नाशिक जिल्ह्यात कोरोना साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १४४ कलम लागु करण्यात आलेले आहे. या परिस्थितीत नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य विभागाचे संपुर्ण कर्मचारी पूर्णपणे योगदान देत आहेत. जिल्ह्यात आरोग्य कर्मचारी यांची साधारण ४५ टक्के पदे रिक्त असुनही जिल्हा परिषद अस्थापणेसह इतर अस्थापणेवरील आरोग्य कर्मचारी कोरोना साथीच्या काळात चांगले काम करत आहेत. असे असल्याचे सांगून जिप अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी त्यांच्या कामाचे कौतुक करुन समाधान व्यक्त केले
![]() |
फाइल फोटो: उदय रांजणगावकर |
कोरोना साथीच्या कठीण परिस्थितीत आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, ग्रामसेवक चांगले काम करत आहेत. सद्य स्थितीत उन्हाळ्याचे दिवस असतांनाही वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहाय्यीका हे गाव पातळीवर घरोघरी जाऊन संशयीत कोरोनाचा शोध सर्वेक्षण करत आहेत. ग्रामीण भागातील आरोग्य सेवेचा विचार करता कोरोना प्रादुर्भाव हा शहरी भागाच्या प्रमाणात कमी आहे.
आदिवासी भागातील १२६६९८ बालकांना अमृत आहार योजनेचा लाभ
जिल्ह्यात कार्यरत पाणी पुरवठा योजना ग्रामीण भागात प्रभावीपणे काम करत असुन जिल्ह्यात सद्य स्थितीत कुठलीही टंचाई परिस्थिती निर्माण झाल्यास जिल्हास्तरीय पाणी पुरवठा यंत्रणा तात्काळ कार्यवाही करत आहे. कोरोना साथीच्या काळात संपूर्ण जिल्ह्यात जमावबंदी असतांना जिल्हा परिषद अधिनस्त महिला बालकल्याण विभागामार्फत तसेच आरोग्य विभागामार्फत साधारण ५६६८१ गरोदर आणि स्तनदा माता, सहा महिने ते तीन वर्षे वयोगटातील १५८१७५ बालके तसेच तीन वर्षे ते सहा वर्षे वयोगटातील १३०३६८ बालकांची तपासणी करण्यात येत असून त्यांना घरपोच पोषण आहार देण्यात येत आहे. याव्यतिरिक्त नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागातील साधरण१२६६९८ बालकांना अमृत आहार योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत ८१४७२२ अंडींचा पुरवठा करण्यात आला असुन अद्याप नियमित पुरवठा सुरु आहे.
१०९ प्रा. केंद्राना सुरक्षा साहित्याचे वाटप
कोरोना साथीच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागामार्फत जिल्हा स्तरावरुन जिल्ह्यातील कार्यरत १०९ प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी तिहेरी फेस मास्क २०० नग, ५०० मिली सॅनिटायझेर ३० बॉटल, एक लिटर लिक्विड सोप ५० बॉटल व सर्जिकल ग्लोवस १०० पेअर वाटप करण्यात आलेले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर देण्यात आलेले साहित्य आरोग्य कर्मचारी यांना सुरक्षेसाठी देण्याचे निर्देश देण्यात आले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर तत्कालीन परिस्थितीत एन ९५ मास्क आणि पीपीई किट खरेदी कामी वेगळा निधी वितरीत करण्यात आलेला आहे. जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यकतेनुसार प्रतिबंधात्मक साहित्य खरेदी करुन प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर पुरवठा केला जाणार आहे.
जिल्ह्यातील ३३८२ शाळाना तांदूळ वाटप
जिल्ह्यातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शाळा बंद काळात पोषण आहार मिळावा आणि ग्रामीण भागातील मुले पोषण आहारापासून वंचित राहू नये यासाठी जिल्ह्यातील ३३८२ शाळेतील ३३४९५३ विद्यार्थ्यांना तांदुळ साधारण१५३१०२१ किलो व दाळी कडधान्ये साधारण ४९५८४८ किलो असे साधारण वाटप करण्यात आले आहे. कोरोना साथीच्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील आरोग्य कर्मचारी यांच्या अडचणी तथा कोरोना प्रतिबंधात्मक नियोजना संदर्भात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर, उपाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड, शिक्षण व आरोग्य सभापती सुरेखा दराडे, कृषी व पशुसंवर्धन समिती संजय बनकर, महिला व बालकल्याण समिती सभापती अश्विनी आहेर, समाजकल्याण समिती सभापती सुशीला मेंगाळ व विविध पक्षांचे गटनेते हे दूरध्वनी माध्यमातून प्रशासनाशी समन्वय साधुन लॉक डाऊन काळात ग्रामीण जनतेच्या अडचणी व कोरोना प्रतिबंधात्मक करावयाची उपाय योजना या संदर्भात प्रशासनास वेळेवेळी उचित सुचना करत आहेत._ _जिल्ह्यात ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणेसह इतर जिल्हा परिषद यंत्रणा प्रभावीपणे काम करत असल्यामुळे ग्रामीण भागातील कोरोना साथीचा प्रतिबंध लवकर होऊन जिल्हा कोरोना मुक्त होईल असा विश्वास जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर यांनी व्यक्त केली आहे.
गरज पडल्यास सेस निधी :जिप उपाध्यक्ष गायकवाड
जिल्ह्यात ग्रामीण भागात कोरोना साथीच्या काळात आरोग्य यंत्रणेने केलेले काम अभिनंदनीय आहे. आवश्यकता पडल्यास कोरोना साथ प्रतिबंधक औषधी खरेदीसाठी सेस निधी उपलब्ध करुन देण्यात येईल डॉ. सयाजीराव गायकवाड, उपाध्यक्ष तथा अर्थ व बांधकाम समिती यांनी सांगितले
अंगणवाडी सेवीकांचे आभार:आरोग्य सभापती दराडे
जिल्ह्यात जिल्हा स्तरीय आरोग्य अधिकारी यांची रिक्त पदे, आरोग्य कर्मचारी याची मोठ्या प्रमाणातील रिक्त पदे या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रनेसह, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका चांगले काम करत आहे. या यंत्रणेचे धन्यवाद मानावे तेवढे थोडेच आहे . सौ. सुरेखा नरेंद्र दराडे, सभापती आरोग्य व शिक्षण समिती
गर्भवती महिलांना पोषण आहार घरी देणार: सभापती आहेर
जिल्हातील स्तनदा व गर्भवती महिलांना पोषण आहार घरी देण्याबाबत प्रशासनास सुचना देण्यात आल्या आहेत. कोरना लॉक डाऊन काळात कुठल्याही गर्भवती व स्तनदा मातांना काही अडचण असल्यास स्वतः लक्ष घालुन मदत करणार.- अश्विनी आहेर, सभापती, महिला व बालकल्याण समिती
सर्व कृषी दुकाने सुरू ठेवा:सभापती बनकर
जिल्ह्यातील पशु पालकांना अडचण येऊ नये यासाठी दूध पशु पालकांना दूध विक्रीस परवानगी देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना शेती उद्योगास आवश्यक खते व बियाणे यासाठी जिल्ह्यातील सर्व कृषी दुकाने चालु ठेवणेबाबत सुचना देण्यात आल्या आहेत.- संजय बनकर, सभापती, कृषी व पशुसंवर्धन समिती