मुंबई: कोरोनाच्या संकटामुळे राज्य शासनाची सध्याची आर्थिक स्थिती नाजूक आहे. शासनाच्या या अडचणीत आर्थिक सहाय्य व्हावे यासाठी महाराष्र्ट् राज्यातील सर्व सरकारी कर्मचा-यांच्या माहे मे २०२० च्या वेतनातून, एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री निधीकडे वळते करावेत, असे संघटनेच्या वतीने शासनास निवेदन देऊन कळविले आहे. साडेपाच लाख सरकारी कर्मचारी वर्गाचे अंदाजीत रु.३०० कोटी रुपयांचे सहाय्य शासनास लाभणार आहे.
मा.आर.जी.कर्णिक प्रणीत राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्र्टात गेली ५८ वर्षे कर्मचारी व शासन यांच्यातील दुवा ठरली असुन राज्य शासन व कर्मचारी यांच्यातील दुवा ठरली असुन राज्य शासन व कर्मचारी यांच्यातील सुसंवाद कायम राखण्याचे मदतकार्य सतत पार पाडीत असते.
कोरोना महामारीच्या सध्याच्या काळात मार्च २०२० चे वेतन २५ टक्के कमी घेऊनही अहोरात्र सेवा व इतर जनताभिमुख सेवा देण्यासाठी या कर्मचाऱ्यांनी कधीही कुचराई केली नाही. शासनाने सुध्दा या संदर्भात अनेकवेळा कृतज्ञता व्यक्त केली आहे.राज्य सरकारी कर्मचारी हा राज्य शासनाचा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे कोणत्याही अडचणीच्या काळात एकमेकांना सहाय्य करणे, परस्परांच्या हितास पूरक आहे.
आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर संघटनेने घेतलेल्या सकारात्मक भूमिकेचे स्वागत करुन मा.ना.श्री अजितदादा* पवार, उपमुख्यमंत्री यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस योगदान दिल्याबद्दल सरकारी कर्मचाऱ्यांसह मध्यवर्ती संघटनेस धन्यवाद दिले आहेत असे संघटनेचे सरचिटणीस विश्वास काटकर आणि प्रसिद्धी प्रमुख सुरेंद्र सरतापे यांनी सांगितले आहे.