नाशिकरोड|प्रतिनिधी| देशातील तरुणांच्या हाताला काम मिळावे, असा प्रयत्न दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा होता. त्यासाठी युवकांनी नोकरीच्या बरोबरीने व्यवसायात उतरले पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. युवकांचा कौशल्य विकास, त्यांच्या संस्थेसाठी कर्ज आणि संस्थेत निर्माण होणा-या वस्तूला बाजारपेठ असा वाजपेयींचा दृष्टीकोन होता. त्यातूनच १९९८ साली राष्ट्रीय स्तरावर एनवायसीएस संस्था सुरु झाली. या संस्थेला सर्व ती मदत करू, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले.
नवी दिल्लीतील नॅशनल युवा को-ऑपरेटीव्ह सोसायटीची (एनवायसीएस) देशातील ३४ वी शाखा जेलरोड येथे सुरु झाली. तिचे उदघाटन केल्यानंतर ते बोलत होते. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, प्रवक्ते लक्ष्मण सावजी, शहराध्यक्ष प्रशांत जाधव, आमदार राहुल ढिकले, देवयानी फरांदे, माजी आमदार बाळासाहेब सानप, नाशिक रोड व्यापारी बॅंकेचे अध्यक्ष दत्ता गायकवाड, व्ही. एन. नाईकचे सरचिटणीस हेमंत धात्रक, उध्दव निमसे, विजय साने, महेश दाबक, सुनिल आडके, शांताराम घंटे, महाव्यस्थापक आर. डी. कुलकर्णी, प्रतिम आढाव, गिरीष पालवे, सुनिल बच्छाव हे व्यासपीठावर होते.
आमदार राहुल ढिकले म्हणाले की, चांगले काम करायचे असेल तर सर्वजण पाठिंबा देतात, हे नाशिक रोडचे वैशिष्ट्य आहे. संस्था वाचली तर सहकार चळवळ वाचेल. सहकारी संस्था कोणती, त्यापेक्षा ती कोण चालवते यावर विश्वासर्हता अवलंबून असते. सहकाराला घर घर लागून स्वाहाकार वाढला आहे. त्यामुळे २५ टक्के सहकारी बॅँका बंद पडल्या आहेत. मात्र, नरेंद्र मोदींनी अमित शहांना सहकार मंत्री केल्यानंतर देशातील चित्र बदलत आहे. महाराष्ट्रातील सहकाराचे चित्र सुधारायचे असेल तर शहांसारखा हेड मास्तर गरजेचा आहे.
राजेश पांडे म्हणाले की, संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. संस्थेच्या ६२० जिल्ह्यात शाखा आहेत. ३३ राज्यात काम चालते. ३० हजार सभासद आहेत. देशभरातील सर्व युवकांना सभासद करण्याचा प्रयत्न आहे. ही पतसंस्था नसून मल्टीस्टेट मल्टीपर्पज संस्था आहे.
शाखा अध्यक्ष संजय किर्तने यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष राजेश आढाव यांनी सूत्रसंचालन केले. सचिव ज्ञानेश्वर भोर यांनी आभार मानले.
संचालक प्रमोद मुर्केवार, संचालिका प्रतिभा सोनवणे, रविद्र शिंदे, निलेश अहिरराव आदींनी संयोजन केले.