देशभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरु आहे. अशा परिस्थितीत राज्यातील कुठलाही गोरगरीब, शेतकरी, मजूर, बेघर, विद्यार्थी उपाशी राहू नये यासाठी सरकार विशेष प्रयत्न करत असून राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून नागरिकांसाठी विविध सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तसेच नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी चोवीस तास मदत केंद्र सुरु करण्यात आले असून, त्याद्वारे नागरिकांच्या अडचणी सोडवल्या जात आहे. अशातच सामाजिक, राजकीय तसेच विविध संस्था आणि व्यक्तीही मदतीला पुढे आल्या आहेत. आपले सामाजिक उत्तरदायित्व निभावण्याची ही वेळ, मग त्यात आपला पोशिंदा बळीराजा कसा मागे राहील, खरं तर अनेक संकट झेलणाऱ्यालाच संकटाची जाण असते. शासनासोबतच आपणही आपले सामाजिक कर्तव्य मानून नाशिक जिल्ह्यातील युवा शेतकरी दत्ता रामराव पाटील यांनी निराधार कुटुंबाना आपल्या शेतातील गहू मोफत उपलब्ध करुन दिला. दत्ता रामराव पाटील यांनी केलेल्या सामाजिक कार्यातून समाजापुढे आदर्श निर्माण झाला आहे. त्यांचे हे कार्य अत्यंत कौतुकास्पद असल्याचे ना. छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. याबाबत भुजबळ यांनी दत्ता रामराव पाटील यांच्याशी दूरध्वनी वरुन संपर्क साधून त्यांच्या या उपक्रमाबद्दल कौतुकही केले.
![]() |
फोटो: फाईल |
नाशिक गुडस् आणि ट्रान्सपोर्ट असोसिएशनतर्फे पोलिस आणि गरजूंना मदत
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉक डाऊन सुरू असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी २४ तास काम करणाऱ्या पोलिसांसाठी नाशिक गुडस् आणि नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने सामाजिक भान जपत १६ हजार ८०० पाणी बॉटलचे वाटप करण्यात आले. या सर्व पाण्याच्या बॉटल्स नाशिक पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या कार्यालयाकडे सुपूर्त करण्यात आल्या असल्याची माहिती नाशिक गुडस् ट्रान्सपोर्टचे अध्यक्ष पी. एम.सैनी आणि नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड यांनी दिली. यावेळी सुनील बुरड, महावीर मित्तल, जे. पी.जाधव, प्रदीप जोहर, जयपाल शर्मा, सुभाष जांगडा, संजू राठी, शंकर धनवडे, सिद्धेश्वर साळुंखे, रा.स्व.संघ जनकल्याण समितीचे अनिल चांदवडकर, आदिंसह वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुरुनाथ नायडू उपस्थित होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे अडकलेल्या वाहन चालकासाठी किरणामाल, भाजीपाला आणि अत्यावश्यक वस्तूंचे वाटप केले आहे. तसेच मजूर वर्गासाठी जेवणाची देखील व्यवस्था केलेली आहे. यामध्ये चालकाची जेवणाची व्यवस्था सुरवातीला ४ दिवस केली गेली. त्यानंतर सोशल डिस्टंन्सीग पाळण्यासाठी त्यांना ५ किलो आटा, दोन किलो तांदूळ, एक किलो डाळ, १ किलो तेल, १किलो मीठ, मिर्ची १०० ग्राम,मसाला १०० ग्राम,हळद १०० ग्राम,साबण असे ड्रायव्हर व त्याचा सहायक असे ९५० जणांना १५ एप्रिल पर्यंत पुरेल इतका किराणा पुरविण्यात आला आहे. तसेच त्यांना काही अडचण नको म्हणून नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशन, नाशिक गुड्स ट्रान्सपोर्ट असोशिएशन आणि रा. स्व.संघ जनकल्याण समिती वेळोवेळी मदतीसाठी तत्पर असेल.
![]() |
फोटो: फाईल |
झेप फाउंडेशन आणि जिल्हा महिला राष्ट्रवादीचा 'एक हात मदतीचा'
विषाणूचा प्रादुर्भाव झाला आणि देशात लॉकडाउन करण्यात आले. एक - दोन दिवस नव्हे, तर तब्बल २१ दिवसांचे लॉकडाउन झाल्यामुळे हातावर पोट असणाऱ्या लोकांसमोर रोजच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला. सर्वसामान्य जनतेसमोर उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न उभा राहिल्याने अशा संकट काळात रोजंदारीवर काम करणारे मजुर, गोरगरिब लोकांना दोन वेळ पोट भरणेही अवघड झाले आहे. अशा वेळी मात्र, माणुसकी धावून आल्याचे चित्र भगूर शहरात दिसत आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सौ प्रेरण बलकवडे यांच्या 'एक हात मदतीचा' या संकल्पनेतून गोरगरीब, गरजवंतांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.
राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सौ प्रेरणा बलकवडे यांच्या झेप फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने १०० रिक्षाचालक आणि जवळपास ९०० गरीब कुटुंबांना अन्न धान्याचे वाटप करण्यात आले आहे. लॉकडाउन झाल्यामुळे या लोकांची उपासमार होऊ लागली हाताला काम नाही आणि केलेल्या कामाचा पैसाही नाही. या बाबींचा विचार करून नेहमी लागणारे किराणा गहू, तांदूळ, आदी वस्तू प्रामुख्याने देण्यात आल्या. या संकटाच्या काळात सरकार प्रयत्नांची पराकाष्ठा करत असून प्रत्येकाने जर ठरवले, १-२ कुटुंबाना मदत केली तरी महाराष्ट्रात कोणीही उपाशी झोपणार नाही. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी ‘एक हात मदतीचा’ देऊन माणुसकिच्या नात्याने गरजूंना मायेचा घास भरवावा असं आवाहन प्रेरणा बलकवडे यांनी केलं. यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सौ प्रेरणा बलकवडे विशाल बलकवडे, गोरखनाथ बलवडे, रिक्षा संघटनेचे अध्यक्ष विजय मराठे, राहूल कापसे, अक्षय शेळके, अनिल पवार, योगेश लकारियी आदिंसह भगूरचे नागरिक उपस्थित होते.
![]() |
फोटो:फाईल |
प्रशासनातर्फे बेघर, स्थलांतरीत लोकांसाठी रिलीफ कॅम्प
मुंबई, ठाणे, कल्याण येथून नाशिक येथे स्थलांतरित झालेल्या 590 पैकी 290 लोकांची सुखदेव आश्रम, विल्होळी, 300 लोकांची समाज कल्याण वसतिगृह, नासर्डी नाशिक येथे राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील 81 बेघर व 2 हजार 357 परप्रांतातील अडकलेले मजूर अशा 2 हजार 438 व्यक्तींकरिता जिल्ह्यात 23 ठिकाणी रिलीज कॅम्प सुरू करण्यात आले आहे. यातील 18 कॅम्प हे महानगरपालिका हद्दीत असून त्यामध्ये 1 हजार 334 व्यक्तींच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. या 18 रिलीफ कॅम्पमध्ये सद्यस्थितीला इतर राज्यातील 81 व स्थानिक 75 असे 156 मजूर राहत असल्याची माहिती जिल्हाधिकारी श्री. सूरज मांढरे यांनी दिली आहे.
भारतीय अन्न महामंडळाकडून धान्यपुरवठा
मनमाड येथील भारतीय अन्न महामंडळ गोदामातून 61 ट्रक धान्य प्राप्त करून सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत एप्रिल 2020 मध्ये त्याचे वाटप जिल्ह्यातील सर्व गोदामांमध्ये करण्यासाठी संबंधित गोदामपाल यांचेशी संपर्क साधण्यात आला आहे. तसेच शिव भोजन थाळी केंद्रांना सुधारित सूचनांप्रमाणे थाळी वाटप करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी सांगितले आहे.
![]() |
फोटो:फाईल |
दानशूरांचा पुढाकार
सकल जैन संघटना यांच्यामार्फत सातपूर, अंबड, पाथर्डी, द्वारका ते पाथर्डी पुल, म्हसरूळ, सिडको, आंबेडकर भवन, बजरंगवाडी येथील 2850 लोकांना, तसेच सकल जैन संघटना व वेलकम सहकार्य मित्र मंडळ यामार्फत जुने नाशिक, भद्रकाली, गंगाघाट येथील 300 लोकांना, श्री नविन भाई व रॉबीन हूड आर्मी यांचेमार्फत उपनगर येथे 500 लोकांना तपोवन मित्र मंडळ व रॉबिन हूड आर्मी यांचेमार्फत पेठ रोड, दिंडोरी रोड कॅनालजवळ भारत नगर, राजीवनगर येथील 1500 लोकांना, श्री गुरुद्वारा शिंगाडा तलाव व रॉबिन हूड आर्मी यांचेमार्फत गंजमाळ, केरळी समाज, सातपूर येथील 500 लोकांना, श्री गुरुद्वारा देवळाली व रॉबीन हूड आर्मी यांचेमार्फत देवळाली गाव, गांधीधाम, धोंगडे नगर, शिवाजी वाडी, भारत नगर, गितेवाडी येथील 700 लोकांना, अमिगो लॉजिस्टिक्स इंडिया व दिनियात संस्था यांचेमार्फत 700 लोकांना, वुई फाउंडेशन यांचेमार्फत सिविल हॉस्पिटल नाशिक येथे 50 लोकांना, हेल्पिंग हॅप्पी हँडस ग्रुप यांचेमार्फत टाकळी गाव, आदिवासी वस्ती येथील 300 लोकांना, सुजान नागरिक मंच यांच्यामार्फत कांबळे वाडी येथे 400 लोकांना, वेलकम सहकारी मित्र मंडळ यांचेमार्फत 300 लोकांना, लक्ष्मीनारायण संस्थान यांचेकडून 300 लोकांना, श्री. मनिष नोडिया व रॉबीन हूड आर्मी यांच्याकडून कांबळे वाडी येथे 300 लोकांना, श्री अनिकेत उपासणी यांच्यामार्फत रंगरेज कॉलनी येथील 78 लोकांना, अशा एकूण 9 हजार 228 लोकांना अन्नदान करण्यात आले आहे.
फोटो:फाईल
![]() |
जीवनावश्यक उद्योगांना परवाने
संचारबंदी काळात जिल्ह्यातील जीवनावश्यक उद्योगधंदे सुरू ठेवण्याबाबत काही अटींवर परवानगी दिली आहे. याबाबत आज अखेर 152 अर्जांपैकी 93 उद्योगांना त्यांच्या आस्थापना सुरू ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली असून 15 उद्योगांच्या नाकारल्या आहेत. तसेच 44 अर्जांवर कार्यवाही प्रलंबित असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी शहरातील आजअखेर 223 किराणा दुकानाची पाहणी केली असून 52 किराणा दुकानदारांना आवश्यक ती काळजी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात पाच ठिकाणी तर मनपा हद्दीत 18 ठिकाणी बेघर व स्थलांतरीत नागरीकांसाठी रिलीफ कॅम्पची व्यवस्था आहे.