- दिड कोटींचे बनावट हॉलमार्क केलेले सोने जप्त; 'बीएसआय'चे महाराष्ट्रात छापे - TheAnchor

Breaking

January 22, 2023

दिड कोटींचे बनावट हॉलमार्क केलेले सोने जप्त; 'बीएसआय'चे महाराष्ट्रात छापे

मुंबई|भारतीय मानक ब्युरोने (बीआयएस ब्युरो) सोन्याच्या दागिन्यांवरील बीआयएस चिन्हाचा गैरवापर रोखण्यासाठी शुक्रवारी राज्यातील प्रमुख शहरांमध्ये विशेष छापे टाकून कारवाई केली. या छाप्यात दीड कोटींचे बनावट हॉलमार्क केलेले सोने जप्त करण्यात आले.  'बीएसआयने केलेल्या या कारवाई मुळे बनावट हॉलमार्क बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. 
यावेळी मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूर या मुख्य शहरांसह महाराष्ट्रातील 6 ठिकाणी एकाच वेळी छापे टाकण्यात आले. मुंबईतील झवेरी बाजार येथे सोन्याच्या दागिन्यांवर बनावट हॉलमार्किंग करणाऱ्या दोन आस्थापनांवर छापे टाकून कारवाई केली, त्यात सुमारे 1.5 कोटी रुपयांचे 2.75 किलो सोन्याचे दागिने जप्त करण्यात आली.

मेसर्स श्रीशंकेश्‍वर ॲसेइंग अँड टंच, झवेरी बाजार, मुंबई, मे. जय वैष्णव हॉलमार्किंग सेंटर, झवेरी बाजार, मुंबई, मे. विशाल हॉलमार्किंग सेंटर, जांभळी नाका, ठाणे,मेसर्स श्रीशंकेश्‍वर ॲसेइंग अँड हॉलमार्किंग सेंटर, अंधेरी, मुंबई, मे. जोगेश्वरी ॲसेइंग अँड हॉलमार्किंग सेंटर, रविवार पेठ, पुणे आणि मे. रिद्धी सिद्धी हॉलमार्क, इतवारी, नागपूर या ठिकाणी  छापा टाकून जप्तीची कारवाई करण्यात आली.


बीआयएस कायदा 2016 नुसार, बीआयएस मानक चिन्हाचा गैरवापर केल्यास दोन वर्षांपर्यंत कारावास किंवा किमान 2 लाख रुपये दंडाची शिक्षा आहे, परंतु हॉलमार्कसह किंवा बीआयएस कायदा 2016 नुसार स्टँडर्ड मार्कसह चिकटवलेल्या किंवा लागू केलेल्या वस्तूच्या मूल्याच्या दहापट सुध्दा ही रक्कम वाढविता येते. या प्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अशा बेकायदेशीर बनावट मार्किंगमध्ये सहभागी असलेल्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.


हॉलमार्किंगची प्रक्रिया

बिआयएस हॉलमार्किंगचे सध्या 3 भाग आहेत - बिआयएस चिन्ह (लोगो), कॅरेटची शुद्धता आणि सूक्ष्मता आणि 6 अंकी अल्फान्यूमेरिक "हॉलमार्किंग युनिक आयडेंटिटी नंबर(HUID)" जो प्रत्येक वस्तू/ कलाकृतीसाठी वेगळा आहे. दागिने फक्त बिआयएसमध्ये नोंदणीकृत केलेल्या सराफांमार्फत विकले जाऊ शकतात आणि फक्त बिआयएस मान्यताप्राप्त ॲसेइंग आणि हॉलमार्किंग सेंटर (एएचसीएस)द्वारे हॉलमार्क केले जाऊ शकतात.