- त्र्यंबकेश्वरला ५ जानेवारीपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद - TheAnchor

Breaking

December 26, 2024

त्र्यंबकेश्वरला ५ जानेवारीपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद

नाशिक| दिअँकर वृत्तसेवा|  नाताळ आणि नववर्षाच्या निमित्ताने श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी दि. ५ जानेवारीपर्यंत राजशिष्टाचारा व्यतिरिक्त अन्य व्हीआयपी दर्शन सेवा बंद राहणार आहे, अशी माहिती त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त पुरुषोत्तम कर्डक यांनी दिली आहे.

ट्रस्टचे चेअरमन यांनी दिलेल्या निवेदनाची माहिती कर्डक यांनी दिली.  त्र्यंबकेश्वर हे अत्यंत महत्वाचे ज्योर्तिलिंग असल्यामुळे येथे भाविकांची दर्शनासाठी प्रचंड गर्दी असते. निरनिराळ्या माध्यमातून मंदिरात होणाऱ्या गर्दीमुळे, प्रशासनावर मोठा ताण असतो. तसेच निर्माण होणाऱ्या अडचणी व प्रश्न याचा विचार करता नाताळ व  नवर्षाच्या सुट्ट्यांच्या अनुषंगाने श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे अति महत्त्वाच्या व्यक्तींसाठी केंद्रीय- राज्य स्तरावरून अथवा जिल्हाधिकारी यांच्यामार्फत प्राप्त होणाऱ्या राज् शिष्टाचार संबंधी लेखी पत्रव्यवहारा व्यतिरिक्त अन्य सर्व प्रकारचे व्हिआयपी दर्शन दिनांक २२ डिसेंबरपासून दि. ५ जानेवारी २०२५ पर्यंत बंद राहणार आहे. 

त्याचप्रमाणे नियमित मंदिरामध्ये भाविकांची दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षा घेता, नाताळच्या सुट्टया तसेच इतर वेळी दर्शनासाठी येणाऱ्या अति महत्वाच्या व्यक्तींच्या संख्येमधील देखील कायमस्वरूपी विभागवार मर्यादा निश्चित करण्यात आली असून त्यानुसार दैनंदिनरित्या फक्त सकाळी ७ ते १० व सायंकाळी ६ ते ७ या निश्चित वेळेत २० अति महत्वाच्या व्यक्तींची दर्शनाची व्यवस्था श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे करण्यात येईल, तरी मंदिर प्रशासनावर गर्दीमुळे होणारा ताण तसेच निर्माण होणाऱ्या अडचणी विचारात घेता आपण श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टला सहकार्य करावे, असे आवाहन कर्डक यांनी केले आहे.