नाशिक|दिअँकर वृत्तसेवा|संस्थान श्री कपालेश्वर महादेव मंदिर येथे भाविकांनी केलेल्या धातूच्या वस्तूंचे मूल्यांकन नुकतेच करण्यात आले त्याबाबतचा अहवाल प्राप्त झाला असून, संस्थानकडे सोन्याच्या वस्तूंचे मूल्यांकन ९८ हजार ८०० रू. तर चांदीच्या वस्तू मूल्यांकन ३ लाख ७२ हजार २१५ इतके आले आहे.
संस्थानचे अधिकृत मूल्यांकनकर्ता चेतन राजापुरकर यांच्यामार्फत करण्यात आले. राजापुरकर यांनी कपालेश्वर चरणी मानद सेवा दिली. नवीन विश्वस्त मंडळ अस्तित्वात आल्यापासून संस्थानने भाविकांसाठी पारदर्शक कारभार करण्याकडे भर दिलेला आहे. श्रीकपालेश्वर मंदिराच्या इतिहासात पहिल्यांदा भाविकांनी दिलेल्या वस्तूंचे मूल्यांकन झाल्याने संस्थानच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. मूल्यांकन करताना संस्थानचे अध्यक्ष ॲड. अक्षय कलंत्री, खजिनदार सी.ए. श्रीकांत राठी, विश्वस्त मंडलेश्वर काळे, श्रद्धा दुसाने (कोतवाल), रावसाहेब कोशिरे आदी उपस्थित होते.
वैशिष्ट्ये पूर्ण दागिन्यांचा समावेश
श्री कपालेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट यांच्या ताब्यातील सोने व चांदी दागिन्यांचे मूल्यांकनाचे काम कॅमेऱ्याच्या निगराणी खाली आम्ही ट्रस्टचे अधिकृत व्हॅल्यूअर म्हणून पूर्ण केले. मूल्यांकन अहवाल ट्रस्ट कडे सोपावलेला आहे. मूल्यांकन दागिन्यांमध्ये काही वैशिष्ट्ये पूर्ण दागिने बघायला मिळाले यात नवसपूर्ती निमित्ताने दिलेले विविध सोने व चांदी वस्तू जसे घराची चांदीची प्रतिकृती , चांदीचे पाळणे तसेच बेलपान हार , बेलपान , त्रिशूल इत्यादी दागिने मोठ्याप्रमाणात बघायला मिळाल्यात. तसेच मंदिरातील गुरव यांच्या ताब्यातील प्राचीन दुर्मिळ देवाचे दागदागिने उपलब्ध न झाल्याने त्याचे व्हॅल्यूशन करता आलेले नाही.
-चेतन राजापूरकर
गव्हर्नमेंट अप्रुड व्हॅल्यूअर
संस्थानतर्फे इतिहासात पहिल्यांदा कपालेश्वर महादेवाच्या भाविकांनी दिलेल्या वस्तूंचे मूल्यांकन करण्यात आले. भाविकांनी व संस्थानने कपालेश्वर महादेवांच्या शृंगारासाठी गुरवांकडे दिलेल्या वस्तू मूल्यांकन करणेकामी संस्थानमध्ये हजर करण्याबाबत सर्व ५ गुरव परिवारांना नोटीस पाठवण्यात आलेली आहे. परंतु अद्याप त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. सदरच्या वस्तू मूल्यांकन करणेकामी हजर न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
ॲड. अक्षय कलंत्री, अध्यक्ष , संस्थान श्री कपालेश्वर महादेव मंदिर