- जयदत्त होळकर: आपला माणूस, एक आश्वासक युवा नेतृत्व - TheAnchor

Breaking

October 16, 2024

जयदत्त होळकर: आपला माणूस, एक आश्वासक युवा नेतृत्व

जयदत्त होळकर: आपला माणूस, एक आश्वासक युवा नेतृत्व

आपला सेवाभाव हाच श्वास असलेल्या आणि सामाजिक उत्थानाच्या प्रक्रियेत सातत्याने गतिमान राहणाऱ्या लासलगाव येथील होळकर कुटुंबीयांनी सामाजिक, धार्मिक, कृषी व राजकीय क्षेत्रांत आपला एक दबदबा निर्माण केलेला आहे. याच होळकर कुटुंबातील अलीकडच्या काळातील एक आश्वासक नाव म्हणजे जयदत्त सीताराम पाटील होळकर होय.

नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे दीर्घकाळ संचालक व चेअरमनपद भूषविणारे आणि शरद जोशी यांच्याबरोबर शेतकरी संघटनेच्या माध्यमातून अनेक वर्षे शेतकरी हितासाठी सदैव झटणारे स्वर्गीय सीताराम आप्पा होळकर यांचे जयदत्त हे चिरंजीव आहेत. सीताराम आप्पांचा सहकार व शेतीविषयक असलेला जिव्हाळा जयदत्त होळकर यांची ही साथसोबत करत आला. त्यांच्या मातोश्री स्व. कुसुमताई तथा आक्कासाहेब यांच्याकडे लासलगावच्या पहिल्या महिला सरपंच होण्याचा मान जातो. कुसुमताई जिल्हा परिषदेसह, लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सदस्य म्हणूनही कार्यरत होत्या. घरामध्येच राजकीय, सामाजिकतेचे बाळकडू मिळाल्याने जयदत्त होळकर यांनाही जनसामान्यांच्या हितासाठी आपलाही खारीचा वाटा असावा, अशी प्रेरणा मिळत गेली. त्यांचे मोठे चुलते श्री चांगदेव दादा होळकर हे नाफेडचे संचालक, चेअरमन म्हणून अनेक वर्षे कार्यरत होते. कांद्याचे गाढे अभ्यासक म्हणून त्यांना भारतभर ओळखले जाते. जयदत्त होळकरां यांचे लहान चुलते अशोक नाना होळकर यांनी देखील जिल्हा परिषद सदस्य त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सदस्यपदी भरीव कामगिरी बजावलेली आहे. जयदत्त होळकर यांचा भवताल असा सामाजिक, राजकीय भान असलेला आहे. त्यातून आलेला वारसा जपत व मुळातच उपजत असणारे नेतृत्व गुण जोपासत जयदत्त होळकर यांनी आपल्या प्रगतीची वाट प्रशस्त केली. महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थी विकास कृती समितीची स्थापना करत ग्रामीण विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे शोधली. अश्वमेध जिमखाना स्थापन करून राज्य स्तरावरील गेले अनेक वर्ष क्रिकेट सामन्याचे आयोजन केले. त्याचबरोबर वृक्षारोपण, रक्तदान, समाज प्रबोधनासाठी व्याख्यान कीर्तन प्रवचन असे अनेक सामाजिक उपक्रम हाती घेतले आणि त्यातूनच लोक जोडत गेले. धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमातूनही गावांमध्ये सौहार्दाचे वातावरण निर्माण केले. 

रेणुकामाता विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक व चेअरमनपद भूषवताना त्यांच्या कर्तृत्वाची छाप गावावर विशेषतः तरुण वर्गावर पडली आणि याचीच पावती म्हणून जयदत्त होळकर यांची लासलगाव ग्रामपंचायत सदस्यपदी बिनविरोध निवड झाली. येथूनच त्यांच्या यशस्वी राजकीय वाटचालीचा श्रीगणेशा झाला. मिळालेल्या संधीचे सोने करत गावातील विकास कामांचा धडाकाच सुरू केला. आपसूकच जनतेने सरपंच पदाची माळदेखील त्यांच्या गळ्यात टाकली. ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच, सरपंच या पदांवर गेल्या १९ वर्षांपासून जयदत्त होळकर कार्यरत आहेत. त्यांनी अनेक नवं नवीन उपक्रमा बरोबर पायाभूत सुविधा गावासाठी उपलब्ध करून देत युवकांना क्रिकेट खेळण्यासाठी इन डोअर स्टेडियमदेखील उभारले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पोलिस, तलाठी, ग्रामसेवक या व विविध पदांसाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी एक स्वतंत्र अभ्यासिका व तिची स्वतंत्र इमारत उभारून तेथे उपयुक्त ग्रंथसंपदा उपलब्ध करून दिली. आजमितीला या अभ्यासिकेचा दररोज १०० हून अधिक सामन्य कुटुंबातील विद्यार्थी मोफत लाभ घेत आहेत. या अभ्यासिकेच्या माध्यमातून आजवर अनेक विद्यार्थ्यांनी उच्च पदावर नियुक्त झाले व आपले जीवनमान सुधारले आहे. तरुणांमध्ये साहित्य, संस्कार व मूल्यांची जोपासना व वृद्धी व्हावी, यासाठी ग्रामपंचायत इमारतीच्या पहिल्या मजल्यावर वैविध्यपूर्ण विषयांवर ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. तरुणांसाेबतच ज्येष्ठांचीही विशेष काळजी त्यांनी घेतली आहे. लासलगाव ज्येष्ठ नागरिक संघाला जागा उपलब्ध करून देऊन तेथे भव्य सुसज्ज इमारत विरंगुळा भवन ज्येष्ठांना बांधून दिले आहे. आज चारशे ते पाचशे ज्येष्ठ नागरिक सभासद या भवनाचा लाभ घेत असतात. तरुणांच्या आरोग्यवृद्धीसाठी वार्डांमध्ये ग्रीन जिम, तसेच गावात दोन भव्य व्यायाम शाळा त्यांनी उभारल्या आहेत.त्याच बरोबर सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेऊन ग्रामपंचायत मालकीचे एक मंगल कार्यलय देखील उभारले.

गावाची जबाबदारी यशस्वीपणे पेलताना आशिया खंडातील अग्रगण्य कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालकपदही त्यांनी भूषविले. आपल्या कार्याच्या जोरावर ते बाजार समितीचे दोनदा सभापती देखील झाले. सध्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर संचालक म्हणून कार्यरत आहेत, तर उत्तर महाराष्ट्रातून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदावर त्यांची कारकीर्द आणखी बहरत आहे.

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची सूत्रे हाती घेतल्यावर शेतकरी-कामगार-व्यापारी या त्रिसूत्रीला विश्वासात घेऊन  बाजार समितीच्या चेअरमनपदी असताना, त्यांनी शेतकरी हिताचे अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले. शेतकऱ्यांची होणारी  क्विंटल मागे दोन किलो कांदा कपात बंद करत त्यांनी वर्षानुवर्षे सुरू असलेली ही अनिष्ट परंपरा कायमस्वरूपी बंद केली. त्यांचेच अनुकरण पुढे जिल्हाभरातील बाजार समित्यांनी केले. या निर्णयामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना फायदा आजही होतं आहे . याशिवाय शेतकऱ्यांना भोजन, शेतकरी निवास, अशा सुविधा बाजार समितीच्या आवारात त्यांनी उपलब्ध करून दिल्या.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून टंचाईमुक्त महाराष्ट्र अभियानांतर्गत गावोगावी पाझर तलाव, नदी-नाल्यांचा गाळ काढून त्यांची खोली वाढवत पाणीसाठा वाढविण्यासाठी उपाययोजना म्हणून या कामांना जेसीबी व पोकलेन मशीन उपलब्ध करून दिले. त्यातून शेतकऱ्यांच्या सिंचन क्षेत्रवाढीसाठी व शिवार रस्त्यांसाठी प्रोत्साहन मिळाले. याचाही फायदा हजारो शेतकऱ्यांना होतो आहे. त्याचबरोबर दुष्काळी स्थितीत गावातील नागरिकांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी गावोगावी पाणी साठविण्यासाठी पाण्याच्या टाक्यांचे वाटप त्यांनी बाजार समितीच्या माध्यमातून केले. गावातील चौक, मंदिर परिसरात आबालवृद्धांना बसण्यासाठी सिमेंट बाक बसवून दिले. कांद्याच्या भावाची घसरण, कांदा निर्यातबंदी व यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान या सगळ्या गोष्टींना आळा घालण्यासाठी वेळोवेळी त्यांनी शासन दरबारी शिष्टमंडळ नेले आणि शेतकरी हिताचे निर्णय घेण्यासाठी सरकारला भाग पाडले. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ घेऊन त्यांनी दिल्ली येथेही धडक देत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना देखील निर्यातबंदीविषयी अवगत केले व कांदा अनुदान देण्यासाठी शेतकऱ्यांचा आवाज पंतप्रधानांपर्यंत पोहोचविला. भारताचे तत्कालीन कृषिमंत्री राधा मोहन, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनाही शेतकऱ्यांच्या व्यथा लक्षात आणून दिल्या. जयदत्त होळकर यांनी सामाजिकताही तन्मयतेने जोपासली. मातोश्री स्व. कुसुमताई होळकर यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आदिवासी भागातील शेतकरी कुटुंबातील मुलींचे सामुदायिक विवाह सोहळे आयोजित करून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली. शेतकरी हितासाठी लढणारा नेता म्हणून जयदत्त होळकर यांच्याकडे महाराष्ट्रभर पाहिले जाते. मितभाषी, नेतृत्वगुणसंपन्न, सर्वांना समजून घेऊन सर्वांना सोबत घेऊन चालणारे, विकासाचाच ध्यास असणारे सर्वसमावेशक नेतृत्व म्हणून जयदत्त होळकर यांचा परिचय आहे. जयदत्त होळकर यांचा हा कर्तृत्वपट त्यांच्यातील नेतृत्वगुणांनी आणखी बहरत राहणार आहे.

----------------------------------------------------

होळकर कुटुंबीयाने घेतलेला लोकसेवेचा वसा आणि सामाजिक, राजकीय वारसा पुढे नेण्यासाठी प्रामाणिकपणे काम करत आहे. लोकभावना व त्यांच्या अडीअडचणी, प्रश्नांशी समरस होऊन त्या सोडविण्याचे काम करताना मोठे समाधान लाभते. शेवटच्या घटकाला प्रगतीची फळे चाखता यावी यासाठी प्रयत्न असेल.

जयदत्त सीताराम पाटील होळकर

 9822077299