नाशिक| देशभरातील भाविकांच्या सुवर्णदानातून साडेआठ किलोचा सुवर्ण मुकुट बनवण्याचा संकल्प वर्षभरापूर्वी करण्यात आला होता. गुरुवारी रिलायन्स इंडस्ट्रीजचे व्हाईस चेअरमन मनोज मोदी यांच्या प्रयत्नातून त्र्यंबक राजाच्या चरणी सव्वा किलोचे सुवर्णदान करण्यात आले व सुवर्ण मुकुट बनवण्याच्या संकल्पनेला हातभार लावला. भाविकांच्या दानातून त्र्यंबक राजासाठी साडेआठ किलोचा सुवर्ण मुकुट बनवण्यात येणार असल्याचे त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांनी सांगितले.
मागील महिन्यात मनोज मोदी हे त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी आले होते, तब्बल २०० वर्षांपूर्वीचा सुवर्ण मुकुट नवीन बनवण्याचा संकल्प त्यांना सांगण्यात आला होता. देशभरातील भाविकांच्या सुवर्णदानतून साडेआठ किलोचा सुवर्ण मुकुट बनवण्याचा संकल्प वर्षभरापूर्वी करण्यात आला होता. त्यात सर्व भाविकांचा हातभार असावा असे देवस्थानतर्फे ठरवण्यात आले.
त्याप्रमाणे सुवर्णदानातून पाच किलोपेक्षा जास्त सोने देवस्थानकडे जमा झाले आहे. मनोज मोदी यांनी उरलेले सोने मी स्वतः देतो असे कबूल केले होते, परंतु अजूनही काही भाविक महाशिवरात्रीपर्यंत सोने दlन करण्यासाठी इच्छुक असल्याने ते १२५ तोळे दान करू शकतात असे सांगण्यात आले.
त्या अनुषंगाने त्यांचे सहकारी हितेशभाई यांनी सपत्नीक येऊन रितसर संकल्प करून सदर सव्वा किलो सोने देवस्थानकडे सुपूर्द केले. त्याप्रसंगी तत्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त कैलास घुले, रूपाली भुतडा, पुरुषोत्तम कडलग, मनोज थेटे, सत्यप्रिय शुक्ल, स्वप्निल शेलार व प्रदीप आप्पा तुंगार उपस्थित होते. या सुवर्णदानास ज्यांचे सहकार्य लाभले ते मनोज मोदी यांचे निकटवर्तीय मनोज तुंगार हे उपस्थित होते. या सुवर्णदानाची पावती त्यांचा सत्कार करुन सुपूर्द करण्यात आली. त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टमध्ये हे सर्वात मोठे दान असल्याचे कडलग यांनी सांगितले.