नाशिक| राज्यातील सर्व रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिन वाढ या प्रमुख मागणीसह प्रलंबित इतर न्याय हक्काच्या मागण्यांबाबत अन्न पुरवठा विभागाचे प्रधान सचिव यांच्या उपस्थितीत स्वस्त धान्य दुकानदार संघटना आणि शॉपकिपर्स फेडरेशनच्या महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची दि. २४. ऑक्टोबर रोजी दुपारी ०४ वाजता मंत्रालयात बैठक होणार आहे.
शासनाच्या परिपत्रकात म्हटले आहे, अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघ, पुणे यांनी दि. ५ ऑक्टोबर २०२४ तर पुणे ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉपकिपर्स फेडरेशन यांनी दि. ३ ऑक्टोबरला राज्य शासनाला निवेदन दिले होते. शासनाने त्यानिवेदनाची दखल घेतली आहे. यावर चर्चा करून तोडगा काढण्यासाठी स्वस्त धान्य दुकानदार आणि शॉपकिपर्स फेडरेशनच्या ५ पदाधिकाऱ्यांना बैठकीसाठी मुबई मंत्रालयात बोलावल्याचे नमूद करण्यात आले आहे.
ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉपकिपर्स फेडरेशन यांनी १० ऑक्टोबर रोजी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पुरवठा मंत्री, पुरवठा सचिव यांना मागण्यांबाबत लेखी कळविले होते. त्याप्रमाणे तोडगा न निघाल्यास १ नोव्हेंबर पासून धान्य न उचलण्याचा निर्णय घेतला असल्याचे दिलेल्या निवेदनात अध्यक्ष गणपत डोळसे पाटील आणि नाशिकचे अध्यक्ष निवृत्त कापसे यांनी स्पष्ट केले आहे. मात्र या बैठकीतून मार्ग निघून धान्य वितरण सुरळीत सुरू होईल अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.