- माता आणि बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी आरोग्यसेवकांना प्रशिक्षण देणे गरजेचे: डॉ.अर्पणा हेगडे - TheAnchor

Breaking

March 31, 2023

माता आणि बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी आरोग्यसेवकांना प्रशिक्षण देणे गरजेचे: डॉ.अर्पणा हेगडे

नाशिक|दिअँकर नेटवर्क| सशक्त व सुदृढ समाजासाठी महिलांचे व बालकांच्या आरोग्याची तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली काळजी व उपचार घेणे गरजेचे असून  माता आणि बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी आरोग्यसेवकांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन डॉ.अर्पणा हेगडे यांनी केले.
Health-of-women-and-children-must-be-taken-care-of-Dr-Aparna-Hegde
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त डॉ. दौलतराव आहेर स्मृती व्याख्यानमाला उपक्रमात ’टेक्नोलॉजी इनोव्हेशन फोर मॅटरनल अॅण्ड चाईल्ड हेल्थ इन इंडिया’ विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याखानमालेत अध्यक्षस्थानी मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) प.वि.से.प., अ.वि.से.प., वि.से.प, सवमेत मा. प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, प्रमुख वक्त्या मूत्ररोगशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका डॉ. अपर्णा हेगडे, अधिष्ठाता डॉ. सुशिलकुमार झा आदी अधिकारी उपस्थित होते. 


’अरमान’ संस्थेच्या संस्थापिका तथा मुंबई येथील कामा रुग्णालयातील मूत्ररोगशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका डॉ. अपर्णा हेगडे यांनी ’टेक्नोलॉजी इनोव्हेशन फोर मेटरनल अॅण्ड चाईल्ड हेल्थ इन इंडिया’ विषयावर मार्गदर्शन करतांना सांगितले की, समाजातील महिला व बालकांच्या आरोग्याची काळजी सर्वांनी घेणे गरजेचे आहे. माता आणि बालमृत्यू, बालकांमधील आजार कमी करण्यासाठी समाजात प्रबोधन होणे आवश्यक आहे. गरोदर महिला आणि बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी आरोग्य सेवकांना योग्य प्रशिक्षण देण्यात यावे जेणेकरुन योग्य आरोग्य सेवा पुरवणे शक्य होईल. 
राज्यातील आदिवासी व दुर्गम भागातदेखील आरोग्य सेवेचे काम होणे आवश्यक आहे यासाठी स्थानिक बोलीभाषेचे ज्ञान असलेले आरोग्यसेवकांची मदत घेण्यात यावी. महिलांचे आरोग्य व स्वास्थ्याविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठी मोठया प्रमाणात कार्य करणे गरजेचे आहे. महिलांना स्वच्छतागृह व शुध्द पेजजल सुलभरित्या उपलब्ध होण्यासाठी स्थानिक प्रशासनाने प्रयत्नशील रहावे.  महिला व बालकांमधील आजाराची मुख्य कारणे शोधून त्यावर उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. 

याप्रसंगी मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी सांगितले की, महिलांच्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. यासाठी समाजात आरोग्याबाबत संवेदनशीलता निर्माण होणे गरजेचे आहे. कुटुंबातील महिलांना सकस आहार, व्यायाम आणि वैद्यकीय सल्ला या त्रिसूत्रीवर  त्यांचे स्वास्थ्य अवलंबून आहे. प्रत्येकाने कुटुंबातील महिला व बालकांच्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक   असल्याचे सांगितले.

  
विद्यापीठाचे मा. प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ यांनी सांगितले की, महिला आणि बालक  समाजातील महत्वाचा घटक आहे, त्यांचे आरोग्य आणि उपचाराबाबत सजग राहणे आवश्यक आहे.   मा. कुलगुरु महोदया यांच्या संकल्पनेतून ’ब्लॉसम’ उपक्रमाच्या माध्यमातून दूर्गम भागातील लोकांच्या आरोग्यासंदर्भात स्वयंसेवकांच्या मदतीने कार्य सुरु आहे. 
          
विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विद्यापीठातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. ’टेक्नोलॉजी इनोव्हेशन फोर मॅटरनल अॅण्ड चाईल्ड हेल्थ इन इंडिया’ विषयावर डॉ. अर्पणा हेगडे यांचे मार्गदर्शन महाराष्ट्र पदव्युत्तर शिक्षण व संशोधन संस्थेच्या विद्यार्थ्यांना महत्वपूर्ण ठरेले असे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी सांगितले.

याप्रसंगी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी सूत्रसंचालन केले.  विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त व्याख्यानमालेसाठी विद्यापीठ संशोधन विभागाचे प्राध्यापक  ब्रिगे. डॉ. सौरव सेन, डॉ. वैशाली गंभीरे, डॉ. प्रदीप आवळे यांनी काम पहिले.  या व्याख्यानमालेस महाराष्ट्र पदव्युत्तर शिक्षण व संशोधन संस्थेचे विद्यार्थी, शिक्षक व विद्यापीठातील अधिकारी मोठया संख्येने  उपस्थित होते.