नाशिकरोड|प्रतिनिधी|राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व माजी नगरसेवक जगदिश पवार यांनी स्वखर्चाने महापालिकेच्या नाशिकरोड येथील बाळासाहेब ठाकरे बिटको रुग्णालयास दंत वैद्यकीय उपचारासाठी यु. व्ही. चेंबर मशिन दिले.यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. शिल्पा काळे, डॉ. जितेंद्र धनेश्वर, डॉ. किशोरी बाणखेले, डॉ. मयुरी गलांडे, डॉ. अभिषेक देशमुख, डॉ. विशाल जाधव, डॉ. नागमोती, राजेंद्र आहेर, एस. के. आडके आदी उपस्थित होते.
सुरक्षित युव्ही चेंबर ऑटोक्लेव्ह किंवा निर्जंतुकीकरण यंत्राव्दारे दातांचे निर्जंतुकीकरण केले जाते. या यंत्रामुळे प्रगत तंत्रज्ञानासह अल्ट्राव्हायोलेट चेंबर्सव्दारे निर्जंतुकीकरण राखण्यासाठी मदत होते. बिटको रुग्णालयात नाशिकरोड आणि पंचक्रोशीतील ४५ खेडेगावातून नागरिक उपचारासाठी येत असतात. दाताच्या उपचारासाठी दररोज सुमारे शंभर रुग्ण येतात. दंत तज्ञ डॉ. विशाल जाधव आणि त्यांचे सहकारी दातांचे उपचार, जबड्याची शस्त्रक्रिया करतात. मात्र, आधुनिक मशिनरी नसल्याने उपचारात अडथळे येत होते. जगदीश पवार यांना हे समजताच त्यांनी स्वखर्चाने मशिन घेऊन दिले. जगदीश पवार यांनी करोना काळात बिटकोतील रुग्णांना मोठी मदत केली होती. या रुग्णालयाच्या समस्या सोडविण्यासाठी, सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याबरोबरच अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पवार महापालिका आणि सरकार दरबारी कायम प्रयत्नशील असतात.