त्र्यंबकेश्वर| दिअँकर वृत्तसेवा| श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे दि. ०२ नोव्हेंबर दीपावली पाडवाच्या शुभमुहूर्तापासून ऑनलाइन दर्शन सुविधेला सुरुवात करण्यात येणार आहे, अशी माहिती विश्वस्त मंडळातर्फे देण्यात आली आहे.
रोज दिवसभरासाठी ४ हजार भाविकांना या सुविधेचा लाभ घेता येईल. यात २ हजार भाविक हे कुठल्याही ठिकाणाहून फोनद्वारे बुकींग करू शकतील व २ हजार भाविक हे प्रत्यक्ष श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर शहरात येथून करू शकतात असे मंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. यासाठी शहरात आलेल्या भाविकांसाठी दोन सेंटर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. एक सेंटर– शिवप्रासाद भक्तनिवास व दुसरे सेंटर हे कुशावर्त तीर्थाजवळ असेल. या सुविधेचा लाभ घेतांना ज्या दिवशी ऑनलाइन फोनद्वारे बुकिंग केले असेल व पासवर जो दिनांक असेल त्याच दिवशी मंदिर उघडल्यापासून सकाळी ०५.३० ते मंदिर बंद होईपर्यंत म्हणजेच रात्री ०८.०० वाजेपर्यंत भाविकाला दर्शन घेता येईल याची भाविकांनी नोंद घ्यावे असे सांगण्यात आले. भाविकांना एक दिवस अगोदर किंवा नंतर दर्शनाचा लाभ मिळणार नाही. मात्र ऑनलाइन फोनद्वारे बुकिंग भाविक कितीही दिवस अगोदर करू शकतात. तसेच सर्व भाविकांना विश्वस्त व्यवस्थापनाने विनंती केली आहे की, ही सुविधा सुरू झाल्यानंतर ऑनलाइन बुकिंग असल्याशिवाय दर्शन सुविधा प्राप्त होणार नाही, असे दिलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.
या सुविधेसाठी एकदा बुकिंग झाले असता सदर पास रद्द करता येणार नाही. तसेच परत देखील करता येणार नाही व त्या सदर पासवर दुसऱ्या व्यक्तीस सोडता येणार नाही. फोनद्वारे ऑनलाइन बुकिंग करतांना एक व्यक्तीला जास्तीत जास्त एका पासद्वारे ४ व्यक्तीचे बुकिंग करता येईल. मात्र या चारही व्यक्तींचे ओळखपत्र व नाव टाकणे अनिवार्य असेल. तसेच प्रत्यक्ष शहरात भाविक आल्यास एका वेळेस एका भाविकाचेच बुकिंग होईल. यावेळेस फेस रीडिंग व थंबद्वारे त्यांचे रजिस्ट्रेशन करण्यात येईल. व उत्तर महाद्वारावर भाविक आल्यानंतर त्यांना बारकोड असलेला देणगी दर्शन पास दाखवून व संगणकाद्वारे ओळख पटवणे आवश्यक असेल. त्यानंतर त्याला दर्शनासाठी आत सोडण्यात येईल. जर सदर व्यक्ति/भाविक याचा चेहरा अथवा थंब प्रिंट जुळले नाही तर प्रवेश नाकारण्यात येईल. ही सुविधा दिव्यांग लोकांसाठी मोफत असेल. मात्र त्यांच्याकडे दिव्यांग असण्याचे प्रमाणपत्र/ओळखपत्र असणे आवश्यक असेल. वर्षभरातील देवस्थानचे सण महाशिवरात्र, सर्व श्रावणी सोमवार, त्रिपुरी पौर्णिमा व श्री संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यात्रेचे ३ दिवस ही सुविधा भाविकांसाठी बंद असेल. म्हणजेच या दिवसाचे बुकिंग भाविकांना करता येणार नाही, अशी माहिती विश्वस्त पुरुषोत्तम कडलग, सत्यप्रिय शुक्ल व मनोज थेटे यांनी दिली आहे.