नाशिकरोड| दि. गवर्नमेंट ऑफ इंडिया प्रेस एम्प्लॉइज गांधीनगर सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक (२०२२,२३ -- २०२६, २७) पार पडून त्यात परिवर्तन पॅनल विजयी ठरले. विजयी उमेदवारांचे अभिनंदन करण्यात आले. गांधीनगर प्रेस सोसायटी निवडणुक आज घेण्यात येऊन त्यात प्रतिस्पर्धी कामगार पॅनलला हरवून परिवर्तन पॅनल विजयी ठरले.
एकूण १५ जागांसाठी निवडणूक घेण्यात आली. ११६ सभासदांनी मतदान केले. ११० मते वैध ठरविण्यात आली. दोन्ही पॅनलचे एकूण २९ उमेदवार रिंगणात होते. सर्वसाधारण गटातून प्रमोद पवार, संदीप गायकवाड, शेखर साळुंखे, प्रवीण पवार, गणेश रोकडे, कुंदन गायकवाड, कैलास आवारे, गोकुळ बोराडे, चेतन दाणी, बाळू भांगरे विजयी झाले.
महिला राखीव गटातून गीतांजली कोरडे, निता शिरसाठ, ईतर मागासवर्ग प्रवर्ग गटातून दिलीप बोराडे, भटक्या विमुक्त जाती/जमाती व विमाप्र गटातून सुधीर जोशी, अनुसूचित जाती/जमाती गटातून दीपक घोलप विजयी झाले.
गांधीनगर येथील वेल्फेअर क्लब हॉल येथे मतमोजणी झाली. निवडणूक निर्णय अधिकारी तालुका उपनिबंधक कार्यालयातील कैलास आढाव व सहकाऱ्यांनी विजयी उमेदवारांचे नावे घोषित केले. यावेळी गुलालाची उधळण तसेच फटाक्यांच्या आतषबाजी करून गांधीनगर प्रेस कर्मचाऱ्यांतर्फे जल्लोष करण्यात आला. विजयी उमेदवारांवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कामगार पॅनलचे जीप तथा परिवर्तन पॅनलचे विमान असे निवडणूक चिन्ह होते.