वरिष्ठ सहा. आचार्य

सुरुवातीला तंबाखू मुक्तीसाठी घेतलेल्या कार्याला चांगला प्रतिसाद मिळाला. १० दिवसीय विपश्यना शिबिरामुळे काही लोकांची दारू आणि तंबाखू सुटली. काही लोकांचे व्यासनाचे प्रमाण कमी झाले. व्यसनमुक्ती हे वर विपश्यनेचे उपफळ आहे. गावात अनेक समस्या आहेत. झगडे, तंटे, ताणतनाव, अज्ञान अंधश्रद्धा, आत्महत्या, बालक आणि महिलांचे शोषण या सर्व समस्या आधी मनातच उत्पन्न होतात. संत तुकाराम म्हणतात, "मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण" मनाला निर्मळ बनविण्यासाठी आनापाना आणि विपश्यना आवश्यक आहे. मात्र कावलगावाला हॅप्पी व्हिलेज बनविण्यासाठी गावकऱ्यांसोबत चर्चा झाली. हा प्रस्ताव महाराष्ट्र शासन आरोग्य विभागास पाठवला. त्यानंतर आरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालकांनी ऑगस्ट 2018 मध्ये कावलगाव हॅप्पी व्हिलेज प्रकल्प (आनंदी गाव प्रकल्प) राबविण्यास हिरवा कंदील दिला.



Kavalgaon-India's-first-Happy-Village
आनापाना ध्यानसाधना करतांना ग्रामस्थ

          गावात घरोघरी आनापाना साधना

शंभर जणांची एक टीम तयार करण्यात आली. दर रविवारी नांदेड येथील विपश्यना केंद्राचा चमू कावलगाव येथे जातो. तेथील  सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांसह प्रशिक्षित साधकांची बैठक होते. त्यानंतर नियोजन करुन सहा ते आठ जणांची टीम प्रत्येकाच्या घरी जाऊन शास्त्रोक्त पद्धतीने आनापाना करुन घेतली जाते. त्यापूर्वी 10 वर्षावरील गावकऱ्यांकडून त्यांचा आनंदीस्तर काढण्याची प्रश्नावली भरुन घेतली जाते. तसेच गावातील सार्वजनिक सभागृहात सर्वाना 10 मिनिटे आनापाना साधना व त्यानंतर मंगलमैत्री दिली जाते. आतापर्यंत हजारो गावकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला आहे. चार स्तरावर हा प्रकल्प राबविला जातो. प्रकल्पाचा कालावधी एक वर्षाचा आहे. मग पुढे 10 मिनिटे सकाळ संध्याकाळ साधना करण्यास सांगितले जाते. त्यानंतर 10 दिवसीय विपश्यना केलेल्या साधकाकडून  एकतास सकाळ एकतास संध्याकाळ विपश्यना केली जाते. सामूहिक साधनेसाठी  साधक एकत्र बसतात  एक दिवसीय शिबिराचे आयोजन केले जाते, मग दहा दिवसीय  विपश्यना शिबिरात सहभागी होण्यासाठी इच्छुक गावकऱ्यांना विपश्यना केंद्रात पाठविले जाते.

     कावलगावचे आश्चर्यकारक परिवर्तन

आतापर्यंत 4 हजार लोकांना आनापानाचा लाभ झाला. 26 लोकांना दहा दिवसीय शिबिराचा फायदा झाला. गावात 5 ते 7 ठिकाणी आनापाना साधनेचा अभ्यास केला जातोय, गावातील परंपरागत उत्सवात 10 मिनिटे आनापाना साधना केली जाते. जसे हल्दी कुंकू, विवाह समारंभ, दत्त जन्मोत्सव, सावित्रीबाई फुले जयंती आदी कार्यक्रमांमध्ये 10 मिनिटे आनापाना करतात. बचतगटाची सभा असल्यास, गावातील तीन शाळांमध्ये दोन हजार विद्यार्थी आनापाना करतात. तसेच सामूहिक साधना आणि एक दिवसीय शिबिर ही घेतले जातात, त्यात गावकरी आनंदाने सहभागी होतात.


Kavalgaon-India's-first-Happy-Village
आनापाना आणि चर्चेसाठी जमलेले लोक

गावात जेव्हापासून हा प्रकल्प सुरू झाला तेव्हापासून दोन दारूची दुकाने बंद झाली. गावातील राजकीय तंटे कमी झाले. व्यसनाला अनेकांनी मुठमाती दिली. एका महिन्यातच चौघांची तंबाखू  तर दोन लोकांची दारू सुटली गावाच्या भल्यासाठी सर्व जण एकत्र आले. गावात पूर्वीच्या तुलनेत आनंद आणि उत्साह वाढला, गावात शांतता नांदू लागली. शंभर लोकांनी स्वतःहून अतिक्रमण काढले. गावात मिनाताई देशमुख नामक साधीकेस रस्त्यामध्ये पर्स  सापडली पर्समध्ये सोन्याचे आभूषण आणि महत्वाचे कागदपत्रे होती. ती  त्या व्यक्तीस सहीसलामत पोहचवण्यात आली. हॅप्पी व्हिलेज या प्रकल्पामुळे गावातील लोकांच्या मानसिकतेत बदल झाला. शील सदाचार पालनात वाढ झाली.

Kavalgaon-India's-first-Happy-Village
हॅप्पी व्हिलेज प्रकल्पाचे यश

देशातील पहिले आनंदी कावलगाव आणि पहिला आनंदी तालुक्याच्या दिशेने इगतपुरीची वाटचाल

भारतातील पहिला आनंदी गाव प्रकल्प परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यामधील कावलगाव येथे सुरू आहे. तसेच इगतपुरी तालुक्यात ही या प्रकल्पाला सुरुवात झाली आहे. हा संपूर्ण तालुका आनंदी व सुखी करण्याचा विपश्यना विशोधन विन्यास आणी नगरपरिषद इगतपुरी यांचा प्रयत्न आहे.  त्यादृष्टीने काम केले जात आहे त्यासाठी गावातील सामाजिक कार्यकर्ते सुनील रोकडे आणि नगराध्यक्ष कुलकर्णी यांचे सहकार्य लाभत आहे. 

कावलगावानंतर अनेक गावातून हॅप्पी व्हिलेज हा प्रकल्प आमच्या गावात सुरू करावा अशी मागणी केली जात आहे. अंधरातून उजेडाकडे जाणाऱ्या गावकऱ्यांच्या आणि त्यासाठी प्रयत्न करणाऱ्या हॅप्पी व्हिलेज प्रकल्पातील मेहनत घेणाऱ्या सर्वांना उत्तरोउत्तर यश मिळो अश्या सदिच्छा!

  
Kavalgaon-India's-first-Happy-Village
दैनंदिन आनापाना ध्यानसाधना

गावकऱ्यांचा आनंदाचा स्तर कसा मोजला जातो

1) जागतिक आरोग्य संघटनेचे आनंदी स्तराची प्रश्नावली 2) न्यूरोबिक उपकरणाच्या सहाय्याने 3) मेंदूच्या लहरीचा अभ्यास (EEG) 4) जिन्समध्ये (जनुक) परिवर्तन अशा पद्धतीने  मोजला जातो. कावलगावासह 11 गावात हा प्रकल्प सुरू आहे. हिंगोलीतील संतुक पिंपरी, खापरखेडा, कोंडवाडा आणि जालना जिल्ह्यातील कढाळा(बु), असाई या ठिकाणी सुरू आहे. तसेच सांगली जिल्ह्यातील भिलवडी, रास्तेवाडी (सातारा), वाडेगव्हाण (पुणे), मळाजन(धुळे), मुरुंबा ता. जिल्हा परभणी आणि इतर अनेक गावात हा प्रकल्प सुरू आहे.

सध्या कावलगावातील 3 हजारापेक्षा जास्त गावकऱ्यांच्या माहितीचे विश्लेषण आणि वर्गीकरण केले जात आहे. आनापाना आणि विपश्यना ध्यानसाधनेमुळे कावलगावातील लोकांचा आनंदाचा स्तर किती वाढला, तणाव किती कमी झाला यांची नोंद शास्त्रशुद्ध माहिती या प्रकल्पाचा कालावधी संपल्यावर होणारच आहे. पण आतापर्यंत जे सकारात्मक परिणाम  दिसून आलेले आहेत, ते खूप आशादायक, प्रेरणादायक, हितकारी, कल्याणकारी आहेत. दुःखाकडून सुखाकडे, व्यसनधीनतेपासून व्यसनमुक्तीकडे, झगडे-तंटयांपासून सुसंवादाकडे, हिंसेपासून अहींसेकडे, अज्ञानापासून ज्ञानाकडे अंधश्रध्देकडून  वैज्ञानिक श्रध्देकडे , द्वेषाकडून  प्रेमाकडे घेवून जाणारी आहेत. खरोखरच हजारो वर्षापूर्वीच्या आनंदी, सुखी, समृद्ध भारताची निर्मिती होण्यासाठी आपण ही या प्रकल्पात सहभागी होऊ शकता. 
अधिक माहितीसाठी संपर्क :-

डॉ. संग्राम जोंधळे 9422189318, ईमेल-smj9422189318@gmail. com, 

डॉ. निखिल मेहता 9665012251, ईमेल-nikhilmehta68@yahoo.co.in




दिगंबर मराठे
d.n.marathe@gmail.com