- जिल्ह्यातील आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणासाठी ३५ कोटी उपलब्ध: ना. भुजबळ - TheAnchor

Breaking

October 12, 2020

जिल्ह्यातील आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणासाठी ३५ कोटी उपलब्ध: ना. भुजबळ

नाशिक| जिल्हयातील कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत उपाययोजना करण्यात येत आहे. तसेच कोविड कालखंडात पुरवण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधांचे बळकटीकरण करण्यासाठी शासन निर्देशानुसार २०२०-२१ वर्षाकरिता विविध योजनांच्या माध्यमातून ३५ कोटी ५३ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असल्याची माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

या संदर्भात अधिक माहिती सांगताना पालकमंत्री श्री. भुजबळ म्हणाले, जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेअंतर्गत २०२०-२१ या वर्षाच्या पूनर्विनियोजनातून २८ कोटी ३५ लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या अनुषंगाने आमदार स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रमातून ५ कोटी १७ लक्ष, खासदार स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रमातून रुपये १ कोटी आणि जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना अंतर्गत शासनाकडून १० टक्के प्राप्त निधीपैकी २२.९४ लाख रुपयांचा निधी कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कार्यान्वित यंत्रणांना उपलब्ध करून देण्यात आला असल्याचेही पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले आहे.

आरोग्य विभागासाठी यापूर्वी मूळ तरतुदीनुसार रु.५ कोटी ६५ लक्ष व पुनर्विनियोजनातून रुपये २८ कोटी ३५ लक्ष असा एकूण ३४ कोटी ८६ लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यापुढील काळातील कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी ३६ कोटी ११ लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध असल्याने आरोग्य सुविधा पुरविणाऱ्या कार्यान्वित यंत्रणाच्यामार्फत जिल्हास्तरीय समितीच्या मान्यतेने संबंधित यंत्रणांकडून निधी मागणीचे प्रस्ताव प्राप्त झाल्यास संबंधित यंत्रणांना निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही श्री. भुजबळ यांनी सांगितले.