राजे तुमचा मान अबाधीत आहे. तुम्ही फडणवीसांप्रतिच्या मैत्रीला जसे जागलात तशीच मैत्री श्रीनिवास पाटील यांनी पवारांप्रति निभावली. मात्र पवार लोकभावाना ओळखणारे जाणतेराजे ठरले. तुमचा रोखठोक बाणा आहे, कदाचित तुम्ही फारसे राजकारण करत नसाल परंतु तुम्ही ज्या पक्षाकडून उभे होता त्यापक्षा विरुद्ध असलेली जनभावना ओळखू शकले नाहीत. असो राजे तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या आणि तुमच्या मित्रत्वाबद्दल जाहिरपणे बोललात तुम्ही तुमची मैत्री जपली वाईट वाटून घेण्याचे कारण नाही.
हारजीत होत असतात, सत्ता येतजात राहते. परंतु माणसाने कायम जमिनीशी नाळ जोडून ठेवायला हवी, हे पवार यांच्या देहबोलीतून समस्त देशवासियांना नेहमीच दिसलेलं. साताऱ्यातून तुमच्या विरुद्ध कोणीच राष्ट्र्वादीकडून उभे राहण्यास तयार नसताना अडचणीच्या काळात पवारांच्या हाकेला श्रीनिवास पाटील धावले.
30 ते 35 वर्षाचा प्रशासकीय अनुभव, दोनदा खासदार, एकदा राज्यपाल अशी पदे भूषविलेले पाटील आरामात आपले जीवन जगू शकले असते पण पवारांच्या मैत्रीच्या हाकेला जागले. 60 वर्षाच्या मैत्रीत उन, वारा, पाऊस संगच झेलत राहिलेल्या पवार, पाटील यांच्या मैत्रीला वरुनराजाने ही सलामी दिली. पवारांचे आवेशपूर्ण शब्द थेट जनतेच्या काळजाला भिडले. दोन्ही मित्रानी एकमेकांना सावरलं आणि राजे तुमच्या मैत्रीपेक्षा 80 वर्षाच्या तरुणांची मैत्री सरस ठरली.
आज धनतेरस, त्यामुळेच मित्रत्वच खरं धन मानून अडचणीत धावून येणारा श्रीनिवास पाटील यांच्या सारखा एक तरी मित्र आपल्या सर्वाच्या आयुष्यात असायला हवा असे वाटते, मैत्री, प्रेम ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. ही संस्कृती जपण्याचे काम पवार, पाटील जोडगोळीने केले, म्हणून ही दोस्ती अशीच पुढे ही कायम राहो अधिक दृढ होवो अशा शुभेच्छा!
दिगंबर मराठे