नाशिक। प्रतिनिधी : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून राज्यावर आलेल्या या संकटात सामोरे जाण्यासाठी आपलाही खारीचा वाटा असावा या उद्देशाने सामाजिक भान राखत नाशिकच्या लाडशाखीय वाणी मित्र मंडळाच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीस अकरा लाखांची मदत देण्यात आली आहे. या मदतीचा धनादेश त्यांनी आज राज्याचे अन्न,नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री ना.छगन भुजबळ यांच्याकडे सुपूर्त केला आहे.
लाडशाखीय वाणी मित्र मंडळ नाशिकच्या सदस्यांनी आज नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री ना.छगन भुजबळ यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ११ लक्ष रुपयांचा धनादेश सुपूर्त केला. यावेळी लाडशाखीय वाणी मित्र मंडळाचे अध्यक्ष सचिन बागड, विश्वस्त दिपक बागड, भगवान खैरनार, राजेश कोठावदे, सचिव निलेश कोतकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. राज्यात निर्माण झालेल्या या परिस्थितीत सामाजिक भान राखत लाडशाखीय वाणी मित्र मंडळाने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ११ लक्ष रुपयांची मदत केल्याबद्दल पालकमंत्री ना. छगन भुजबळ यांनी आभार मानले.