त्र्यंबकेश्वर|दिअँकर वृत्तसेवा| श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे लवकरच कोजागिरी पोर्णिमेपर्यंत महाराष्ट्रातील कोल्हापूर, माहूर व सप्तश्रुंग येथे साडी चोळी अर्पण केली जाणार असल्याची माहिती अध्यक्ष व विश्वस्त मंडळाततर्फे देण्यात आली.
श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर व श्री क्षेत्र सप्तशृंगी गड या तीर्थक्षेत्रांचा अतिशय पौराणिक संबंध आहे. धार्मिक कथा-परंपरेच्या आधारावर मागील अनेक वर्षापासून श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील गोदावरी नदीच्या उगम स्थानाचे तीर्थ हे श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील कावड धारकांच्या माध्यमातून दरवर्षी श्री क्षेत्र सप्तशृंगी गड येथे पायी प्रवास करून नेले जाते. त्याची विधिवत पूजाविधी करून कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आई श्री सप्तश्रृंगी मातेच्या अभ्यंग स्नानाला ते तीर्थजल वापरण्याची प्रथा सुरू आहे. तरी मागील वर्षापासून दरवर्षी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील तीर्था बरोबर आई श्री सप्तशृंगी मातेला भरजरी वख- पैठणीसाडी (हातमागावर विणलेली १४ वारासह ४ वार स्वतंत्र चोळी) तसेच ओटी भरण्याची प्रथा श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे सुरू करण्यात आलेली आहे.
या अनुषंगाने मा. विश्वस्त मंडळाच्या सभेत पारित करण्यात आलेल्या ठरावाप्रमाणे आई श्री. सप्तशृंगी मातेसह महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठ येथे अशा प्रकारे कोजागिरी पोर्णिमच्या दिवशी श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे भरजरी वस्त्र-पैठणीसाडी तसेच ओटी भरण्याचा निर्णय घेतला. देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त प्रतिनिधीतर्फे श्री तुळजाभवानी मातेला अर्पण केलेली भरजरी वस्त्र-पैठणीसाडी परिधान करण्याची सेवा सुरू करण्यास मान्यता मिळाली आहे. लवकरच कोजागिरी पोर्णिमेपर्यंत कोल्हापूर, माहूर व सप्तश्रुंग येथे साडी अर्पण केली जाणार असल्याचे अध्यक्ष नितीन जीवने, सचिव श्रीया देओचक्के, विश्वस्त कैलास घुले, पुरुषोत्तम कडलग, रुपाली भूतडा व स्वप्नील शेलार, सत्यप्रिय शुक्ल, मनोज थेटे, प्रदीप तुंगार यांनी सांगितले. शिवजींच्या त्र्यंबक देवस्थानकडून तुळजाभवानी या शक्तीपीठाला पाठविलेल्या भेटीची सुरू असलेल्या शिव- शक्तीचे प्रतीक असून या परंपरेचे सर्वत्र स्वागत होत आहे.
प्रतिक्रिया
ट्रस्टचा संकल्प लवकरच पूर्णत्वास: माने
त्यानुसार सचिव तथा तहसिलदार माया माने यांनी लवकर ठराव घेत आपली इतर तिन्ही शक्तीपिठाप्रमाणे तुळजाभवानी मातेला देखिल कोजागीरी पोर्णिमेला श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचा संकल्प पूर्णत्वास येईल, असे सांगितले.
तुळजापूर येथे सवाद्य मिरवणुकीने साडी चोळी मनी-मंगळसूत्र सुपूर्द, कोजागिरीला भरणार ओटी
पहिल्या वर्षी नऊ वाराची पैठणी सर्व विश्वस्तांनी स्वखर्चाने देण्याचे ठरवून साडी व मनी मंगळसूत्र, सवाद्य मिरवणूक काढून विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांनी सोमवारी तुळजापूर येथे ट्र्स्टला सुपूर्द केली, असून विधिवत पूजा करून ती कोजागिरीला अर्पण करण्यात येणार आहे. तुळजापूर येथे विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांच्यासह प्रशासकीय अधिकारी अमित माचवे, पीआरओ उत्तम भांगरे, हेमंत गांगुर्डे, ओमकार आंबेकर, पोपट आदी कर्मचारी उपस्थित होते.