नाशिक|स्व. गोपीनाथजी मुंडे आमचे मार्गदर्शक होते. पक्षासाठी त्यांचे योगदान सर्वपरिचित आहे. महाराष्ट्रात शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, दलित, वंचित यांना भारतीय जनता पक्षात आणण्याचे श्रेय सर्वतोपरी गोपीनाथ मुंडे यांना जाते. कार्यकर्त्यांसाठी, पक्षासाठी जीवाची बाजी लावणारे असे व्यक्तिमत्व होते. महाराष्ट्रातील दलित, वंचित, शोषित-पिडीत, आदिवासी, ओबीसी यांच्यासाठी समर्पित भावनेने कार्य करणारे योद्धे होते, असे प्रतिपादन केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
नाशिक जिल्ह्यातील नांदूर-शिंगोटे, येथे उभारण्यात आलेल्या स्व. गोपीनाथजी मुंडे यांच्या स्मारकाचे व पूर्णाकृती पुतळ्याचे आज लोकार्पण केंद्रिय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मा. उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, केंद्रीय राज्यमंत्री भारतीताई पवार, राज्याचे मंत्री श्री दादा भुसे, श्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे जी, खासदार प्रीतम मुंडे, खा. हेमंत गोडसे, ॲड.माणिकराव कोकाटे, आ. हिरामण खोसकर, आ. देवयानी फरांदे, आ.नरेंद्र दराडे, मा. आमदार राजाभाऊ वाजे, माजी आ. डॉ.सुधीर तांबे, ॲड.हेमंत धात्रक, जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शीतल सांगळे, कार्यक्रमाचे आयोजक उदय सांगळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
स्व गोपीनाथ मुंडे लोकनेते बिरुदाचे मुकुटमणी: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यात अनेक लोकनेते झाले त्यांनी चांगले कार्य केले पण गोपीनाथ मुंडे हे लोकनेते बिरुदाचे मुकुटमणी होते असे गौरवद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. ते पुढे म्हणाले, गोपीनाथ मुंडे हे परखड बोलत व सामन्यासाठी आवाज उठवत होते, सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी त्यांनी सतत संघर्ष केला. ७० चा दशकात फिरण्यासाठी वाहनं नव्हती तेव्हा त्यांनी सायकलवर फिरून पक्ष गावोगावी पोहचवला याचे श्रेय मुंडे यांना जाते असे सांगितले.
ओबीसी, वंचित घटकांसाठीचे त्यांचे कार्य शेवटच्या श्वासार्यंत सुरू ठेवू: भुजबळ
लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे यांनी ओबीसीसह समाजातील वंचित घटकांसाठी सुरू केलेलं काम शेवटचा श्वास असेपर्यंत सुरू ठेवणार अशी ग्वाही माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दिली. स्व.गोपीनाथ मुंडे यांनी राज्यातील ओबीसीसह पीडित सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आयुष्यभर लढा दिला. त्यांनी सुरू केल्याल्या कामाची सर्व जबाबदारी आता माझ्यावर आणि तुमच्यावर आहे. त्यामुळे शेवटचा श्वास असेपर्यंत त्यांचं काम सुरू ठेवू असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
स्व. गोपीनाथजी मुंडे यांच्या स्मारकाचे व पूर्णाकृती पुतळ्याचे आज लोकार्पण सोहळ्यासाठी राज्यभरातून मुंडे यांच्यावर प्रेम करणारी सामन्यजनता, कार्यकर्ते विविध क्षेत्रातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अत्यंत कल्पक आणि सुंदर अशा स्मारक निर्मितीसाठी अनेकांनी परिश्रम घेतले त्यात स्मारक समितीचे आयोजक उदय सांगळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे उपस्थित मान्यवरांनी प्रशंसा केली.