नाशिक|विशेष प्रतिनिधी| नाशिक परिसरातील मुस्लिम समाजासाठी वडाळागाव या ठिकाणी असलेल्या कब्रस्तानच्या जागेचा प्रश्न मार्गी लावून भूसंपादनासाठी तब्बल 60 कोटी रुपयांची तरतूद करून ऐतिहासिक काम करणारे नाशिक नगरीचे महापौर सतीश कुलकर्णी यांचा मुस्लिम समाजाच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. तसेच लवकरात लवकर काम सुरु करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
महापौरांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या रामायण बंगल्यावर झालेल्या कार्यक्रमात पाठपुरावा करणाऱ्या प्रभाग क्रमांक 23 च्या भाजपच्या नगरसेविका शाहीन मिर्झा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभाग क्रमांक 14 च्या नगरसेविका समीना मेमन यांचेही यावेळी आभार मानण्यात आले. खतीब - ए- नाशिक हाफिज हिसामुद्दीन अशरफी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून भाजप गट नेता जगदीश पाटील, माजी नगरसेवक हाजी निजाम कोकणी, गुलजार कोकणी, लाला भाई, हाजी सलीम मिर्जा, प्रताप मेहरोलीय आदी उपस्थित होते. झाकीर शेख व फारूक पठाण यांनी सूत्रसंचालन केले.
मी माझे कर्तव्य पार पाडले. महापालिकेकडून सर्वसामान्य लोकांना लाभ मिळालाच पाहिजे, एकीकडे शहराचा चौफेर विकास होत असताना मुस्लिम समाजाला दफनभूमीसाठी अडचण नको म्हणून निधी उपलब्ध करून दिला. आता लवकरच जमीन ताब्यात घेऊन काम सुरू करण्याचे आश्वासन यावेळी महापौर कुलकर्णी यांनी दिले. अक्रम खतीब, हाजी शोएब मेमन, राजू सय्यद, शेखन खतीब, जुबेर हाश्मी, असिफ शेख, रफिक शेख, मिनाज मिर्जा यांच्यासह समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.