- 'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक - TheAnchor

Breaking

March 11, 2025

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारताने एकदिवसीय स्पर्धेत भारताला तोड नसल्याचे दाखवून देत आपला दबदबा कायम राखला आहे. वर्ल्डकप क्रिकेट २०२३ मधील एकदिवसीय अंतीम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून ६ विकेट्सने पराभव पत्करावा लागला म्हणून रोहित शर्मा आणि संघाला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले. त्यानंतर झालेल्या आयसीसीेच्या जागतिक कसोटी सामन्याच्या स्पर्धेत ही ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला. एका ऑस्ट्रेलियन खेळाडूने एकदिवसीय चषकावर पाय ठेवल्याचा फोटो ही सोशल मीडियात व्हायरल झाला होता. तो प्रकार क्रिकेटवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक चाहत्याला खटकला. भारताला डिवचल्याची चर्चा रंगली. संपूर्ण सीरीजमध्ये दमदार कामगिरी करणाऱया भारताला त्याची सल होतीच. त्या पराभवाने संघातील दिग्गज खेळाडूंवर प्रश्न उपस्थित झाले परंतु भारतीय क्रिकेट बोर्डने खेळाडूंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत रोहित शर्माला चॅम्पियन ट्रॉफीपर्यंत कर्णधार ही करून टाकले. कर्णधार रोहितने हा विश्वास सार्थ ठरवला स्वतः पुढाकार घेत संघ सहकाऱ्यांसमोर एक उदाहरण ठेवले. सलामीला येऊन निडरपणे फटकेबाजी करून संघाला सुस्थितीत नेऊन ठेवण्याची त्यांची योजना वाखण्याजोगी होती. मंगळवारी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियावर भारताने केलेल्या ऐतिहासिक विजयामुळे भारत पाचव्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला संघ बनला आहे, तसेच ऑस्ट्रेलियाचा अहंकार तोडून घरचा रस्ता दाखवत कसोटी आणि एकदिवसीय चषक स्पर्धेचा वचपा देखिल भारताने काढला. रोहितने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात देखिल त्याच पद्धतीने खेळ करत ७६ धावा फटकावल्या व २५ वर्षानंतर न्युझीलंडचा पराभव केला. ऑस्ट्रेलिया विरुद्ध सेमी फायनमधील विराट कोहलीची ८४ धावांची खेळी आणि रोहितच्या अंतिम सामन्यातील ७६ धावा करून या दोन्ही खेळाडूंनी टीकाकारांना आपल्या खेळीने चोख उत्तर दिले. बुमराच्या अनुपस्थितीमध्ये शमी, पांडया, वरुण चक्रवर्ती, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव यांनी अप्रतिम गोलंदाजी केली. सिरीजमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या तीन गोलंदाजांमध्ये वरुण आणि शमीचा सामावेश आहे. त्यांनी प्रत्येकी ९ विकेट घेतल्या. तर फलंदाजीत शुभमन गिल, श्रेयस, रोहित, विराट, के एल राहुल, अक्षर यांनी संघाला साजीशी कामगिरी केली. सीरिजमध्ये रचीन रवींद्र याने सर्वाधिक २६३ धावा धावा काढल्या. त्यांनतर श्रेयस  २४३ धावा करणारा दुसरा खेळाडू ठरला व विराटने २१८ धावा केल्या. पांड्या, जडेजा व अक्षर पटेल यांची अष्टपैलू कामगिरी ही नजरेत भरणारी आहे. भारताच्या खेळाडूंनी दाखवलेल्या सांघिक कामगिरीचा करिष्मा भारतीय चाहत्यांना आनंद आणि समाधान देणारा ठरला. ऑस्ट्रेलियाने २००६ आणि २००९  अशी अनुक्रमे दोनदा चॅम्पियन ट्रॉफीवर आपले नाव कोरले. त्यानंतर भारतच असा संघ आहे ज्याने ही स्पर्धा तीनदा खिशात घातली. सध्या हा एक रेकॉर्ड बनलाय अन् तो भारताच्या नावावर असल्याने भारताचे एकदिवसीय क्रिकेटवरील वर्चस्व अबाधित आहे. रोहित शर्माने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून पुन्हा एकदा इतिहास रचला. हिटमॅन रोहित हा चारही आयसीसी स्पर्धांच्या अंतिम फेरीत पोहोचणारा क्रिकेटच्या इतिहासातील पहिला कर्णधार बनला असून तसा विक्रम त्याच्या नावावर नोंदवला गेला. भारताचा माजी कर्णधार एम एस धोनीने २००७, २०११ आणि २०१३ मध्ये अनुक्रमे आयसीसी टी-२० विश्वचषक, एकदिवसीय विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी या तीन स्पर्धांमध्ये भारताला ट्रॉफी मिळवून दिली. परंतु, धोनीने खेळाच्या सर्वात लांब स्वरूप असलेल्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्यापूर्वी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सुरू झाली नव्हती. त्याला ती संधी मिळाली नाही. धोनी प्रत्यक्षात जे करू शकला नाही ते रोहितने केले. भारत पाचव्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला संघ बनला आहे, इतर कोणताही संघ तीनपेक्षा जास्त वेळा पोहोचू शकला नाही. रोहितने फेब्रुवारी २०२२ मध्ये पूर्णवेळ कर्णधारपद स्वीकारल्यावर भारताने अनेक विक्रम मोडले आहेत. तीन वर्षांच्या कालावधीत भारताने प्रत्येक आयसीसी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे, असा पराक्रम करणारा पहिला कर्णधार बनला आहे. एक अविस्मरणीय नायक व सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक बनला आहे. यशस्वी कर्णधारांमध्ये महेंद्रसिंह धोनी सोबत रोहितचे नाव घेतले जात आहे. रोहितला जो सन्मान मिळाला नव्हता तो आता मिळतोय याचेही चाहत्यांना समाधान आहे.