नाशिक/प्रतिनिधी: जिल्ह्यातील सुमारे एक हजार स्वॅब अहवाल हे स्थानिक लॅब, आंध्र प्रदेशातील किट पुरवठादार, जे.जे.रूग्णालयात नव्याने कार्यान्वित होणाऱ्या लॅबच्या माध्यमातून तत्काळ कसे प्राप्त करून घेता येतील याचे नियोजन करावे अशा सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री ना. छगन भुजबळ यांनी आज येथे दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत ना. भुजबळ बोलत होते. ना. भुजबळ पूढे म्हणाले की, आपल्या जिल्ह्यात एकही कोरोना संसर्गित नव्हता; आज तो सर्वदूर पसरला आहे. शहरी भागातील संसर्ग आज तालुकास्तरावर ग्रामीण भागातही जाऊन पोहोचला आहे. अशा परिस्थितीत जिल्हास्तरीय यंत्रणा व तालुकास्तरीय यंत्रणांनी आपसातील समन्वय बळकट करणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील प्रलंबित स्वॅब अहवाल लवकरात लवकर निकाली काढुन पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांवर तात्काळ इलाज कसे करता येतील यासाठीचे नियोजन करणे गरजेचे आहे.
जिल्ह्यात सुमारे एक हजार स्वॅब अहवाल हे स्थानिक लॅब, आंध्र प्रदेशातील किट पुरवठादार, जे.जे.रूग्णालयात नव्याने कार्यान्वित होणाऱ्या लॅबच्या माध्यमातून तत्काळ कसे प्राप्त करून घेता येतील याचे नियोजन करावे. जेजेमध्ये होणाऱ्या लॅबमध्ये दिवसाला ३०० नमुन्यांच्या तपासणीची क्षमता राखीव ठेवण्यात आली आहे, त्यामुळे प्रलंबित अहवालांची संख्या दिवसेंदिवस कमी होईल. कोविड व्यतिरिक्त इतर आजारांवर उपचार घेण्यासाठी आलेल्या रूग्णांचा स्वॅब घेतल्यानंतर त्याला घरी जाण्याची परवानगी देण्यात यावी. इतर आजारांचे पेशंट हे कोरोना संशयीत नाहीत, ज्यांना घरीच विलगीकरण, अलगीकरण शक्य आहे त्यांचा व ज्यांना शक्य नाही त्यांचा सारासार विचार करून निर्णय घेण्यात यावा, शासनाच्या मार्गदर्शक सूचना गरज लक्षात घेऊन आंमलात आणाव्यात.
विभागीय आयुक्त राजाराम माने, पोलीस महानिरीक्षक छेरींग दोरजे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, नाशिक शहर पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड, सहाय्यक जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद, आरोग्य उपसंचालक श्री. पठाणकोट शेट्टी, जिल्हा शल्यचिकित्सक सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी आदि उपस्थित होते.