'डीपसीक'एआयचे आव्हान!
चीनची एआय स्टार्टअप डीपसीकने आरवन (R1) मॉडेल तयार करून टेक कंपन्यांची झोप उडविली आहे. चीनी अभियंते लिआंग वेनफेंग यांनी फक्त ६ मिलियन डॉलरमध्ये ॲप बनविले आहे. कमी खर्चात तयार केलेल्या या चाटबॉटने टेक मार्केट क्षेत्रात खळबळ उडवून दिली. या एआय बॉटने थेट पाश्चिमात्य टेक जायंट कंपन्यांना आव्हान दिले. त्यामुळे २७ जानेवारी रोजी अमेरिकन शेअर बाजार घसरला. एनविडीया (Nvidia) या एआय कंपनीचे मार्केट व्हॅल्यू ६०० मिलियन डॉलरने घसरले. अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढे मार्केट पडले. अमेरिकन राष्ट्रपती ट्रम्प यांनीही दखल घेत अमेरिकन टेक कंपन्यांसाठी हा वेकअप कॉल असल्याचे सांगितले. त्यामुळे या कंपन्या खडबडून जाग्या झाल्या आहेत. एनविडियाचे मार्केट व्हॅल्यू ३.५ ट्रिलियन वरुन ते २.९ ट्रिलियन डॉलर इतके घसरले. मायक्रोसॉफ्ट, गूगल यांनाही आर्थिक फटका बसला. त्यामुळे चीन आणि अमेरिकेत टेक स्पर्धा आणखी वाढणार यात शंका नाही.
२०२२ पासून आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्नॉलॉजीचे वारे जगात पसरले. त्यामुळे डेटाचे विश्लेषण आणि मशीन लर्निगद्वारे हव्या त्या माहितीचे दालन वापरकर्त्यांना खुले झाले. फायनान्समध्ये शेअरमार्केचा ट्रेण्ड जाणून घेणे, रिटेल क्षेत्रात ग्राहकाची रुची, हेल्थकेअर क्षेत्रातील अपडेट मिळवता येणे शक्य झाले. यापूर्वी गुगल हे काम करत होते मात्र त्यापेक्षा ओपन एआय सोर्सचा आवाका मोठा आहे. सध्या ओपन एआय चाटजीपीटी (OpenAI ChatGpt) गुगल जेमिनी (Google Gemini) या एआय टूलचा दबदबा दिसून येतो. मेटा एआय (Meta AI) लामा एनविडिया (llama Nvidia) यांचे ही या क्षेत्रात वर्चस्व आहे. त्याला डीपसीकने आव्हान दिले, हे अवघे ६.५ एमबीचे फ्री ॲप असून त्याला अँड्रॉइडवर चक्क ४.७ रेटिंग आहे. ८ जानेवारी २०२५ ला ते अँड्रॉइडवर उपलब्ध झाल्यावर २८ जानेवारीनंतर प्ले स्टोअर वरुन १ कोटीच्यावर लोकांनी ॲप डाउनलोड केले. चाटजीपीटी १० करोड डाउनलोड आहे. डीपसीक ॲपल ओएसवर देखील मोठ्या प्रमाणात डाउनलोड केले जात आहे.
तसेच प्रतिस्पर्धी ओपन एआय चाटजीपीटीला अँड्रॉइडवर ४.६ रेटिंग असून ते २५ एमबीचे पेड ॲप आहे. इतर टूलच्या तुलनेत डीपसीक अत्यंत कमी खर्चात उपलब्ध असल्याने पाश्चिमात्य महागड्या 'एआय'पेक्षा डीपसीकला वापरकर्ते जास्त पसंती देत आहेत. एनविडीयाची एच-८०० चीपसह इतर कमी खर्चाच्या चीपचा वापर करून बनविलेले हे टूल एका क्लिकवर नेमकी माहिती उपलब्ध करुन देत असल्याचे वापरकर्त्यांनी सांगितले. कोडींग टास्क, कंटेंट बनविणे, तांत्रिक अडचण सोडविणे यात हे चाटजीपीटीला वरचढ असल्याचे वापरकर्त्यांचे म्हणणे आहे. डीपसीकला इमेज स्कॅनिंगमध्ये अधिक काम करण्याची गरज असल्याचे मत वापरकर्त्यांनी व्यक्त केले आहे. फाईल रीडिंग, वेब सर्चींग, इंटेलिजन्स क्यू अँड ए, डीप थिंक आदींसह गणितासाठी ते उपयुक्त असल्याचा दावा कंपनी करते. मात्र डेटूडे टास्कमध्ये ते कमी पडत असल्याचे टेक क्षेत्रातील तज्ञांचे मत आहे. तसेच चाटजीपीटीची क्षमता जास्त असल्याचे सांगतात.
१९५० ते १९९०० रुपये खर्च असून चाटजीपीटी पर आयटम नुसार चार्ज आकारते. त्यातुलनेत डीपसीक एआय बॉट खूपच कमी खर्चात उपलब्ध आहे. त्यामुळे अल्पवधीत यशस्वी झालेले आणि कमी खर्चात बनविलेल्या या ॲपचे गुपित शोधण्यात अमेरिकन टेक कंपन्यांचे अभियंते कामाला लागले. चांगली चीप आणि जास्त खर्च न करता ही चांगले एआय मॉडेल विकसित करता येते हे सिद्ध झाल्याने मेटाच्या अभियंत्यांची टीम ही कामाला लागली आहे. त्यामुळेच अमेरिकन कंपन्यांनी एआय संशोधन आणि विकासावर येत्या चार वर्षात मोठी गुंतवणूक करण्याची घोषणा अलीकडेच केली आहे. असे असले तरी टेक क्षेत्रात चीनचे वाढते वर्चस्व रोखण्यासाठी पाश्चिमात्य देशांनी उपाय योजना करण्यास सुरुवात केली आहे. चीनवर विश्वास ठेवणे कठीण असल्याचे या क्षेत्रातील तज्ञांना वाटते. चीनी ॲप डेटा चोरी करत असल्याचा आरोप पूर्वी पासून केला जातो. टिकटॉक व हुवाये या टेक कपंन्यांवर अमेरिका आणि भारताने यापूर्वीच डेटा चोरीचा ठपका ठेवून सुरक्षिततेच्या कारणास्तव त्यांना बॅन केले आहे. चीनी टेक कंपन्यावर सरकारचा अंकुश असतो. अभिव्यक्ती स्वातंत्र्य नसल्याने तो मुद्दा या कंपन्यांच्या विरोधात जातो. डीपसीकवर शी जिनपिंग व १९८९ मधील तियानमेन स्कवायर येथील घटनेबाबत माहिती टाकली असता ती संवेदनशील माहिती देण्यास असमर्थ असल्याचे दिसून आले. त्यावर ही सरकारचा प्रभाव असल्याची टीका केली जात आहे. त्यातुलनेत चाटजीपीटी सर्व माहिती उपलब्ध करुन देत असल्याचे टेक तज्ञांना दिसले. डेटा पॉलिसीे वाचली तर या अंतर्गत डीपसीक तुमचे नाव, ईमेल, मोबाईल डिव्हाईस, युजर आयडी, फोन नंबर, फोटो, व्हिडिओ, ॲक्टिव्हिटी हिस्ट्री, ट्रांझेशन हिस्ट्री आदी त्याच्याकडे घेत असल्याचे जाहीर सांगते त्यासाठी ते फ्रॉड रोखणे, आणि माहितीच्या सुरक्षिततेचा हवाला देतात. मात्र एकदा माहिती गेली की तुमचा त्यावर नियंत्रण नाही. ती माहिती त्यांच्या सरकारकडे ही जाण्याची भीती अनेक देशांना आहे अन् अनेक टेक तज्ज्ञ ही याबाबत चिंता व्यक्त करतांना दिसतात. मात्र असे असतांनाही डीपसीक डाऊनलोड करण्याचे प्रमाण वाढत आहे. म्हणून या एआय मॉडेलने पाश्चिमात्य टेक कंपन्यासमोर आव्हान उभे केले आहे.
दिगंबर मराठे
9370020141