- बिगुल वाजलं - TheAnchor

Breaking

October 15, 2024

बिगुल वाजलं

बिगुल वाजलं

अखेर झारखंड आणि महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक जाहीर झाली. २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला मतमोजणी होईल. दुसरीकडे झारखंडमध्ये दोन टप्प्यात १३ व २० नोव्हेंबरला मतदान आणि २३ ला मतमोजणी होणार आहे. निवडणुकांचा बिगुल वाजल्याने राजकीय पक्षांची धाकधुक वाढली असणार, लोकसभा निवडणुकीत जनतेने  महायुतीला दिलेल्या झटक्याने चिंतेत असलेल्या युतीला हरियाणा निकालाने कॉन्फिडन्स दिला आहे. त्यात ऐन निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधाऱ्यांनी अनेक योजनांचे आमिष दाखवून आमचे सरकार किती लोकाभिमुख आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला. त्याचा किती फायदा येणाऱ्या काळात युतीला होतो हे लवकरच स्पष्ट होईल.

महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार असे मानले जात असतानाच तिसरी आघाडी ही निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची तयारी करत आहे. त्यामुळे पारंपरिक पक्षांची डोखेदुःखी वाढणार आहे. तिसऱ्या आघाडीसाठी छत्रपती संभाजी राजे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी राज ठाकरे व प्रकाश आंबेडकर यांचे मन वळविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे राजकीय वर्तुळात सांगण्यात येते. २०१९ वर्ष राजकारणातील नाट्यमय घडामोडीसाठी लक्षात राहील. राज्यात २०१९ ला भाजपाने १६४ जागा लढल्या होत्या, त्यात १०५ जागांवर समाधान मानावं लागलं होतं तर शिवसेना १२४ जागा लढवल्या, त्यांना ५६ जागा मिळाल्या. राष्ट्रवादीला ५४ तर काँग्रेसला ४४ जागा मिळाल्या होत्या. भाजपा सेना युतीला स्पष्ट बहुमत होते. मात्र मुख्यमंत्री पदावर दोन्ही पक्षांनी दावा केल्याने अखेर युती तुटली आणि राज्यात एक नवी आघाडी स्थापन होऊन उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. भाजपा शिवसेनेची भूमिका पटली नसल्याने त्यांनी २०२२ मध्ये राष्ट्रवादीतील अजितदादा पवार आणि शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांना गळाला लावून महायुतीचे सरकार स्थापन केले. 

२०२२ मधील महाराष्ट्रातील तोडफोडीचे राजकारण जनतेला रुचले नाही. लोकसभेला त्याचा फटका भाजपा व मित्रपक्षांना बसला. एवढेच नाही तर महागाई, बेरोजगारी, घसरलेले कांद्याचे दर, इधांचे वाढते दर असे अनेक प्रश्न नागरिकांना भेडसावत असताना सत्ता स्थापनेचा सुरू असलेला खेळ जनतेला पटला नाही. आता या सर्व महत्वाच्या मुद्द्यावर महायुती ताक ही फुंकून पेत आहे, असे चित्र दिसत आहे. भाजपला २०१९ ला ३७ टक्के मते होती. त्यामुळे महायुतीत भाजपाने १५० पेक्षा जास्त जागांवर दावा केला आहे. शिंदे आणि अजित पवार गटाने ७० ते ९० जागांवर हक्क सांगितला आहे. तर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी २१८ आणि काँग्रेसचे विजय वड्डेटीवार यांनी २२२ जागांबाबत आघाडीचे वाटप झाले असल्याचे सूतोवाच केले आहे. काँग्रेसने राज्यात अधिक जागांची मागणी केल्याने उध्दव ठाकरे गट व शरद पवार गटाची चलबिचल वाढली असून त्यांनी हरियाणा निकालाचे दाखले देत काँग्रेसला कमी जागांवर रोखण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. 

आता तारखा जाहीर झाल्याने आम्ही सज्ज असल्याचे सांगत महाविकास आघाडीने रणशिंग फुंकले आहे, तर भाजपाचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट करुन शंखनाद केल्याने राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे.  भाजपचे चाणक्य अमित शहा यांनी २०२४ ला आपलेच सरकार येईल असे सांगून २०२९ साठी स्वबळाचा नारा ही दिल्याने खऱ्या अर्थाने भाजपाचा यंदा कस लागणार असून प्रतिष्ठापणाला लागली आहे. आघाडी सारख्या कुरबुऱ्या महायुतीत ही सुरू आहे. निवडणूक घोषणेपूर्वी महायुतीने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, लाडकी बहिण, उज्ज्वला योजनासह अनेक योजना जाहीर केल्या, महायुतीला याचा किती फायदा होतोे, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.मात्र  २०२४ निवडणूक भाजपा आणि त्यांच्या मित्र पक्षांची परीक्षा बघणार यात शंका नाही.

दिगंबर मराठे