भगूर/प्रतिनिधी: नगरपरिषद हद्दीतील शौचालयांची दुरावस्था झाली आहे. कोरोना महामारीचे संकट समोर असतांना सार्वजनिक मूलभूत सुविधांचा अभाव प्रकर्षाने दिसून येत आहे. नादुरुस्त शौचालयांचे नुतनीकरण न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांनी दिला आहे.
यापूर्वी देखील राजवाडा परिसर येथे झालेला शौचालयाचा स्फोट व सध्या शाळेच्या बाजूला असलेल्या शौचालयाचे बांधकाम दुसऱ्यांदा स्फोट होऊन कोसळले आहे. स्फोट होऊन टाकी फुटल्याने बाजुला शाळेच्या परीसरात मल पसरलेला असून, दुर्गंधी पसरली होती. सुदैवाने अश्या परीस्थितीत शाळा चालू नसल्याने मोठी जीवितहानी टाळता आली. भगूर नगरपरिषदेस मिळालेला स्वच्छता पुरस्कार हा फक्त कागदी घोडे नाचवून मिळालेला असल्याचे यावरुन स्पष्ट होत असून नगरपरिषद प्रशासन नागरिकांचे आरोग्य धोक्यात घालून त्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप बलकवडे यांनी केला आहे. सद्यास्थितीत जे सार्वजनिक शौचालय जनतेसाठी खुली आहेत अश्या नादुरुस्त शौचालयांचा वापर करणे नागरिकांना विशेषकरुन महिला व लहान मुलांना खूप धोकादायक असून, भगूर नगरपरीषदेने लवकरात लवकर नव्याने योग्य वापरता येईल अश्या पद्धतीची शौचालय व्यवस्था करावी अन्यथा आम्ही प्रशासनाविरुध्द जनआंदोलन उभे करू असाही इशारा बलकवडे यांनी दिला आहे.
पालकमंत्री. ना भुजबळ यांच्याकडे पाठपुरावा करू
भगूर नगरपरिषदने नागरीकांच्या आरोग्याची काळजी घेऊन लवकरात लवकर मूलभूत सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, महत्वाच्या शौचालयांची दुरावस्था दूर करुन ती सुव्यस्थित करावीत अन्यथा आंदोलन करू तसेच यासाठी आपण राज्याचे आरोग्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री ना छगन भजबळ यांच्याकडे ही पाठपुरावा करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष बलकवडे यांनी सांगितले