नाशिक|प्रतिनिधी|सराफ व्यवसायिकांनी जास्तीत जास्त आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पारदर्शकता आणि ग्राहकपयोगी सेवेवर अधिक भर द्यावे,असे मत ज्येष्ठ सराफी व्यवसायिक अनिल दंडे व राजेंद्र दिंडोरकर यांनी मांडले. या चर्चासत्रात २५ संघटनांचे पाचशेवर सभासद सहभागी झाले होते.
शहरात इंडीयन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन उत्तर महाराष्ट्र बोर्ड (IBJA) आयोजित सराफ व्यावसायिकांचे चर्चासत्र नुकतेच झाले. त्याप्रसंगी गिरीश नवसे, श्याम बिरारी, निलेश सराफ, राहुल महाले, इंडियन बुलियन असोसिएशनचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष व कार्यक्रम संयोजक चेतन राजापुरकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित प्रमुख मान्यवरांचा सत्कार आयोजकांच्या वतीने करण्यात आला. या कार्यक्रमात आनंद क्षेपकल्याणी व मनिषा क्षेमकल्याणी यांनी २४ कॅरेट व २२ कॅरेट सोने यावर परिसंवाद घेऊन मार्गदर्शन केले.
सराफी व्यासायिकांच्या या चर्चासत्रात २५ संघटनांचे ५०० सभासद सहभागी झाले होते. यशस्वी सराफ व्यावसायिकाचा प्रवास या कार्यक्रमाचा माध्यमांतून उलगडण्यात आला. त्याअनुषंगाने नाशिकचे प्रसिद्ध सराफी व्यावसायिक श्याम दुसाने लिखित 'सोनेरी प्रवास' या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले. पुस्तकात १४ व्यवसायिकांनी शून्यातून विश्व निर्माण केले त्यांची यशोगाथा मांडण्यात आली असून ती युवा पिढीला प्रेरणादायी ठरेल असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. 'सोनेरी प्रवास' या पुस्तकाचे लेखक श्याम दुसाने यांनी मुलाखतीद्वारे पुस्तकाच्या मागील उद्देश स्पष्ट केला. यश दुसाने यांनी मनोगत व्यक्त केले. आभार श्रुती दुसाने यांनी मानले.