- साहित्यकणा फाऊंडेशनचे संमेलन ऊत्साहात; वरिष्ठ पत्रकार ब्रिजकुमार परिहार यांचा वृत्तसेवारत्न पुरस्काराने गौरव - TheAnchor

Breaking

February 13, 2023

साहित्यकणा फाऊंडेशनचे संमेलन ऊत्साहात; वरिष्ठ पत्रकार ब्रिजकुमार परिहार यांचा वृत्तसेवारत्न पुरस्काराने गौरव

नाशिक| येथील साहित्यकणा फाऊंडेशनच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन श्री. सबनिस यांच्या हस्ते झाले. युवा साहित्य अकादमी पुरस्कार विजेते ऐश्‍वर्य पाटेकर संमेलनाध्यक्ष होते. पं. अविराज तायडे, यशवंत पाटील, फाऊंडेशनचे अध्यक्ष संजय गोराडे, सचिव विलास पंचभाई व्यासपीठावर होते. 
श्री. सबनिस म्हणाले की, संयोजक म्हणून मंचावर बसणारे, मिरवणारे अनेकजण असतात. परंतु, साहित्यकणा फाऊंडेशनचे अध्यक्ष व सचिव हे दोन खंदे पदाधिकारी ज्या तळमळीने संमेलनासाठी राबत आहेत, ते खरोखरच कौतुकास्पद आहे. अध्यक्षिय भाषणात श्री. पाटेकर म्हणाले की, अखिल भारतीय साहित्य संमेलनांत फक्त गर्दी होते. तेथे तळमळ दिसत नाही. अशा छोटेखानी संमेलनांतूनच साहित्यिक घडत असतात. साहित्यावर आतापर्यंत खुप बोललं गेलं, लिहिलं गेलं. पण, अशा माणसांवर बोललं पाहिजे. सुरवातीला प्रणव पाटणकर, विलास पाटणकर आदींनी स्वागतगीत सादर केले. सुरेखा बोऱ्हाडे यांनी सूत्रसंचालन केले. 

दरम्यान, उद्‌घाटन सत्रानंतर रावसाहेब जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तरीय साहित्यकणा काव्य स्पर्धेत तब्बल ७० कवींनी सहभाग घेतला. त्यात धुळे, औरंगाबाद, अमरावती, रत्नागिरी, अकोले, संगमनेर, सोलापूर लातूर, जालना, जळगाव, पुणे, पालघर, बीड आदी जिल्ह्यांतील कविंनी आपल्या कविता सादर केल्या. त्यांना कविता सादर केल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. आशा गोवर्धने व प्रणाली पंचभाई यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी अनंत वाणी यांच्या ‘आनंददायी युरोप दर्शन’ या प्रवास वर्णनाचे व कवयित्री रजनी अनंत वाणी यांच्या ‘भावना अंतरीच्या’ या काव्यसंग्रहाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले. प्रा. आशा पाटील व वैजयंती सिन्नरकर यांनी परीक्षण केले. 

दरम्यान, दुपारच्या सत्रात ‘आजचे साहित्य मूल्यहीन झाले आहे का..?’ या विषयावर झालेल्या परिसंवादात प्रा. दिलीप पवार, प्रा. प्रतिभा जाधव व प्रविण जोंधळे यांनी सहभाग घेतला. प्रा. राज शेळके यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण निवेदन केले. आजचे साहित्य मूल्यहीन झालेले नाही, मात्र पालकांनी आगामी पिढीला वाचनाचा वारसा देण्याची गरज असल्याचा सूर या परिसंवादातून व्यक्त झाला. यानंतर झालेल्या समारोपिय संत्रात विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. विश्‍वास बँकेचे अध्यक्ष विश्‍वास ठाकूर या वेळी अध्यक्षस्थानी होते. 
-- 
यांचा झाला सत्कार 
वाङ्‌मय पुरस्कार (कंसात पुस्तकाचे नाव) 
* सुमनताई पंचभाई स्मृती कवितासंग्रह पुरस्कार- मनीषा पाटील हरोलीकर, सांगली (नाती वांझ होतांना) व तन्वी अमित, नाशिक (आवर्ती अपूर्णांक) 
* मीराबाई गोराडे स्मृती कथासंग्रह पुरस्कार- प्रा. यशवंत माळी, सांगली (उलाघाल) व पुष्पा चोपडे, नाशिक (मन न्यारं रे तंतर) 
* शिलाताई गहिलोत-राजपूत कादंबरी पुरस्कार- नीरजा, मुंबई (थिजलेल्या काळाचे अवशेष) 
* राहुल पाटील स्मृती बालसाहित्य पुरस्कार प्रा. डॉ. सुनील विभूते (सुरस धातू गाथा). 
----- 
नाशिक रत्न पुरस्कार 
* ज्ञानरत्न पुरस्कार : प्रकाश कोल्हे (मानवधन सामाजिक, शैक्षणिक विकास संस्था) 
* साहित्यरत्न पुरस्कार : रविंद्र मालुंजकर (प्रसिद्ध साहित्यिक व सूत्रसंचालक) 
* वृत्तसेवारत्न पुरस्कार : ब्रिजकुमार परिहार (वरिष्ठ उपसंपादक, सकाळ) 
* समाजरत्न पुरस्कार : बापू कोतवाल (ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते) 
* दिव्यांगरत्न पुरस्कार : सागर बोडके (गिर्यारोहक व सायकलपटू) 
--- 
काव्यस्पर्धेचा निकाल 
* प्रथम : ऐश्‍वर्या नेहे (चप्पल) 
* द्वितीय : आर. पी. शिखरे (वार वारंवार) 
* तृतिय : सौरभ आहेर (बाई दुबळी असते) 
* चतुर्थ : रेखा सोनटक्के(आदिवासी) व समृद्धी बनकर 
* पाचवा क्रमांक : प्रणाली पंचभाई (कवटी) व देव थोरात (चूल) 
* विशेष उल्लेखनिय : श्रेया नावरकर 
----------