मुंबई| महाराष्ट्रातील रेशनिंग दुकानदाराच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात फेडरेशनच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री, पुरवठा मंत्र्यांची भेट घेतली. यावेळी दुकानदारांना मिळणाऱ्या कमिशनमध्ये वाढ करावी आणि धान्य वितरणात ईपॉस मशिनमध्ये येणाऱ्या अडचणी दूरकरण्याविषयी मुंबईत चर्चा झाली. दुकानदारांच्या मागण्यांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले, अशी माहीती महाराष्ट्र शॉप किपर्स फेडरेशनचे अध्यक्ष गणपतराव डोळसे पाटील यांनी दिली.
रेशनिंग धान्य दुकानदार प्रश्नांबाबत दोन दिवस महाराष्ट्र फेडरेशनच्या शिष्टमंडळाने पाठपुरावा केला. बुधवारी फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थ मंत्री अजितदादा पवार, पुरवठा मंत्री छगनराव भुजबळ, विधानसभा उपाध्यक्षा नरहरी झिरवाळ यांची मुंबईत भेट घेतली. यादरम्यान २०१७ ते २०२४ असा गेल्या सहा, सात वर्षापासून कमिशनमध्ये वाढ केलेली नसल्याचे मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.
कमीशन वाढ लवकर करण्यात यावी, ईपॉस मशीन वारंवार बंद पडणे, मशीनचे सिमकार्ड काम करत नाही, कॅश मेमो लवकर निघत नाही, नेटवर्क मिळत नाही या सर्व अडचणी तात्काळ सोडवाव्या आणि ईपॉस मशीनवर तात्काळ धान्य टाकावे अशी मागणी करून त्याचा आदेश शासनाने द्यावा आदी प्रश्नांबाबत चर्चा झाली. त्यावर उपमुख्यमंत्र्यानी सकारात्मक प्रतिसाद देत मागण्या लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांना दिल्याचे डोळसे पाटील यांनी सांगितले. याप्रसंगी डोळसे पाटील यांच्यासह बाबुराव म्हमाने, अशोक एडके, संजय पाटील, सुभाष मुसळे, शांताराम पाटील, निवृत्ती कापसे, गुलाब वाजे आदी प्रतिनिधी उपस्थित होते.