- 'एमपीएससी'ची पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय - TheAnchor

Breaking

October 9, 2020

'एमपीएससी'ची पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय

मुंबई| महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून रविवार दि. ११ ऑक्टोबर २०२० रोजी घेण्यात येणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२० पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले. या परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना पुढे नव्याने जाहीर होणाऱ्या परीक्षेस बसता येणार असून कुणीही अपात्र ठरणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.


कोरोना प्रादुर्भावाची परिस्थिती आणि विविध घटकांशी केलेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. यावेळी मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, जलसंपदा जयंत पाटील, परिवहनमंत्री अनिल परब, खासदार अनिल देसाई उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, गेल्या चार महिन्यांपासून कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यातील शाळा, महाविद्यालये, अभ्यासिका वर्ग बंद आहेत. या परिस्थितीचा तसेच विविध घटकांकडून, विद्यार्थ्यांकडून आलेल्या सूचनांचा सारासार विचार करून ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. यापूर्वीही दोन वेळेस ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. कोरोना प्रादुर्भावाची परिस्थिती आणि काही उमेदवार कोरोनाग्रस्त असल्याने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या परीक्षेचा सुधारित कार्यक्रम राज्य लोकसेवा आयोगाकडून स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल. ११ ऑक्टोबर २०२० च्या परीक्षेत प्रवेश पत्र देण्यात आलेल्या सर्व उमेदवारांस सुधारित दिनांकाच्या परीक्षेत बसता येईल. म्हणजेच जाहिरातीनुसार वयोमर्यादा गणण्याचा दिनांक १ एप्रिल २०२० हाच कायम राहील.