नाशिकरोड| आयएसपी- सीएनपी प्रेसमधील मृत्यू झालेल्या कामगारांच्या वारसांच्या फाईल मंजुरीसाठी प्रेस महामंडळाच्या दिल्लीतील मुख्यालयात पाठविण्यात आल्या होत्या. प्रेसमध्ये सेवेत घेण्याची ऑर्डर निघण्याची प्रतिक्षा दोन्ही प्रेसमधील कामगार बांधवांना आणि वारसांना होती. आज ही प्रतिक्षा संपून ५० वारसांना ऑर्डर मिळाल्या. त्यामुळे प्रेसमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
आयएसपी-सीएनपीमधील ५० वारसांना नोकरीवर घेण्यास परवानगी देणा-या ऑर्डर प्रेस महामंडळाच्या संयुक्त महाव्यवस्थापक अभिषेक श्रीवास्तव यांच्या सहीने आज सायंकाळी आयएसपी मजूर संघाला मिळाल्या. त्यानंतर मयत कामगारांच्या वारसांनी, दोन्ही प्रेसमधील कामगारांनी मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे व कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे, उपाध्यक्ष राजेश टाकेकर, कामगार पॅनलचे राजू जगताप, कार्तिक डांगे, प्रवीण बनसोडे, खजीनदार अशोक पेखळे, सहसचिव अविनाश देवरूखकर, संतोष कटाळे आदींचे आभार मानले. या वेळी आनंदोत्सव साजरा करून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. आयएसपीमध्ये २६ व सीएनपीमध्ये २४ मयत कामगारांचे वारस आयएसपी-सीएनपीमधील नोकरीवर रुजू करण्याची आवश्यक वैद्यकीय व अन्य कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर त्वरीत रूजू होतील. प्रतीक्षा यादीतील पुढील वारसांना देखील लवकरात लवकर कामावर घेण्यासाठी आयएसपी मजदूर संघ कार्यरत असल्याचे जगदीश गोडसे यांनी सांगितले.
अगोदर कामावर रूजू झालेले ७७ मयत कामगार वारस व आज ऑर्डर आलेले ५० अशा एकूण १२७ मयत कामगार वारसांना प्रेसमध्ये नोकरी मिळाली आहे. २४ फेब्रुवारी २०१३ रोजी सुरू करण्यात आलेल्या कम्पॅशनेट अपार्ईन्टमेंट पॉलिसीमुळे हे शक्य झाले. हे आयएसपी-सीएनपी मजदूर संघाचे मोठे यश असल्याचे जुंद्रे यांनी सांगितले.