देशवंडी (सिन्नर)| प्रतिनिधी| सामाजिक तथा आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते प्रवीण कर्डक (देशवंडी) यांनी त्यांच्या मातोश्री कलाकथित विमल रतन कर्डक यांच्या शोक सभेच्या निमित्ताने कुठलही धार्मिक कर्मकांड, अंध श्रद्धा, दुखवटा यास फाटा देत आपण आपला सामाजिक बांधिकली व जबाबदारीचा वसा आणखी कसा पुढे नेऊ शकतो याचा विचार करून परिवर्तनवादी विचारवंत अमरावती येथील प्रसिद्ध व्याख्याते रवी मानव यांच्या व्याख्यानाचे आयोजन करून खऱ्या अर्थाने समाज प्रबोधन अंधश्रद्धा निर्मूलन, जातीभेद निर्मूलन या विषयी मार्गदर्शन केले.
द्वेष उच्च नीच, हेवे दावे याला मूठमाती देऊन सुशिक्षित सुज्ञ जबाबदार, कर्तव्यदक्ष समाज कसा निर्माण करता येईल यासाठी काय केले पाहिजे या विषयी रवी मानव यांनी संत गाडगेबाबा छ. शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले, शाहू महाराज डॉ आंबेडकर यांचे दाखले देत प्रकाश टाकला. शिक्षणच्या अभावामुळे व अज्ञानामुळे लोकांच कसे शोषण केलं जातं ते अंधश्रद्धेला बळी पडतात, कर्मकांडाच्या भूत प्रेताच्या मागे लागून आणखीन भरकटतात. त्यासाठी आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे म्हणून सर्वांनी सुशिक्षित होऊन कर्मकांड अंधश्रद्धा याला कुठलाही थारा न देता आपला स्वतःचा आपल्या गावाचा आपल्या समाजाचा व आपल्या संपूर्ण देशाचा कसा विकास होईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. असा संदेश देत समाज प्रबोधन केले. व त्याबरोबर शिक्षण व्यवस्थेतील, राजकीय व्यवस्थेततील गैरप्रकारांवर प्रकाश टाकला.
जागतिकिकरणाचे जीवघेणे कायदे व व्यक्ती, समाज व राष्ट्रवरील विपरीत परिणाम, खाजगीकरणात आरक्षणाची नसलेली तरतूद नव्या पिढीला नीट समजून न सांगता जाती-जातीमध्ये राजकिय षडयंत्र करून त्यांची माथी भडकवली जात आहेत. माती व मतीची मशागत केल्या शिवाय बुद्ध-कबीर, तुकोबा, फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांचा वारसा सांगता येणार नाही असे मत यावेळी बोलतांना लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठानचे संस्थापक, कार्याध्यक्ष प्रा. शरद शेजवळ यांनी व्यक्त केले.
शोकसभा (उद्बोधन) च्या अध्यक्षस्थानी जेष्ट आंबेडकरी कार्यकर्ते पोपटराव जाधव हे होते. धम्म संस्कार विधी बाळासाहेब आव्हाड यांनी केला. नाशिक महानगर पालिकेच्या माजी नगरसेविका प्रा.कविताताई कर्डक, उदयभाऊ सांगळे, अमर ताविडे, महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेचे डॉ.वाळके आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.शरद शेजवळ यांनी केले, सूत्रसंचालन किशोर सोनवणे यांनी केले. आभार प्रवीण कर्डक यांनी मानले.