- भाजपकडून सीमा हिरे, राहुल ढिकले, दिलीप बोरसे, डॉ. राहुल आहेर यांना पुन्हा संधी - TheAnchor

Breaking

October 20, 2024

भाजपकडून सीमा हिरे, राहुल ढिकले, दिलीप बोरसे, डॉ. राहुल आहेर यांना पुन्हा संधी

नाशिक| दिअँकर वृत्तसेवा|भारतीय  जनता पक्षाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी पहिली ९९ उमेदवारांची यादी रविवारी जाहीर केली आहे. यादीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि खासदार अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया चव्हाण, गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार, विजयकुमार गावित यांची ही नावे यादीत आहेत. नाशिक जिल्ह्यातील विदयमान ४ आमदारांवर विश्वास दाखवून त्यांना पुन्हा संधी दिली आहे. 

लोकसभा निकाल जून २०२४ मध्ये जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्ष महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी तयारी सुरू केली होती. महाराष्ट्र आणि  झारखंड राज्याची निवडणुक जाहीर झाली. महाराष्ट्रात  २० नोव्हेंबरला एकाच दिवशी मतदान होत असून, २३ नोव्हेंबरला निकाल आहे. विधानसभेची आचारसंहिता लागल्यानंतर सर्वांचेच लक्ष उमेदवारीकडे लागले होते. त्यात भारतीय जनता पक्षाने बाजी मारत आपल्या ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. 

या यादीत नाशिक पश्चिममधून सीमा हिरे, नाशिक पूर्व राहुल ढिकले, बागलाणमध्ये दिलीप बोरसे, चांदवडला डॉ. राहुल आहेर यांना संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे चांदवडमध्ये डॉ. राहुल आहेर यांनी दोन तीन दिवसां पूर्वीच माघार घेतली होती. येथे बंधु नाफेडचे  संचालक केदा आहेर यांना उमेदवारीसाठी पक्षाकडे शिफारस देखील  केली होती. पण, या ठिकाणी पक्षाने पुन्हा एकदा डॉ. राहुल आहेर यांनाच संधी दिली आहे. त्यामुळे या ठिकाणी केदा आहेर काय भूमिका घेणार याकडे आता लक्ष लागून राहिले आहेत. 

भाजपने दाखवला हिरे यांच्यावर विश्वास 

दोन दिवसांपूर्वीच नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यांच्या विरोधात पक्षातील विरोधकांनी एकत्र येत त्यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. भाजपा वसंत स्मृती कार्यालयात शहर अध्यक्ष प्रशांत जाधव यांच्याकडे सीमा हिरे यांच्या विरोधात तक्रार केली होती. कोणीही चालेल पण सीमा हिरे नको अशी उघड भूमिका घेतली होती. तरीही पक्ष श्रेष्ठींनी हिरे यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. 

पूर्वमध्ये गीते, सानप यांच्या भूमिकेकडे लक्ष 

नाशिक पूर्व मतदार संघातून भाजपकडून माजी आ. बाळासाहेब सानप, माजी स्थायी सभापती गणेश गीते इच्छुक होते. परंतु गीते यांनी उमेदवारी मिळत नसल्याचे लक्षात येताच त्यांनी तुतारीसाठी गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न सुरू केले आहेत. परंतु राष्ट्रवादीकडून जगदीश गोडसे, अतुल मते यांच्याकडून देखील जोरदार लॉबिंग सुरू आहे. आता शरद पवार हे कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 

----------------------------------------------

विकासकामांची पावती

महायुतीने माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरविणार आहे. मागील कार्यकाळात जनतेशी प्रामाणिकपणे जपलेले नाते, तसेच आपण केलेल्या विकासकामांची खरी पावती आहे. तिसऱ्यांदा विधानसभेची निवडणूक लढवत आहोत. यामध्ये सर्व मतदार बंधू-भगिनींचे प्रेम, आशीर्वाद तसेच स्थानिक व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचा संपूर्ण पाठिंबा मिळत आहे.  सर्वांच्या आशीर्वादामुळे, यंदाची निवडणूक आपण विजयानेच संपन्न करू, याचा  पूर्ण विश्वास आहे.

सीमा हिरे, 
भाजपा उमेदवार, नाशिक पश्चिम 


----------------------------------------------
पक्षाने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवणार

वरिष्ठ नेत्यांनी दाखविले ल्या विश्वासाला पात्र ठरेल. गेल्या ५ वर्षाच्या कार्यकाळात केलेल्या कामामुळे जनता जनार्दन पुन्हा एकदा आपल्याला प्रतिनिधीत्व करण्याची नक्की संधी देखील, असा विश्वास आहे.  पक्ष अंतर्गत कोणाचाही विरोध नसून, वरिष्ठ नेते याबाबत लक्ष घालून संघटनात्मक बांधणी करतील. 

राहुल ढिकले, 
भाजपा उमेदवार, नाशिक पश्चिम 

----------------------------------------------
निष्ठेचे फळ मिळाले

भारतीय जनता पार्टी हा असा पक्ष आहे की या पक्षात निष्टेने काम करत राहावं लागतं. भाजपा कडे कधीही काही मागावं लागत नाही. भाजपाकडे जो तिकीट मागतो त्याला कधीच मिळत नाही. भाजपा हा कार्यकर्त्याचं काम पाहून उमेदवारी देणारा पक्ष आहे.भाजपाने आमच्या बोरसे कुटुंबियांवर २००४ पासून जो विश्वास ठेवला त्याबद्दल आम्ही भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाचे आभारी आहोत. २०२४ च्या बागलाण विधानसभा निवडणुकीत मतदार भाजपाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहतील याचा मला ठाम विश्वास आहे. 

दिलीप मंगळू बोरसे 
भाजपा उमेदवार, बागलाण