- देवाभाऊ रिटर्न्स! - TheAnchor

Breaking

December 3, 2024

देवाभाऊ रिटर्न्स!

 देवाभाऊ रिटर्न्स!

लोकसभेला महाविकास आघाडीची हवा होती, विधानसभेत ही आपलीच सत्ता येईल असा विश्वास त्यांना होता, मात्र चार महिन्यात वारे फिरले आणि महायुतीने काँग्रस प्रणित आघाडीचा सुपडा साफ करून महाराष्ट्राची सत्ता राखली. भाजपने १३२ जागा जिंकून युतीतील सर्वात मोठा पक्ष म्हणून मुख्यमंत्री पदावर दावा मजबूत केला. २०१९ विधानसभा निवडणूकीत १०५ जागा आणि सर्वाधिक ३७ टक्के मते भाजपाला होती, यंदा १३२ जागा मिळाल्या असल्या तरी वोटिंग परसेंटटेज २६ टक्क्यांवर घसरले तरी यंदा एवढे मोठे यश मिळाले हे महत्वाचे आहे.

निवडणुकी आधी भाजपने युतीतील आपल्या सहकारी पक्षांना सर्वात जास्त ज्याच्या जागा त्यांचा मुख्यमंत्री होईल हे स्पष्ट केलेले होते. त्यामुळे भाजपने त्यादृष्टीने रणनीती आखली अन् ती यशस्वी करुन दाखवली. त्यासाठी लोकसभेतील प्रचारात सहभागी न झालेल्या संघाची मनधरणी केली. त्याचा परिणाम निवडणुकीत बघायला मिळाला. लाडकी बहिण आणि एक हैं तो सेफ हैं या घोषणांचा भाजपने खुबीने वापर करून धुळे येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री पदाची इच्छा पूर्ण करण्यासाठी महायुतीला विजयी करण्याचे आवाहन केले.

जनतेने भाजपच्या पदरी घवघवीत यश टाकून महायुतीला स्पष्ट कौल दिला. भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्यानेे साहजिकच मुख्यमंत्री पदाची दावेदारी मजबूत झाली. शहा व मोदी यांच्यासह संघाचा पसंतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून देवेंद्र फडणवीस याचे नाव या आधीच निश्चित आहे. भाजपमध्ये फडणवीस यांच्या नावाला विरोध नाही. मराठा आरक्षणावरून जरांगेचा फडणवीस यांना विरोध असला तरी जरांगे फॅक्टरचा भाजपवर परिणाम दिसला नाही. त्यामुळे सध्या तरी फडणवीस यांच्या शिवाय दुसरा सक्षम पर्याय नाही. यापूर्वी मुख्यमंत्री होता होता उपमुख्यमंत्री झाले. त्यावेळी हाय कमांडच्या आदेशाला प्राथमिकता देत उपमुख्यमंत्री पदावर फडणवीस यांनी समाधान मानले. पक्ष त्यांचा त्याग विसरलेला नाही. फडणवीस यांनी हाय कमांडचा आदेश वेळोवेळी पाळला त्याचे फळ त्यांना मिळाले. 

हाय कमांड विनोद तावडे यांच्यासह पक्षातील मराठा नेते व  इतर नेत्यांशी चर्चा करत आहे. असे असले तरी संघाने फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करावे अशी ठाम मागणी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती निवडणुकीला सामोरे गेली. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे ही नाव पुन्हा चर्चेत आणण्याचा प्रयत्न झाला, असला तरी नैसर्गिक न्यायाप्रमाणे ज्याच्या जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री, त्यामुळे शिंदेंनी सध्या माघार घेतली असली तरी शिवसेनेची नाराजी लपून राहिलेली नाही. तसेच फडणवीस आपल्या दोन्ही सहकारी पक्षांच्या नेत्यांशी कसे जुळवून घेतात हे बघावे लागेल. यापूर्वी ही दोन्हीशी मिळवून घेत देवाभाऊ यांनी सरकार चालवले आहे.

सहकारी पक्ष शिवसेनेच्या ५६ जागा असून् राष्ट्रवादी काँग्रेसला ४१ जागा आहेत. त्यात सर्वधिक महत्वाच्या खात्यांसाठी रस्सीखेच सुरू आहे. शिवसेना गृहमंत्री पदावर आडून बसली आहे. मुख्यमंत्री पदानंतर गृहमंत्रीपद आपल्याकडे राहवे असे भाजपचे प्रयत्न आहेत. तर अर्थमंत्रीपद अजितदादा पवार यांच्याकडे जाण्याची शक्यता लक्षात घेऊन राजी- नाराजी नाट्य सुरू आहे, आता ५ डिसेंबरला महायुतीचा शापथविधी सोहळा होणार आहे. त्यात देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्यासह महत्वाच्या चार ते पाच जणांचा शपथविधी होईल, असे सांगितले जाते. विनोद तावडे यांची ही शक्यता आहे. मात्र महायुतीला लाडकी बहीण योजनेने तारले असेल तरी सध्या महायुतीत भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्याने लाडक्या बहिणींसह सर्वांचा लाडका मुख्यमंत्री म्हणून देवाभाऊच आघाडीवर आहे.

दिगंबर मराठे