- सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार - TheAnchor

Breaking

February 5, 2025

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले.


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुरू झाले आहे. या टेरिफ युद्धाचा धसका गुंतवणुकरांमध्ये दिसून येत असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून गुंतवणूकदार सोन्याकडे बघत आहे. त्यामुळे सोन्यामध्ये गुंतवणूक वाढत असून शुद्ध सोने ८४ हजारांवर पोहचले असून ३ टक्के जीएसटीसह हा भाव ८७२५० इतका झाला आहे.

----------------------------------------------

दरात ३ हजारांची वाढ


सध्या सोन्याचे दर २४ कॅरेटला ८७,२५० रु. तर २२ कॅरेटला ८०२७० रु. आहे. त्यामुळे सोने दरात ३ हजार रुपयांची एकदम उसळी घेतली आहे. ही भाववाढ आगामी काळात सुरूच राहण्याची शक्यता आहे.

गिरीष नवसे,
अध्यक्ष, नाशिक सराफ असो.

----------------------------------------------

टेरिफ वॉरचा परीणाम आहे


रात्री स्पॉट गोल्ड ०.८ टक्के वाढून  २८१८. ९९ डॉलर प्रति औंस झाले. (१८४६ जीएमटी) या सत्रापूर्वी २८३० डॉलरचा विक्रम गाठल्यानंतर यूएस सोन्याचे फ्युचर्स ०. ८ टक्के वाढून २८५७.१० डॉलरवर स्थिरावले. ट्रम्प यांच्या टेरिफ दरांच्या अनिश्चिततेमुळे सुरक्षित आश्रयस्थान म्हणून गुंतवणुकदार सोन्याकडे बघत आहेत. त्यामुळे व्यापार युद्धाच्या परिणाम स्वरूप आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याने उसळी घेतली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात आणखी सोने दर वाढण्याची शक्यता आहे.

मेहुल थोरात,
उपाध्यक्ष, नाशिक सराफ असो.

-------------------------------------------

ट्रॅप यांची पुढील पॉलिसी कशी राहील यावरच मार्केटची दिशा ठरेल

आंतरराष्ट्रीय बाजार सोन्याने नवा उच्चांक गाठला हा टेरिफ वॉरचा परीणाम असून पुढील काळात ट्रप सरकारची पुढील पॉलिसी कशी असेल यावर आता सर्व काही अंवलंबून आहे. असे असेल तरी ग्राहक आपली गरज व बाजाराची परिस्थिती लक्षात घेऊन केव्हाही सोने खरेदीला प्राधान्य देऊ शकता.

राजेंद्र दिंडोरकर
माजी अध्यक्ष, नाशिक सराफ असो.