मुंबई/नाशिक। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकही नागरिक उपाशी राहू नये यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत असून प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत प्रति व्यक्ती ५ किलो मोफत तांदूळ योजनेतून राज्यात गेल्या आठ दिवसात २ लक्ष ९३ हजार शिधापत्रिका धारकांना मोफत तांदळाचे वाटप करण्यात आले आहे. राज्यात इतर सर्वत्र दि.१२ एप्रिल २०२० पर्यंत मोफत तांदळाचे वितरण सुरु होईल अशी माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री ना.छगन भुजबळ यांनी दिली आहे.
![]() |
फोटो: फाईल |
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्थे मार्फत सर्व पात्र अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना नियमित धान्य घेतल्यानंतर एप्रिल ते जूनपर्यंत प्रती लाभार्थी प्रती महिना ५ किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. सदर योजनेअंतर्गत प्रती व्यक्ती ५ किलो मोफत तांदळाचे दि. १२ एप्रिल २०२० पर्यंत संपूर्ण राज्यात वितरण करण्यात येईल. हे धान्य एप्रिलसोबतच मे आणि जूनमध्ये सुद्धा त्या त्या महिन्यात उपलब्ध करून दिले जाणार आहे. वास्तविक मोफत तांदूळ १५ एप्रिल २०२० पासून देण्याचे नियोजन होते. मात्र राज्यातील नागरिकांना याचा लाभ लवकरात लवकर मिळावा यासाठी भारतीय खाद्य निगम तसेच वाहतूकदार आणि सबंधित यंत्रणांशी सातत्याने संपर्क करत हा तांदूळ कमी दिवसांमध्ये रेशन दुकानांमध्ये पोहचवून राज्यात अनेक ठिकाणी २ एप्रिल २०२० पासूनच त्यांचे वितरण सुरु करण्यात आले असल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली.
या योजनेअंतर्गत राज्यात गोंदिया जिल्ह्यात २ एप्रिल, चंद्रपूर जिल्ह्यात ३ एप्रिल, भंडारा, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४ एप्रिल, वर्धा, ठाणे, रायगड,अकोला जिल्ह्यात व नागपूर शहरात ५ एप्रिल, उस्मानाबाद, रत्नागिरी, नागपूर जिल्ह्यात ६ एप्रिल, गडचिरोली ७ एप्रिल, बुलढाणा आणि यवतमाळ जिल्ह्यात ८ एप्रिल पासून मोफत तांदळाचे वाटप करण्यात येत आहे.
उर्वरित महाराष्ट्रातील वाशीम, लातूर जिल्ह्यात ९ एप्रिल पासून, नाशिक, अहमदनगर, जळगाव, अमरावती, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, पुणे शहर, पुणे ग्रामीण, सोलापूर शहर, सोलापूर शहर, सोलापूर ग्रामीण, सातारा, सांगली, कोल्हापूर, पालघर या जिल्ह्यात १० एप्रिल पासून तर धुळे, नंदुरबार, औरंगाबाद, अ परिमंडळ परेल, ई परिमंडळ वडाळा, फ परिमंडळ ठाणे, ड परिमंडळ सांताक्रूझ, ग परिमंडळ कांदिवली या भागात दि.१२ एप्रिल २०२० पासून केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत प्रती व्यक्ती ५ किलो मोफत तांदळाचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.