नंदुरबार| प्रतिनिधी| आपल्याला शिपाई होऊन चालणार नाही, तुम्हाला अधिकारी व्हावे लागेल नुसतेच पोलीस भरतीचे उद्दिष्ट ठेवू नका स्वप्न थोडे मोठे ठेवा असे आवाहन पोलिस उपअधीक्षक सचिन हिरे यांनी केले आहे. जागतिक शौचालय दिनानिमित्ताने साई कॉम्पिटिशन अकॅडमीतर्फे ई- मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली होती. त्यानंतर आयोजित प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाप्रसंगी साई कॉम्पिटिशन अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना विसरवाडी येथे मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी व्यासीठावर नंदुरबार जिल्ह्यातील पोलीस उपअधीक्षक सचिन हिरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा नवापुर तालुक्यातील भाजपाचे तालुकाध्यक्ष भरतभाऊ गावित, विसरवाडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, साई कॉम्पिटिशन अकॅडमीचे संचालक प्रा. एन जी वसावे, जयसिंग गावित, सार्वजनिक कला आणि वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ए .के पाटील आणि हायस्कूलचे प्राचार्य सोनार सर आदी उपस्थित होते याप्रसंगी विजयी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
हिरे पुढे म्हणाले, नंदुरबार मध्ये मला अकॅडमी बघायला मिळाली नाही, मात्र विसरवाडी सारख्या छोट्या गावात ती बघायला मिळाली यांच समाधान आहे. तुमच्यात प्रतिकूल परिस्थितीशी झगडण्याची क्षमता निर्माण झाली आहे. त्यामुळे तुम्ही मोठया गोष्टी करण्यासह मोठी स्वप्ने ही बघू शकता असा विश्वास व्यक्त केला.
नंदुरबार जिल्ह्याचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा नवापुर तालुक्यातील भाजपाचे तालुकाध्यक्ष भरतभाऊ गावित यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, आपल्यासमोर जी माती आहे त्या मातीपासून कुंभार त्याला हवा तसा आकार देत मटकी घडवू शकतो. तसेच व्यासपीठावरील गुरुजन वर्गाचे आहे. ते जसा रंग आकार देतील तसे तुम्ही घडाल असे सांगितले. सहायक पोलिस निरीक्षक संदिप पाटील आणि प्राचार्य डॉ. ए के पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.