फडणवीस अन् मनकवडे मोदी?
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दुसऱ्या टप्प्यात येऊन पोहचली आहे. राजकीय पक्षांच्या नेत्यांचा प्रचार सभांचा धडाका सुरू असून आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धुळे येथून महाराष्ट्राच्या प्रचाराचा श्रीगणेशा करून निवडणुकीची रंगत वाढवली आहे. धुळ्याच्या सभेत मोदी यांनी महाविकास आघाडीवर शरसंधान साधले. विकासासाठी केंद्रात सत्ता दिली तशी महाराष्ट्रात ही भाजपा महायुतीला द्या, आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या मनातील इच्छा पूर्ण करू असे जनतेला आश्वासन दिले. त्यापाठोपाठ महाराष्ट्रातील प्रचारादरम्यान अमित शहा यांनीही पंतप्रधानाच्या आश्वासनाची री-ओढत याचा पूनर्रउच्चार केला. अन् फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याचे सूतोवाच असल्याचे राजकीय वर्तुळात म्हटले गेलेे.
मोदी-शहा यांनी महाराष्ट्रात येऊन असे संकेत दिले, त्याला अनेक घडामोडींची पार्श्वभूमी आहे. दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होता होता फडणवीस यांना अचानक उपमुख्यमंत्री व्हावे लागले, ते तयार नव्हते पण सरकारवरील पक्षांची पकड राहावी यासाठी शहा यांनी काढलेल्या समजुतीनंतर उपमुख्यमंत्री म्हणून काम करण्यास राजी झाल्याचे बोलले जाते. फडणवीस यांची हीच नाराजी दूर करण्याचा कदाचित प्रयत्न असावा. सध्या तरी महाराष्ट्रातील कार्यकर्ते, नेते यांचे मोहोळ असलेला फडणवीस यांचा सारखा दुसरा नेता नाही. चाणाक्ष आणि अभ्यासू ही आहेत. महाराष्ट्रातील राजकारणावर चांगली पकड आहे.
म्हणून निवडणुकीनंतर ज्यांच्या जागा जास्त असतील त्याचा मुख्यमंत्री होईल असे शहा बोलत असले तरी भाजपाचा मुख्यमंत्री असावा यासाठी त्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बोलावून तुम्हाला मुख्यमंत्री बनवण्यामागे भाजपा आमदारांचा मोठा त्याग असल्याचे सांगावे लागले, एक प्रकारे शिंदे यांना अप्रत्यक्षपणे त्यांनी यंदा भाजपचाच मुख्यमंत्री असेल याचा सूचक इशारा ही दिला. त्यासाठी संघ आणि भाजपचे कार्यकर्ते झटून कामाला लागल्याचे दिसत आहे. लोकसभेत संघाने प्रचारात भाग न घेतल्याने त्याचा फटका ही भाजपाला बसला. त्यामुळे भाजपा आता ताक ही फुंकून पेत आहे. संघ आणि कार्यकर्त्यांच्या मनातील मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे बघितले जात आहे.
२०१९ विधानसभा निवडणूकीत १०५ जागा आणि सर्वाधिक ३७ टक्के मते भाजपाला होती, त्यामुळे भाजपची रणनीती त्यादृष्टीने सुरू आहे. फडणवीस यांची मन की बात शहा- मोदी यांनी हेरली असून कदाचित मनकवडे मोदी यांनी फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदाची इच्छापूर्ण करण्यासाठी जनतेला भाजपा महायुतीचे सरकार सत्तेवर आणण्याचे आवाहन केले असावे. त्यात त्यांना कितपत यश मिळते हे निवडणुकीनंतर स्पष्ट होईल.