- सोमवारपासून संतश्रेष्ठ सोपानदेव प्रदक्षिणा दिंडीचे आयोजन - TheAnchor

Breaking

October 13, 2024

सोमवारपासून संतश्रेष्ठ सोपानदेव प्रदक्षिणा दिंडीचे आयोजन

इचि करीता पंचक्रोशी।
चुके जन्म मरण चौऱ्यौंशी।
चारी मुक्ती होती दासी।
येवोनी चरणाशी लागती।।

नाशिक| पुण्यपावन श्रीक्षेत्र सासवड संतश्रेष्ठ सोपानदेव महाराज यांच्या वास्तव्याने पुनीत झालेली ही तीर्थभूमी, या सासवड तीर्थक्षेत्राची पंचक्रोशी प्रदक्षिणा प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षी दि. १४ ऑक्टोबर रोजी सोमवार अश्विन शुद्ध एकादशीच्या पर्वकाळावर सकाळी श्री संत सोपानदेवांच्या समाधीस अभिषेक करून पंचक्रोशी प्रदक्षिणा दिंडीला प्रारंभ होणार असून  गुरुवार दि. २४ ऑक्टोबर रोजी आश्विन वद्य अष्टमीला सकाळी श्री संत सोपानदेव मंदिर सासवड येथे ९ ते ११ काल्याच्या कीर्तनाने सांगता होणार आहे.

या पंचक्रोशी प्रदक्षिणामध्ये पूण्यपावन स्वयंभू शिवलिंग लवथळेश्वर, श्री क्षेत्र जेजुरी, श्री आद्य रामायणाचार्य वाल्मीक ॠषी संजीवन समाधी, श्री स्वयंभू शिवलिंग बनेश्वर देवस्थान, श्री भगवती जगदंबा कोंढणपूर योगिनी माता, कौंडण्यपूर्ण निक्षेप, योगिनी माता प्रत्यक्ष असे श्री संत नामदेव महाराजांच्या गाथेमध्ये ज्यांचे वर्णन आहे पाश्चात ।।पूर्वी ब्रह्म याचे स्थान। येथे तप केले गहन। महादेव येऊन आपण। याशी प्रसन्न झाले ।।असे ब्रह्मयाने स्थापन केलेले चतुर्मुख देवस्थान शिवशंभू महादेव तदनंतर॥ ब्रह्मा इंद्र तेहतिस कोडी ।नवही नाथ सवंगडी ।।असे ज्या नवनाथांचे वर्णन आहे. त्या नवनाथातील श्री चैतन्य कानिफनाथ मंदिर बोपगाव कानिफनाथ गड तदनंतर भक्ताच्या पावन भेटीसाठी आलेले बना मधील श्री स्वयंभू विठोबा मंदिर डाळिंब बन दौंड, तसेच भुलेश्वरा लागी पूजा केली सांग ।भक्त पांडुरंग तीन रात्री॥ असे स्वयंभू शिवलिंग भगवान भुलेश्वर, सिद्ध देवस्थान भगवान सिद्धेश्वर नायगाव.

पांडव वनवासामध्ये असताना पांडवांनी आपल्या वडिलांचे पिंडदान जेथे केले, असे प्राचीन शिवालय विशेष आकर्षण असलेले भगवान पांडेश्वराचे पावन दर्शन, त्याच्यानंतर अर्जुनाच्या पदस्पर्शाने पावन झालेले गाव जवळा अर्जून, त्याच्यानंतर पुण्यपावन कऱ्हाच्या काठावरील भगवान नागेश्वर, पुण्यपावन बेलापासून निर्माण झालेले बेलसरचे बेलेश्वर, पुण्य पावन भगवती यमाई जगदंबा अशा या पुण्य पावन सर्व देवस्थानांची ही पंचक्रोशी प्रदक्षिणा आहे. सर्व वारकऱ्याना दोन वेळचे भोजन दोन वेळ अल्पोपहार आदी सर्व व्यवस्था निशुल्कपणे केली जाते, तरी आपण या देव दुर्लभ पंचक्रोशी प्रदक्षिणेस सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले. या पंचक्रोशी प्रदक्षिणेची फलश्रुती मिळवावी म्हणून ही पंचक्रोशी प्रदक्षिणा केलीच पाहिजे, असे श्री संत सेना महाराज बाराशेच्या शतकामध्ये सांगून गेले आणि म्हणून त्याप्रमाणे त्यांना डोळ्यापूढे ठेवून ही पंचक्रोशी प्रदक्षिणा आरंभीली जाते, आपण सर्व मंडळींनी या पंचक्रोशी प्रदक्षिणेस आगत्याने यावे  रविवार दि. १३ रोजी सायंकाळी श्रीक्षेत्र सासवड सोपानदेव मंदिर येथे मुक्कामी यावे आपणास श्री संत सोपानदेव पंचक्रोशी प्रदक्षिणा सासवड यामध्ये सोमवारी सहभागी होता येईल, असे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे.