नाशिकरोड| प्रतिनिधी|उपनगर येथील गंभीर गुन्ह्यातील फरार बहेनवाल गॅंगच्या म्होरक्यासह अन्य तीन जणांना गुंडा विरोधी पथकाने दिल्लीत जाऊन शिताफीने अटक केली. पथकाचे सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, मलंग गुंजाळ, विजय सूर्यवंशी, डी. के. पवार, राजेश सावकार, सुनील आडके, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, गणेश नागरे, नितीन गौतम, निवृत्ती माली, सुवर्ण गायकवाड यांनी ही कामगिरी केली.
जेलरोडच्या भीमनगर येथेली धर्मनाथ अपार्टमेंटसमोर फिर्यादी मयूर रोहम हे १६ फेब्रुवारीला थांबले होते. या वेळी पांढ-या कारमधून विजय बहेनवाल उर्फ छंगा, राहुल उज्जैनवाल, गणेश सोनवणे व त्यांच्या साथीदारांनी रोहम यांना पकडले. मागील भांडणाची कुरापत काढून मयूर बेद व रोहित महाले यांच्याविषयी चौकशी सुरु केली. नंतर रोहम यांना मारहाण करून शस्त्राने वार केले. उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार होते. हे आरोपी सराईत गुन्हेगार असल्याने त्यांच्या शोधासाठी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक आयुक्त सीताराम कोल्हे यांनी गुंडा विरोधी पथकाला कारवाईच्या सूचना केल्या होत्या. या पथकाला विजय बहेनवाल, राहुल उज्जैनवाल, गणेश सोनवणे हे साथीदारांसह राजस्थान, हरियाणा, दिल्ली येथे फरार झाल्याचे समजले. पथकाचे प्रमुख ज्ञानेश्वर मोहिते, विजय सूर्यवंशी, डी. के. पवार, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत यांनी राजस्थान, हरियाणा, दिल्ली येथे जाऊन आरोपींचा शोध घेतला. दिल्लीतील हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशनजवळ हे आरोपी असल्याचे पोलिसांना समजले. प्रवाशांमध्ये लपलेल्या विजय बहेनवाल, राहुल उज्जैनवाल, प्रदीप काळे, गणेश सोनवणे यांना सापळा रचून पथकाने शिताफीने ताब्यात घेतले. त्यांना उपनगरला आणले.