नाशिक रोड|प्रतिनिधी|मध्य रेल्वेच्या ऑपरेशन नन्हे फरिश्ते मोहिमेला मोठे यश मिळत आहे. या मोहिमे अंतर्गत कौटुंबिक वाद, किरकोळ कारणावरून घरातून पळून जाऊ पाहणा-या ४१४ लहान मुलांना पुन्हा त्यांच्या कुटुंबाकडे सुखरूप हवाली करण्यात आले. ऑगस्ट ते ऑक्टोबर २४ या तीन महिन्यात वाट चुकलेल्या ४१४ मुलांना कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात आले.
काही मुले भांडण, कौटुंबिक समस्यांमुळे किंवा चांगल्या आयुष्याच्या, शहराच्या ग्लॅमरच्या शोधात आपल्या कुटुंबियांना न सांगता नाशिक रोड आदी रेल्वे स्थानकावर येतात. तेथून रेल्वेने मुंबईसारख्या मोठ्या शहरात जाऊ पाहतात. रेल्वे स्थानकावर बावरलेली, भुकेलेली, थंडीत कुडकुडत रडवेली झालेली अशी मुले, मुली रेल्वे सुरक्षा दलाचे जवान आणि नन्हे फरिश्तेचे स्वयंसेवक हेरतात. हे प्रशिक्षित कर्मचारी विविध स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने मुलांच्या समस्या समजून घेतात आणि त्यांना त्यांच्या पालकांकडे पुन्हा जाण्यासाठी प्रबोधन करतात. या उदात्त सेवेबद्दल पालक रेल्वे आणि स्वयंसेवी संस्थांप्रती कृतज्ञता व्यक्त करतात. मध्य रेल्वेचे रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) रेल्वे स्थानकात चोवीस तास गस्त घालत असते. या दलाकडे रेल्वे व प्रवाशांची मालमत्ता आणि प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
याशिवाय ते कुटुंबियांशी किरकोळ वादातून घरातून दुस-या शहरात पळून जाऊ पाहणा-या मुलांच्या सुटकेसाठी मोहिम राबवत असतात. त्यासाठी ऑपरेशन नन्हे फरिश्तेतंर्गत अन्य स्वयंसेवी संस्थेची मदत घेतली जाते. १ ऑगस्ट ते ३१ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत या दलाने एकूण ४१४ मुलांना (३०६ मुले आणि १०८ मुली) त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात दिले.
सुटका करण्यात आलेल्या मुलांचे तपशील पुढीलप्रमाणे आहेत.
ऑगस्ट-२०२४
९७ मुलगे आणि ४४ मुली- एकूण १४१ मुले
सप्टेंबर-२०२४
१२५ मुलगे आणि ३५ मुली- एकूण १६० मुले
ऑक्टोबर-२०२४
८४ मुलगे आणि २९ मुली- एकूण ११३ मुले
एकूण मुलगे – ३०६
एकूण मुली – १०८
एकूण मुले- ४१४*