- धैर्यवान, विक्रमवीर सुनीता विल्यम्स! - TheAnchor

Breaking

March 20, 2025

धैर्यवान, विक्रमवीर सुनीता विल्यम्स!

धैर्यवान, विक्रमवीर सुनीता विल्यम्स 

अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर ९ महिने अंतराळात राहिल्यावर पृथ्वीवर परतले. १७ तासांचा परतीचा प्रवास हा नासा आणि स्पेसएक्ससाठी जितका आव्हानात्मक होता, इतकाच तो क्रू -९ अंतराळवीरांची परीक्षा बघणारा ठरला. ८ दिवसासाठी अंतराळात गेलेले विल्यम्स आणि विल्मोर स्टारलाईंनर यानातील निर्माण झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे ९ महिने अंतराळात अडकून राहिले. अखेर स्पेसएक्स आणि नासाच्या एकत्रित प्रयत्नाने विल्यम्स आणि विल्मोर यांना बुधवारी पृथ्वीवर सुरक्षित आणले आणि नासासह संपूर्ण जगाने सुटकेचा निःश्वास सोडला.

नासाचे अंतराळवीर सुनीता विल्यम्स, बुच विल्मोर, निक हेग आणि रशियन अंतराळवीर अलेक्झांडर गोर्बुनोव्ह हे चौघे पृथ्वीवर सुरक्षित पोहचले. स्पेसएक्स ड्रॅगन अंतराळयानाच्या मदतीने बुधवारी  दि. १९ मार्च रोजी भारतीय वेळेनुसार पहाटे ३: ३० वाजता फ्लोरिडातील टलाहासीच्या किनाऱ्याजवळील पाण्यात यान यशस्वीपणे उतरले. या बहुप्रतिक्षित, यशस्वी पुनरागमनाची वाट नासा आणि जगभरातील लोक उत्सुकतेने पाहत होते. १७ तासांच्या प्रवासानंतर ते पृथ्वीवर दाखल झाले. प्रवास वाटतो इतका सोपा नव्हता. तेवढाच आव्हानात्मक, धोकादायक होता. नासाने सूक्ष्म नियोजन केल्याने अंतराळवीर सुरक्षित पृथ्वीवर उतरले. क्रू-९ चे सदस्य विल्यम्स व विल्मोर यांना परत आणण्याचे अमेरिकन राष्ट्रपतींनी देशाला दिलेले आश्वासन ही पूर्ण केले.


विल्मोर आणि विल्यम्स गेल्या वर्षी ५ जून २०२४ ला बोईंगच्या स्टारलाइनर अंतराळयानमध्ये बसून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात गेले होते. हे दोघे अंतराळवीर आयएसएसवर (ISS) पोहचल्यानंतर त्यांना सुमारे एक आठवडा तिथे राहायचे होते. मात्र बोईंगच्या स्टारलाइनर अंतराळयानात आलेल्या तांत्रिक अडचणीमुळे त्यांना पृथ्वीवर परत आणणे जोखमीचे झाले होते. म्हणून त्यांना आयएसएसवर नऊ महिन्यांचे प्रदीर्घ वास्तव्य करावे लागले. अखेर १६ मार्चला क्रू- १० स्पेस स्टेशनवर डॉक झाल्यावर विल्यम्स व विल्मोरे यांचा परतीचा प्रवास सुरू झाला. त्यांचे स्पेसएक्स ड्रॅगन अंतराळयान बुधवारी यशस्वीरित्या अनडॉक झाले, १७ तासांचा आव्हानात्मक प्रवास करून अंतराळवीरांचा क्रू निक हेग आणि रोसकॉसमॉस अंतराळवीर अलेक्झांडर गोर्बुनोव्ह हे स्पेसएक्स क्रू ड्रॅगन अंतराळयानासह पृथ्वीवर परत आले. पृथ्वीवर येतांना ड्रॅगन यानाचा वेग नियंत्रित करणे आणि पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश केल्यावर प्रखर उष्णतेचा सामना करणे ही दोन प्रमुख आव्हाने 'नासा'समोर होती. ड्रॅगन यानातील उच्च गुणवत्तेचे हिटशिल्ड आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरामुळे या आव्हानावर मात करणे शक्य झाले. अपवाद ७ मिनिटांचा ब्लॅकआऊट होता, परंतु त्यानंतर जमिनीवरील कंट्रोल स्टेशन आणि ड्रॅगन यान यांचा संपर्क पुन्हा प्रस्थापित झाला. पुढीलप्रवास नियोजनानुसार झाला. अंतराळ मोहिमा अनेक वेळा अयशस्वी ही झाल्या आहेत,  २००३ साली कोलंबिया अंतराळ शटलचा अपघात झाला होता. अमेरिकेचे अंतराळ शटल कोलंबिया प्रक्षेपणानंतर १६ दिवसांनी पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताना कोसळले, त्यात सर्व ७ अंतराळवीरांचा मृत्यू झाला. त्यात भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर कल्पना चावला यांना ही प्राण गमावावे लागले होते. या अपयशांनंतरही, अंतराळ मोहिमांमध्ये अनेक यश मिळाले आहेत आणि मानवतेने अंतराळ संशोधनात मोठी प्रगती केली आहे.


क्रू-९ मोहिमेने केलेले विक्रम

नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (नासा) ने स्पेसएक्स क्रू-९ मोहिमेबद्दल काही आकडेवारी शेअर केली आहे. सुनीता विल्यम्स यांनी अमेरिकन अंतराळवीर म्हणून अंतराळात दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक वेळ घालवला  सुनीता विल्यम्स यांनी त्यांच्या तीन उड्डाणांमध्ये ६०८ दिवस अंतराळात घालवले, बुच विल्मोर यांनी ४६४ दिवस अवकाशात घालवले. विल्मोर आणि विल्यम्स यांचा २८६ दिवसांचा मुक्काम सामान्य सहा महिन्यांच्या आयएसएस रोटेशनपेक्षा जास्त असला तरी, एकल-मिशन कालावधीसाठी अमेरिकेच्या रेकॉर्डमध्ये ते फक्त सहाव्या क्रमांकावर आहे.  विल्यम्स आणि विल्मोर यांनी त्यांच्या मोहिमेदरम्यान १२१,३४७,४९१ मैलांचा प्रवास केला, २८६ दिवस अंतराळात घालवले आणि पृथ्वीभोवती ४,५७६ प्रदक्षिणा पूर्ण केल्या. दरम्यान, हेग आणि गोर्बुनोव्ह यांनी त्यांच्या मोहिमेदरम्यान ७२,५५३,९२० मैलांचा प्रवास केला, १७१ दिवस अंतराळात घालवले आणि पृथ्वीभोवती २,७३६ प्रदक्षिणा पूर्ण केल्या. विल्यम्सने महिला अंतराळवीर म्हणून एकूण ६२ तास ६ मिनिटे अंतराळ स्थानकाबाहेर अंतराळात फिरण्याचा विक्रम केला आहे आणि अवकाशात चालणाऱ्या अवकाशयानांच्या यादीत हा चौथा क्रमांकाचा आहे. सुनीता सार्वाधिक ६०८ दिवस अंतराळात राहणारी नासाची दुसरी अंतराळवीर ठरली आहे. याआधी पेगी व्हिटसन हिनेे चार मोहिमांमध्ये ६७५ दिवसांचा अमेरिकन विक्रम नोंदविला आहे.


विल्यम्स आणि विल्मोर यांची कामगिरी

आपल्या मोहिमेदरम्यान सुनीताने विज्ञान आणि देखभाल उपक्रम आणि तंत्रज्ञान प्रात्यक्षिकांमध्ये योगदान दिले.  तिच्या संशोधनात वनस्पतींची वाढ आणि गुणवत्ता तसेच रक्त रोग, स्वयंप्रतिकार विकार आणि कर्करोगाच्या उपचारांमध्ये स्टेम सेल तंत्रज्ञानाच्या क्षमतेचा समावेश होता. तसेच स्पेस स्टेशनची रेडिओ फ्रिक्वेन्सी ग्रुप अँटेना असेंब्ली काढून टाकणे, विश्लेषणासाठी स्टेशनच्या बाह्य पृष्ठभागावरून नमुने गोळा करणे, एक्स-रे टेलिस्कोपवरील लाईट फिल्टरच्या खराब झालेल्या भागांना झाकण्यासाठी पॅचेस लावणे आदी कामे केली. अमेरिकन क्रू सदस्यांनी ९०० तासांहून अधिक संशोधनासह १५० हून अधिक अद्वितीय वैज्ञानिक प्रयोग आणि तंत्रज्ञान प्रात्यक्षिके या मोहिमेत केली. 


सुनीता विल्यम्सच्या अंतराळ मोहिमा

२००६ मध्ये स्पेस शटल डिस्कव्हरीमधून उड्डाण केले. २००६ ते २००७ पर्यंत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (ISS) १९५ दिवस मुक्काम होता. २०१२ च्या मोहिमेत आयएसएसवर (ISS) १२७ दिवस घालवले. महिला अंतराळवीरांनी सर्वाधिक स्पेसवॉक (चार) करण्याचा विक्रम तिच्याकडे आहे. महिला अंतराळवीरांनी सर्वाधिक स्पेसवॉक (२९ तास आणि १७ मिनिटे) करण्याचा विक्रम ही तिच्या नावावर आहे. तसेच २०२४-२५ च्या क्रू-९ मोहिमेत विल्यम्सने महिला अंतराळवीर म्हणून एकूण ६२ तास ६ मिनिटे अंतराळ स्थानकाबाहेर अंतराळात फिरण्याचा विक्रम केला आहे. तिने केलेल्या अतुलनीय कामगिरीचा नासाने विशिष्ट सेवा पदक, नासा अपवादात्मक सेवा पदक, अंतराळ संशोधनासाठी रशियन मेडल ऑफ मेरिट असे पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. अंतराळवीरांना कठोर प्रशिक्षण दिलेले असते, असे असले तरी स्पेसमध्ये अनेक आव्हाने येत असतात. त्यांना रेडियशनचा धोका अधिक असतो, आरोग्याच्या समस्यांना सामोरे जात असतांना आपले मानवी संशोधनाचे कर्तव्य यशस्वी पार पाडले. वैद्यकिय उपचारानंतर अंतराळवीर सुनीताला कुटुंबाला भेटण्याची मुभा दिली जाईल. म्हणून सुनीता विल्यम्स ही अनेकांसाठी प्रेरणा आहे, तिने असाधारण धैर्य, दृढनिश्चय आणि अंतराळ संशोधनासाठी समर्पण दाखवले याचा नासासह भारताला ही अभिमान आहे.


दिगंबर मराठे