नाशिक| शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहे. शेतकऱ्यांना घेतलेले कर्ज फेडता येत नाही. त्याच्या मालाला चांगली किंमत मिळत नाही, त्यामुळे कर्ज फेडण्याची त्याची शक्ती क्षीण झाली आहे. तो कर्जबाजारी होत आहे अशी समस्या महाराष्ट्रात निर्माण झाली असून त्याची यापासून सुटका करायची असेल तर त्याच्या शेतमालाला चांगली किंमत दिल्यास काळया आईशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्यास सन्मानाने जगता येईल असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी आज येथे केले.
महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शरद पवार हे नाशिक दौऱ्यावर होते. शहरातील उमेदवारांच्या नाशिक येथील आयोजित सभेत ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा अध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, शहराध्यक्ष गजानन शेलार, गोकुळ पिंगळे, पुरुषोत्तम कडलग, नाशिक पूर्वचे उमेदवार गणेश गिते, मध्यचे वसंत गिते. देवळाली मतदार संघाचे योगेश घोलप उपस्थित होते.
पवार पुढे म्हणाले की, भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांना रोखण्यासाठी आम्ही इंडिया आघाडी बनवली. देशाची सर्व शस्त्रे त्यांच्या हाती गेल्यास सर्व देशभर अस्थिर परिस्थिती निर्माण होईल. पंतप्रधान ४०० जागा मागत फिरत होते. संविधानानुसार ३०० जागा असल्यातरी सरकार स्थापन होते. आम्हाला शंका आली. चारशे जागा या संविधानात बदल करण्यासाठी मागितल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला. आम्ही चारशे जागा मिळू न देण्याचा निर्धार केला. जनतेने बहुमतापासून दूर ठेवले.
लहान मुली, स्त्रिया, शेतकरी, कष्टकरी कामगारांचे प्रश्न आहेत. स्त्रिया व मुलींवर अत्याचार वाढले असून त्याला आवर घालण्याची गरज असून लाडकी बहीण योजनेपेक्षा महिलांना संरक्षण देण्याची गरज असल्याचे पवार यांनी सांगितले. स्त्रिया आणि मुलींवरील अत्याचार रोखण्यासाठी सर्वांना सामूहिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. मुले शिकत आहेत पण मुलांच्या हाताला काम मिळत देशातील सर्व मुलांना काम करण्याचा अधिकार मिळाला पाहिजे असे सांगून त्याला जोपर्यंत नोकरी मिळत नाही तोपर्यंत ४००० हजार रुपये तरतूद केली पाहिजे असा विचार आहे. नाशिकमधील जुन्या आठवणीना उजाळा दिला.