मुंबई| माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या प्रवेशामुळे नाशिक मध्ये भारतीय जनता पार्टी आणखी मजबूत होईल, असा विश्वास माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. सानप यांनी सोमवारी मा. फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. या प्रसंगी मा. फडणवीस बोलत होते.
भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते गिरीश महाजन, माजी मंत्री जयकुमार रावल, आशीष शेलार, प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय, आ. देवयानी फरांदे, आ. सीमा हिरे आदी मान्यवर उपस्थित होते.
मा. फडणवीस म्हणाले की, आगामी काळात भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक मंडळी प्रवेश करणार आहेत. सत्ताधारी पक्षांतील अस्वस्थता लक्षात आल्यानेच या पक्षांचे नेते भाजपा आमदार फुटणार असल्याच्या अफवा पसरवत आहेत. मात्र भाजपातून एकही आमदार फुटणार नाही.
प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, काही गैरसमजांमुळे बाळासाहेब सानप हे पक्षाबाहेर पडले होते. आता सर्व गैरसमज दूर झाले आहेत. श्री. सानप यांना राजकारणाचा दीर्घ अनुभव आहे. सानप यांचा अनुभव लक्षात घेऊन त्यांना पक्षाची जबाबदारी सोपविली जाईल. आता नाशिक मधील कार्यकर्त्यांनी एकोप्याने काम करावे.