उद्योग'रत्न' निखळलं
उद्योगपती रतनटाटा यांचे वृद्धापकाळाने निधन झाल्याने, देशच नव्हे तर जगभर हळहळ व्यक्त झाली. रतनटाटा हे सामाजिक जाणिव असलेले उद्योगपती होते. उद्योग, व्यवसाय वाढवत असताना सामान्य माणूस त्यांच्या केंद्रस्थानी राहिला. उदाहरण द्यायचे झाले तर १ लाखात सामान्य माणसाला नॅनो कार देणे हे रतन टाटांना शक्य झाले. त्यांनी नेहमी सामजिकभान राखलं. एवढ्या मोठ्या समुहाचे चेअरमन असताना त्यांनी सामाजिक उत्तरदायित्व व साधी सरळ जीवन पद्धती अवलंबली. उदरनिर्वाह व जगण्यासाठी जेवढया आवश्यक बाबी आहेत. त्याच स्वीकारल्या, झगमगाट व आलिशान जीवन पद्धतीला त्यांनी फारसे महत्व दिले नाही. त्यामुळेच एखाद्या सामान्य व्यक्तीलापण रतन टाटा आपलेसे वाटतात यातच त्यांचे मोठेपण आहे.
रतन टाटा यांचा जन्म २८ डिसेंबर १९३७ साली मुंबईत पारसी कुटुंबात झाला. वडिल नवल टाटा व आई सोनू टाटा तसेच काका जमशेदजी टाटा यांचा त्यांच्यावर विशेष प्रभाव होता. त्यांचे ८ वी पर्यंतचे शालेय शिक्षण मुंबईतील कॅपियन शाळेत तसेच उर्वरित शालेय शिक्षण शिमला व न्यूयॉर्क येथे झाले. कॉर्नेल महाविद्यालयातून वास्तूकला स्थानक पदवी मिळविली. टाटा सन्स प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना १८६८ झाली. १९६१ साली त्यांनी टाटा स्टीलमध्ये काम केलं. १९९१ मध्ये टाटा समुहाचे संस्थापक अध्यक्ष जेआरडी टाटा यांच्या सेवानिवृत्तीनंतर ते टाटा समुहाचे अध्यक्ष झाले.
१९९१ ते २०१२ पर्यंत ते अध्यक्ष होते. त्यानंतर २०१६ ते २०१७ ला त्यांनी कार्यकारी अध्यक्ष म्हणून ही काम पाहिले.
रतन टाटा यांच्या कार्यकाळात टाटा समूहाने टेटली, जग्वार लैंड रोवर, कोरस अशा कंपन्यांचे अधिग्रहण केले. ऑक्टोबर २०२१ मध्ये टाटा सन्सने २.४ अब्ज डॉलर्सला एअर इंडिया खरेदी केली. त्यांच्यात कार्यकाळात टाटा समूहाला मोठे आर्थिक बळ मिळाले, जगभर विस्तार झाला. टाटा समूहाचे राजस्व ४० टक्क्याने वाढले व नफा ५० पट्टीने वाढल्याचे दिसून येतं.
एकीकडे उद्योग, व्यवसाय वाढत असताना टाटा कुटुंबाने सामाजिक दायित्व तितक्याच प्रामाणिकपणे पार पाडले. त्यांच्या कुटुंबाचे ६६ टक्के शेअर (उत्पन्न) टाटा ट्रस्टकडे आहे. त्याचा उपयोग त्यांनी देशसेवा सामाजिक उत्थानासाठी केला. एवढेच नाही तर त्यांच्यात पर्यावरणाप्रती जागरूकता आणि प्राण्यांविषयी करुणा होती. नाशिकला त्यांनी विविध वनस्पतीचे बॉटनिकल गार्डनची निर्मिती केली. तर आपल्या निवासस्थानी भटक्या श्वानांना निवारा उपलब्ध करून दिला. असा अनमोल रत्न आपल्यातून निखळला सध्या असा रत्न शोधून सापडणार नाही.
भावपूर्ण श्रद्धांजली
दिगंबर मराठे,
दिअँकर