मालेगाव : शहरात कोरोनाचा कहर सुरुच असून करोना बधितांची संख्या वाढत असतांनाच आता येथील महापालिका आयुक्त व सहाय्यक आयुक्तांना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.आज सायंकाळी दि.१३ मे रोजी प्राप्त झालेल्या ४० अहवालात २३ निगेटीव्ह तर ११ पॉझिटीव्ह अहवाल आले आहे.यातील ६ अहवाल पुन्हा (रिपीट) पॉझिटीव्ह आले आहे. त्यामध्ये मालेगाव मनपा आयुक्त यांचा अहवाल देखील करोना पॉझिटीव्ह आहे. आतापर्यंत मालेगावात ५८२ जण बाधीत झाले आहे.
फोटो: फाईल |
अमरावतीला जिल्हा प्रशासन अधिकारी म्हणून नेमणूक असलेल्या या अधिकाऱ्याची नुकतीच मालेगाव येथे आयुक्तपदी नियुक्ती झाली होती. आपला पदभार स्वीकारल्यानंतर आयुक्तांनी अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गैरहजर राहिल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता.शहरातील वाढत्या रुग्ण संख्येमुळे मालेगाव हॉटस्पॉट संपूर्ण ठरले आहे त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष शहराकडे लागले आहे.
या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे हे मालेगाव शहरात आरोग्य यंत्रणेच्या आढावा बैठकीसाठी आले असता, त्यांच्या उपस्थितीत ना.दादा भुसे व शहरातील सर्व प्रशासन अधिकाऱ्यांसह बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस आयुक्त स्वतः हजर होते. मात्र यावेळी त्यांना आपण स्वतः करोना बाधित असल्याची माहिती मिळताच त्यांनी बैठकीतून काढता पाय घेतला. तसेच एकाच दिवसात २५ पोलिसांचे ही अहवाल पॉझिटीव्ह आले आहे. नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधीत संख्या ७४३ झाली असून त्यात १४० पोलिस बाधीत आहेत.
.